आळंदी-पुणे रस्ता रुंदीकरणाचा गुंता सुटेना

मोजणीला कडाडून विरोध : विकास आराखड्याप्रमाणे असलेला मूळ नकाशा आणि प्रशासनाची भलतीच “कॉपी’

भोसरी, (वार्ताहर) – पुणे-आळंदी रस्ता रुंदीकरणाच्या प्रक्रियेत विकास आराखड्याप्रमाणे असलेला मूळ नकाशा एक, तर प्रशासनाच्या हातात दुसराच नकाशा असल्याचा आरोप करून रुंदीकरणातील नागरिकांनी येथील मोजणी प्रक्रियेला कडाडून विरोध केला.

पुणे-आळंदी रस्ता रुंदीकरणाच्या प्रक्रियेत ठिकठिकाणी अनेक अडथळे निर्माण होत आहेत. अनेक ठिकाणच्या जागा ताब्यात नाहीत. या मार्गावरील आळंदी हद्दीतील मोजणी प्रक्रिया तीन वर्षात तब्बल पाच वेळा अपयशी ठरली. विकास आराखड्यानुसार 60 मीटर रुंदीचा हा रस्ता 45 मीटर करण्याचा प्रयत्न करण्यात आला. या वेळी आळंदी हद्दीतील दोन्ही बाजूच्या नागरिकांनी 35 मीटर करण्यासाठी जोरदार प्रयत्न केले. या संदर्भात शुक्रवारी (दि. 12) आमदार महेश लांडगे, आमदार सुरेश गोरे व प्रमुख अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आळंदी विश्रामगृहावर महत्त्वपूर्ण बैठक झाली. या वेळी दोन्ही आमदारांच्या सहमतीने आळंदी हद्दीतील रस्ता 35 मीटर करण्याचा व रस्त्याची मोजणी करताना दोन्ही बाजूने 2013 साली मंजूर असलेल्या विकास आराखड्यातील नकाशाप्रमाणे मोजणी करण्याचा निर्णय घेण्यात आला.

दरम्यान, मंगळवारी (दि. 16) पुन्हा जुन्याच पद्धतीने मोजणी करण्याचा प्रशासनाने घाट घातल्याचे निदर्शनास आल्यामुळे नागरिकांनी तीव्र विरोध करून मोजणी प्रक्रिया थांबवली. रस्ता रुंदीकरणाच्या कामात पाच वेळा अपयशी ठरलेल्या प्रशासनाने असलेला नागरिकांचा विरोध विचारात घेवून गुरुवारी (दि. 18) रोजी सकाळी पोलिसांचा मोठा फौजफाटा घेऊन प्रशासन आळंदी हद्दीत दाखल झाले. नागरिकांना कोणतीही पूर्वसूचना न देता अचानक दाखल झालेल्या प्रशासनामुळे नागरिकही अचंबित झाले. पूर्व-पश्‍चिम अशा दोन्ही बाजूने समान मोजणी न करता केवळ पूर्व बाजूच्याच नागरिकांना बाधित करण्याचा व काळेवाडी गावठाण हद्दपार करण्याचा प्रशासनाचा डाव असल्याचा आरोप या भागातील नागरिकांनी केला असून या मोजणी विरोधात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

मोजणी प्रक्रियेने घाबरलेल्या नागरिकांचा जमाव व त्यांचा होणारा विरोध लक्षात घेऊन त्यांना चर्चेसाठी विश्रामगृहात बोलावण्यात आले. तेवढ्यात म्हणजे केवळ अर्धा तासात 880 मीटर रस्त्याची मोजणी व खुणा करून प्रशासन मोकळे झाले. पुणे-आळंदी रस्ता रुंदीकरणात आळंदी नगरपरिषद हद्दीतील 2013 च्या मंजूर विकास आराखड्यानुसार मोजणी न करता या नकाशाशी विसंगत असलेल्या नकाशानुसार मोजणी करण्यात आल्याचा नागरिकांचा आरोप आहे.

मोजणी प्रक्रियेत पूर्व बाजूचा रस्ता जवळपास 12 ते 15 मीटर पूर्वेस सरकवण्यात आल्याचा त्यांचा आरोप असून पूर्वेकडील नागरिकांची घोर फसवणूक असल्याची, तर पश्‍चिम बाजूच्या मिळकत धारकांना वाचवण्याचा प्रयत्न असल्याची टीका पूर्व बाजूच्या नागरिकांनी केली. या मोजणी प्रक्रियेसाठी दिघी पोलीस ठाण्यातील 1 पोलीस निरीक्षक, 3 पोलीस उपनिरीक्षक व 25 पोलीस कर्मचारी बंदोबस्तासाठी सहभागी करून घेण्यात आले होते. या वेळी प्रशासनाच्या वतीने मोजणी करण्यास आलेल्या पिंपरी-चिंचवडच्या तहसीलदार गीतांजली शिर्के या मोजणीनंतर पुण्यात गेल्याचे त्यांच्या कार्यालयातून सांगण्यात आले व त्यांचा भ्रमणध्वनी बंद असल्यामुळे दिवसभर त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

या प्रक्रियेला विरोध करण्यासाठी काळेवाडी परिसरातील बाधित नागरिकांनी आळंदी-पुणे रोड काळेवाडी नागरी कृती समिती स्थापन केली असून समितीतील दत्तात्रय उर्फ बंडू नाना काळे, रामदास दाभाडे, अनंत काळे, विठ्ठल मोरे, भानुदास पिसाळ, भाऊ तापकीर, अरुण काळे, मनोज तापकीर, राहुल चोरडिया, भाऊ गिरांजे, ज्ञानेश्‍वर काळे, अमोल काळे आदींनी तीव्र विरोध करून सदर मोजणी प्रक्रियेच्या विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयावर उपोषणास बसणार असल्याचे सांगितले.

आळंदी हद्दीतील दत्तात्रय काळे यांनी स. नं. 141/1/1 काळेवाडी येथील 35 मीटर, 45 मीटर व 60 मीटर रस्ता रुंदीकरणात किती जागा बाधित होणार, अशी माहिती अधिकार कायद्यांतर्गत नगर परिषदेकडे मागवली होती. मात्र मागवलेल्या माहितीनुसार रस्तानिहाय बाधित क्षेत्राचे वर्गीकरण केलेल्या माहितीचे दस्त नगर परिषद अभिलेखात उपलब्ध नसल्याचे पत्र त्यांना देण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)