आळंदीला पाणी पुरवठ्यास कार्योत्तर मंजुरी

पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाच्या माध्यमातून तीर्थक्षेत्र आळंदीला दिवसाआड दोन लाख लीटर पाणी पुरवठा करण्यास महापालिका सर्वसाधारण सभेत मंजुरी देण्यात आली. सर्वपक्षीय नगरसेवकांनी आळंदीला पाणीपुरवठा करण्यास सहमती दर्शवली. तसेच, पिंपरी-चिंचवडकरांना “पापमुक्‍ती’ हवीच…पण, आळंदीला पाणी पुरवठा करणारी इंद्रायणी नदी का प्रदुषित होते? त्यावर कोणत्या उपाययोजना करणार? याचा अभ्यास प्रशासन करणार आहे का? इंद्रायणीची प्रदूषणातून मुक्‍तता कधी होणार? असा प्रश्‍नही विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी उपस्थित केला.
पिंपरी-चिंचवड महापालिकेची सर्वसाधारण सभा शुक्रवारी झाली. सभेच्या अध्यक्षस्थानी महापौर नितीन काळजे होते. महापालिका हद्दीतील चिखली, जाधववाडी व कुदळवाडी आदी भागांतील कारखाने, औद्योगिक कंपन्यांसह नागरी परिसरातील मैला व रसायनमिश्रीत पाणी कोणतीही प्रक्रिया न करता थेट इंद्रायणी नदीमध्ये सोडले जाते. त्यामुळे इंद्रायणीचे मोठ्याप्रमाणात प्रदूषण होत आहे. “”पिंपरी-चिंचवडकरांच्या पापामुळेच इंद्रायणी नदीचे प्रदूषण झाले आहे. परिणामी, आळंदीकरांना दूषित पाणी पुरवठा होत आहे”, असे वक्‍तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आळंदीतील जाहीर कार्यक्रमात केले होते. त्यानंतर पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासन आणि स्थानिक लोकप्रतिनिधींनी आळंदी नगरपरिषदेला पाणी पुरवठा करण्याबाबत पुढाकार घेतला होता.
आळंदी हे महाराष्ट्रातील प्रमुख तीर्थक्षेत्र आहे. याठिकाणी दररोज आणि एकादशी अथवा लग्न समारंभासाठी हजारो नागरिक येत असतात. तसेच, आषाढी आणि कार्तिकी एकादशीला लाखो वारकरी आळंदीत दाखल होत असतात. भाविकांमध्ये इंद्रायणी पवित्र मानली जाते. या नदीमध्ये स्नान केले जाते, तसेच तीर्थ म्हणून नदीचे पाणी प्राशन केले जाते. आषाढी आणि कार्तिकी वारीसाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून आळंदीसाठी प्रतिवर्षी सुमारे एक महिना पाणीपुरवठा केला जातो. त्याच पाईपलाईनमधून सुमारे 1 महिना आळंदी नगरपरिषदेस नि:शुल्क पाणीपुरवठा करण्यात यावा, असा प्रस्ताव महापालिका सर्वसाधारण सभेपुढे ठेवण्यात आला होता.
आळंदी नगरपरिषदेस पिंपरी-चिंचवड महापालिका आषाढी व कार्तिकी यात्रेदरम्यान सात दिवस दररोज 50 हजार लीटर याप्रमाणे 2.50 रुपये प्रति 1 हजार लीटर या दराने शुल्क आकारुन पाणीपुरवठा करते. त्याधर्तीवर सध्या 1 महिन्याच्या कालावधीकरिता 2.50 रुपये प्रति 1 हजार लीटर निवासी दराने दिवसाआड 2 लाख लीटर इतका पाणीपुरवठा करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. त्याला सर्वसाधारण सभेत मान्यता देण्यात आली. मात्र, आळंदीस पाणीपुरवठा करण्याबाबत आमचा विरोध नाही. पण, इंद्रायणीसह पवना नदीच्या प्रदूषणाबाबत महापालिका प्रशासन काय करणार? असा सवाल विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी उपस्थित केला. तसेच, विरोधीपक्ष नेते योगेश बहल, नगरसेविका मंगला कदम, दत्ता साने, संदीप वाघेरे, प्रमोद कुटे, आशा शेंडगे, प्रज्ञा खानोलकर, सारिका बोऱ्हाडे आदी सदस्यांनी या विषयातील चर्चेत आपआपले मत मांडले.
दवे, लागू यांना आदरांजली…
पिंपरी-चिंचवड महापालिका सर्वसाधारण सभेचे शुक्रवारी दुपारी दोन वाजता आयोजन केले होते. यावेळी गुरुवारी निधन झालेले केंद्रीयमंत्री अनिल दवे, ज्येष्ठ अभिनेत्री रीमा लागू, पुण्याचे उपमहापौर नवनाथ कांबळे आदींना श्रद्धांजली वाहून सभा अर्ध्या तासासाठी तहकूब करण्यात आली. यासाठी नगरसेवक विलास मडिगेरी यांनी सूचना मांडली, तर बाबासाहेब त्रिभूवन यांनी अनुमोदन दिले. यावेळी केंद्रीयमंत्री अनिल दवे, ज्येष्ठ अभिनेत्री रीमा लागू, पुण्याचे उपमहापौर नवनाथ कांबळे, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते व माजी आदिवासी मंत्री ए. टी. पवार, चित्रपट निर्माता अतुल तापकीर, सीमेवरील शहीद जवान यांना श्रद्धांजली वाहत महापौर काळजे यांनी सभा अर्धा तास तहकूब केल्याचे जाहीर केले.

पर्यावरण विभागाचे अपयश – साने
पिंपरी-चिंचवडमधील नद्यांची दुरवस्था झाली आहे. याला पर्यावरण विभागच जबाबदार आहे. शहरातील बहुतेक नाले नद्यांना जोडले आहेत. मात्र, प्रशासन सांडपाणी आणि मैलामिश्रीत पाण्यावर प्रक्रिया करण्यात कमी पडले आहे. पावसाळा तोंडावर आला असताना अद्याप नालेसफाई झाली नाही. मग, नद्या कशा स्वच्छ राहतील? अशा प्रश्‍न राष्ट्रवादीचे नगरसेवक दत्ता साने यांनी उपस्थित केला. तसेच, पर्यावरण विभागाचे कार्यकारी अभियंता संजय कुलकर्णी हे निष्क्रिय आहेत. त्यांच्यावर कडक कारवाई करावी. शहरातील टॅंकर लॉबी आणि पाणीटचाईचा विचार करता आळंदीला दोन लाख लीटर पाणी देणे शक्‍य आहे का? शहरातील नागरिकांच्या पाण्यात कपात करुन आळंदीला पाणी देण्याची गरज आहे का? आळंदीला पाणी दिलेच पाहिजे, पण शहरातील पाणी पुरवठाही सक्षम करावा, अशी अपेक्षाही नगरसेवक साने यांनी व्यक्‍त केली.

पवनेचीही स्वच्छता करा – वाघेरे
पिंपरी-चिंचवडमधून इंद्रायणी आणि पवना नदी वाहते. इंद्रायणीप्रमाणे पवना नदीही प्रदूषणाच्या विळख्यात आहे. पवना नदीपात्रात सांडपाणी आणि रसायन मिश्रीत पाणी सोडले जाते. जलपर्णीचे साम्राज्यही वाढले आहे. त्यामुळे पर्यावरण विभागाने गांभीर्याने काम करण्याची गरज आहे. ज्या ठेकेदारांना जलपर्णी काढण्याचे काम दिले आहे. त्यांच्या कामाचा अहवाल प्रशासनाने सादर करावा. महापालिकेच्या सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांच्या माध्यमातून किती पाण्याचा पुन:र्वापर केला जातो. याची माहिती प्रशासनाने दिली पाहिजे. तसेच, नदीचे प्रदूषण करणाऱ्या औद्योगिक संस्था आणि कंपन्यांवर पर्यावरण विभागाने सक्‍त कारवाई केली पाहिजे, अशी मागणी भाजपचे नगरसेवक संदीप वाघेरे यांनी केली.

आळंदीला पाणी देणे हे कर्तव्यच- शेंडगे
तीर्थक्षेत्र आळंदीला पाणी देणे, हे पिंपरी-चिंचवड महापालिकेचे कर्तव्य आहे. आळंदीमुळे पिंपरी-चिंचवडची ओळख आहे. आळंदीला पाणी देण्यावरुन मतभिन्नता दाखविण्याऐवजी आपल्याला नदी सुधारणेबाबत काय उपाययोजना करता येतील. याबाबत अभ्यास केला पाहिजे. शहरातील सांडपाणी व्यवस्था आणि “एसटीपी’बाबत प्रशासनाने पाहणी करुन तात्काळ उपाययोजना केल्या पाहिजेत, अशी अपेक्षा भाजप नगरसेविका आशा शेंडगे यांनी व्यक्‍त केली. तसेच, एक तीळ सात जणांनी खाल्ला होता. या उक्‍तीप्रमाणे आपण आळंदीला पाणी देण्याचा विचार केला पाहिजे, असा टोलाही शेंडगे यांनी विरोधी पक्षाचे नगरसेवक दत्ता साने यांना लगावला.

महापालिकेला “तो’ अधिकार मिळावा – कदम
औद्योगिक वसाहती आणि कंपन्यांमधून नदीपात्रात थेट सोडल्या जाणाऱ्या रसायनमिश्रीत पाण्यामुळे शहरातील नद्यांचे सर्वाधिक प्रदूषण होत आहे. मात्र, अशा कंपन्यांवर कारवाई करण्याचा अधिकार महापालिका प्रशासनाला नाही. ज्यामुळे नद्यांचे प्रदूषण होत आहे, त्यांना रोखण्याचा अधिकारच प्रशासनाला नसेल, तर नदी प्रदूषणाला आळा कसा बसेल? असा प्रश्‍न राष्ट्रवादीच्या नगरसेविका मंगला कदम यांनी उपस्थित केला. तसेच, प्रक्रिया केलेले पाणी वाया न घालवता प्रशासनाने उद्यान आणि वृक्षांना द्यावे. पाणी गळती रोखण्यासाठी उपाययोजना कराव्या. पाणी चोरणाऱ्या कंपन्यांवर कारवाई करण्याचा अधिकार महापालिका प्रशासनाला असावा. त्यासाठी महापालिका आयुक्‍तांनी राज्य शासनाकडे पाठपुरावा करावा. अवघ्या 15 दिवसांवर पावसाळा आला असताना अद्याप नालेसफाई सुरु झाली नाही. मग, नद्या कशा स्वच्छ होतील आणि नागरी आरोग्य कसे जपले जाईल? असा प्रश्‍नही नगरसेविका कदम यांनी उपस्थित केला.

…मग आळंदीला मोफतच पाणी द्या – बहल
पिंपरी-चिंचवडकरांना पापातून मुक्‍त व्हायचे आहे. त्यासाठीच प्रशासनाने तीर्थक्षेत्र आळंदीला दिवसाआड 2 लाख लीटर पाणी देण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठी 2.50 रुपये प्रति 1 हजार लीटर या दराने शुल्क आकारुन पाणीपुरवठा होणार आहे. सुमारे 30 लाख लीटर पाण्यासाठी अंदाजे 75 लाख रुपये आळंदी नगरपरिषदेला द्यावे लागणार आहेत. मात्र, पिंपरी-चिंचवडकरांना पापातून मुक्‍तच करायचे आहे, तर आळंदीला एक महिन्यासाठी मोफत पाणी देण्यास काय हरकत आहे? असा सवाल विरोधी पक्षनेते योगेश बहल यांनी उपस्थित केला. तसेच, आळंदीला पाणी देत असताना पूर्ण प्रक्रिया करुन शुद्ध पाणी पुरवठा करण्यात यावा, असे सांगत त्यांनी या प्रस्तावाला राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाकडून समर्थन दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)