आळंदीत अवैध प्रवासी वाहतूक फोफावली

कारवाईसाठी पोलिसांचेच अस्तित्वच दिसत नाही

आळंदी- तीर्थक्षेत्र आळंदीत अवैध प्रवासी वाहतुकीने कहर केला आहे. रिक्षा, जीप अशा वाहनांमधून नियमबाह्य, अतिरिक्‍त प्रवाशांची वाहतूक केली जात असल्याने हा प्रकार प्रवाशांच्या जीवावर बेतला जात आहे. तर अशा अवैध वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्याऱ्या पोलिसांचे अस्तित्वच कुठे दिसत नसल्याने आश्‍चर्य व्यक्‍त होत आहे.
वाहतूक पोलीस आणि नियमबाह्य खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्यांचे संबंध इतके मधूर आहेत की, जणूकाही वाहतूक पोलिसांकडून खासगी वाहतूकदारांना कोणताही धोका कधीच होऊ शकणार नाही असे चित्र दिसते. त्यामुळे रिक्षा, जीप आदी वाहनांत प्रमाणापेक्षा कितीतरी अधिक प्रवासी बसविले जातात. अनेकदा शाळकरी मुले व इतर प्रवाशांची थेट मागे लटकून वाहतूक होताना दिसते.
आळंदी-मरकळ रस्ता (संतोषी माता मंदिराजवळ व विठ्ठल कृपा कार्यालयासमोर) या शेकडो अवैधरित्या असणारी 3/4 चाकी रिक्षा, जीप व इतर वाहनांच्या गर्दीने अक्षरक्ष:कहर केला असून त्याचा त्रास अनेक नागरिक, व्यापारी व पायी चालणाऱ्यांना सहन करावा लागत आहे. ही अवैधरित्या वाहतूक करणारी वाहने दिवसभर एकामागे एक अशी उभी असतात, त्यामुळे मरकळ रस्त्यावर कमालीची वाहतूक कोंडी होते. परिसरातील व्यापाऱ्यांना देखील त्यांचा हा त्रास सहन करतात. शिवाय या वाहतूकदारांना काही बोलल्यास आम्ही पोलिसांना हप्ते देतो, जा चौकीत करा तक्रार असे उद्धटपणाचे बोलणे त्यांच्याकडून ऐकून घ्यावे लागत असल्याचे तेथील अनेक व्यापारी सांगतात.
पीएमपी बस स्थानक येथून देखील आळंदी-भोसरी, आळंदी-विश्रांतवाडी अशी अवैधरित्या प्रवासी वाहतूक सूरू आहे. तर नगरपालिकेच्या जागेत बिनधास्तपणे आपली वाहने लावून, वाहतुकीस अडथळा करून पोलीस व त्यांच्या संघटनेच्या नेत्यास दरमहा मालामाल करून सर्वसामान्य प्रवाशांच्या खिशाला कात्री देत आपली पोळी भाजून घेत असल्याचा आरोप प्रवशांनी केला आहे. तसेच अशीच परिस्थिती आळंदीतील मुख्य रस्त्यांवर असल्याने पोलिसांनी कारवाई करून प्रवाशांना न्याय द्यावा, अशी मागणी जोर धरत आहे.

  • एकमेकांच्या मांडीवर बसा
    पीएमपीकडून वाहतूक सेवेत योग्य नियोजन नसल्याचा फायदा खासगी प्रवासी वाहतूकदारांना होत आहे. बसची अपुरी संख्या, प्रवाशांच्या सोईनुसार बसची सेवा नसणे तर प्रवाशांना थांबण्यासाठी वेळ नसल्याचे प्रकार नित्याचे झाल्याने या गैरसोयींना वैतागलेले प्रवासी सरळ खासगी वाहतुकीकडे आपला मोर्चा वळवितात. याचाच फायदा हे वाहतूकदार घेत प्रवशांची लूट करीत आहेत. जवळच्या थांब्यावर उतरण्यासाठी 5 ऐवजी 10 रुपये घेतले जातात. क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी बसवून, लहान मुलांना कडेवर घ्या, एकमेकांच्या मांडीवर बस्सा असा सज्जड दम प्रवाशांना दिला जातो, असे प्रवाशांचे म्हणणे आहे.
  • आळंदीत गेल्या दोन महिन्यांपूर्वीच वाहतूक शाखेचा विभाग सुरू झालेला आहे. यापूर्वी कोणी हप्ते घेत असतील तर ते आम्हाला माहित नाही. आमचा विभाग कोणतेही हप्ते स्वीकारत नाही. शुक्रवार (दि. 25) पासून आम्ही अवैध वाहतुकीवर कडक कारवाई करणार आहोत.
    – व्ही. के. कुबडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, वाहतूक शाखा, आळंदी
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)