आले सणवार, सजवूया घरदार (भाग-१)

दसरा-दिवाळी म्हटले की घराची स्वच्छता आणि सजावट यांना सारखेच महत्त्व असते. प्रत्येकाला घराची सजावट थोडी निराळी हवी असे वाटते त्यात काही वावगेही नाही. घरी येणाऱ्या पाहुण्यांची सजावटीची तारीफ केली की आपल्यालाही बरे वाटते. घराची सजावट पूर्णच बदलायची असेल तर भरपूर पैसा लागतो मात्र थोडी कलात्मकता आणि सर्जनशीलता वापरून कमी खर्चातही घराची खूप छान सजावट होऊ शकते.

घर सजवताना एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे ती म्हणजे घराचा आकार आणि खिशाचा आकार. कारण बजेट हा देखील महत्त्वाचा भाग आहे. घराची सजावट करताना सामान खरेदी करण्यापूर्वी घराचा आकार जरुर लक्षात ठेवा. अगदी उंची जडशीळ वस्तूंनी घराचे सौदर्य वाढते असे काही नाही. घरातील उपलब्ध जागेचा सुयोग्य वापर केल्यास घर सुंदर दिसते. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे बजेट. घराच्या सजावटीसाठी महागड्या गोष्टीच विकत घेतल्या पाहिजेत असे नाही. तसेच घरातील संपूर्ण सामान बदलून टाकणेही गरजेचे नाही. जुन्या गोष्टीही नव्या पद्धतीने वापरता येतात.

जागा व्यवस्थित करावी : सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे घरातील उपलब्ध जागा व्यवस्थित वापरल्यास योग्य सजावट करता येते. अनेकदा वापर नसलेल्या वस्तू असू दे म्हणून घरात साठवून ठेवलेल्या असतात. कधीतरी त्याची गरज पडेल असे म्हणून अनेक गोष्टी विनाकारण पडून असतात. अशा न वापरत्या वस्तू बाहेर काढा. घरात न वापरते फर्निचर, खुर्च्या असतील तर त्या बाहेर काढून टाका. ह्या वस्तू काढून टाकल्याने घर मोकळे वाटते. दुसऱ्या वस्तूंसाठी जागा होऊ शकते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

फर्निचर : घरात कमी जागा व्यापणारे फर्निचर घ्यावे. स्मार्ट फर्निचर घ्यावे. एकाच फर्निचरचा एका पेक्षा जास्त कामासाठी उपयोग होईल. जसे एकाच टेबलवर जेवता येईल आणि अभ्यासही करता येईल असे टेबल घ्या. सोफा कम बेड घ्यावा जेव्हा गरज असेल तेव्हा बेड करा आणि गरज नसेल तेव्हा सोफा म्हणून वापरता येईल त्यामुळे जागा रिकामी राहील.
खिशाला भार पेलवणार नसेल तर जुन्या फर्निचरलाच थोडा नवा लूक देता येतो. नवा सोफा घेण्याऐवजी त्याचे कापड बदला. बाजारात कमी किंमतीत अनेक प्रकारची कापडे मिळतात. त्याचे कव्हर शिवल्यास जुनाच सोफा नव्या सारखा वाटेल. एखादी जुनी खुर्ची असेल तर तिला कव्हर घालून तिचा साईड टेबल सारखा वापर करु शकता. त्यावर रिडिंग लॅप, फ्लॉवर पॉट वापरू शकता. काही वेळा झोपण्याच्या खोली गजराचे घड्याळ ठेवण्यासाठीही वापर करू शकतो.

डिझायनर कुशन : घरामध्ये विविध प्रकारच्या कुशन घेऊ शकता. सोफ्याचे कुशन कापड हलके असेल तर त्याच्याबरोबर हेवी कापडाचे कुशन नक्कीच सुंदर दिसतात. त्याशिवाय खोल्यांमध्ये लहान मोठ्या आकारातील विविध प्रकारचे कुशन थोडा पारंपरिक लूक देतात. या कुशनवर हल्ली मिरर वर्क, कलाकुसर, मणी वर्क, दोरा, एप्लिक वर्क करतात. घराच्या सौंदर्यासाठी जमिनीवरील बैठक करु शकता तिथेही कुशन ठेवू शकता.

आले सणवार, सजवूया घरदार (भाग-२)

पडदे हलके असावेत : घरामध्ये पडदे बदलण्याची वेळ आली आहे. जडशील आणि डिझाईनच्या पडद्यांऐवजी हलके पडदे लावावे. बाजारात कमी किंमतीतही अनेक प्रकारचे प्रिंटेड आणि प्लेन पडदे आहेत. त्यामुळे घराची शोभा निश्‍चितच वाढते. मात्र नवे पडदे खरेदी करणे शक्‍य नसेल तर थोडीशी सर्जनशीलता फुववा आणि जुन्याच पडद्यांना नवा लूक द्या. जुन्या पडद्यांना मिळती जुळती रिबीन, गोटा किंवा लेक लावावी. पडद्यांच्या खाली घुंगरु लावू शकतो.

– विजयालक्ष्मी साळवी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)