आले आमदारांच्या मना तेथे…!

राहुल कलाटे यांचा घणाघात : आमदार लक्ष्मण जगताप “लक्ष्य’

पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी भाजपचा कारभार म्हणजे “आले आमदारांच्या मना…कुणाचे काही चालेना’ अशी परिस्थिती आहे. महापालिकेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये “भाऊं’ ची दहशत आहे, असा घणाघात शिवसेना गटनेते राहुल कलाटे यांनी केला.

चिंचवड विधानसभा मतदार संघातील “कट्टर प्रतिस्पर्धी’ म्हणून भाजप शहराध्यक्ष तथा आमदार लक्ष्मण जगताप आणि शिवसेना गटनेते राहुल कलाटे यांची ओळख आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर दोन्ही नेत्यांमधील राजकीय शह-काटशह सुरू झाले आहेत. त्याची ठिणगी शुक्रवारी उडाली.

भाजप खासदार अमर साबळे यांनी घेतलेल्या “दिव्यांग जन सशक्‍तीकरण’ कार्यक्रमात विरोधी पक्षातील प्रमुख पदाधिकाऱ्यांना डावलण्यात आले. महापालिकेच्या खर्चातून आयोजित केलेला कार्यक्रम भाजप नेत्यांनी “हायजॅक’ केला, असा आरोप करीत विरोधी पक्षनेते दत्ता साने, सेना गटनेते राहुल कलाटे, मनसे गटनेते सचिन चिखले यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलताना कलाटे यांनी आमदार जगताप यांचे नाव न घेता भाजपच्या कारभारावर टीका केली. यावेळी स्थायी समितीचे माजी सभापती प्रशांत शितोळे, माजी महापौर व नगरसेविका अपर्णा डोके, सुलक्षणा धर आदी उपस्थित होते.

“स्थायी’चे माजी सभापती प्रशांत शितोळे म्हणाले की, सत्ताधारी भाजपचे शहराध्यक्ष आणि आमदार आता कोणत्या नव्या पक्षात जातात, याची आम्ही आतुरतेने वाट पाहत आहोत. शहरातील अनधिकृत बांधकाम आणि शास्तीकराचा प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी त्यावेळी आमदारांनी राजीनामा दिला. पाच महिने आमदार पदावर नव्हते. पुन्हा भाजपचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदारांना आश्‍वासन दिले. त्याआधारे त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. मात्र, 100 दिवसांत अनधिकृत बांधकामे नियमित करण्याचे भाजपचे आश्‍वासन हवेत विरले आहे. पिंपरी-चिंचवडसाठी आमदारांनी आश्‍वासने देवून आणि घोषणाबाजी केल्यानंतर साखर वाटप करुन इतकी साखर खर्च झाली, की आता केंद्र सरकारला पाकिस्तानमधून साखर आयात करावी लागली, असा उपरोधिक टोलाही शितोळे यांनी यावेळी लगावला.

भाजपचे “कारभारी’ आमदार पाच-दहा लाख रुपये वाचवून “इमेज बिल्डिंग’ करण्यात व्यस्त आहेत. दुसरीकडे, महापालिकेच्या खर्चातून केलेल्या कार्यक्रमांत श्रेय घेवून स्वत:चे “मार्केटिंग’ सुरू आहे. विरोधी पक्षातील नगरसेकांची विकास कामे रोखण्यासाठी अधिकाऱ्यांवर दबाव टाकला जात आहे. भाजपचे आमदार म्हणजे “वार्डातील नगरसेवक’ झाले आहेत. पूर्वी अशी परिस्थिती नव्हती. विरोधी पक्षातील नगरसेवक-पदाधिकाऱ्यांना विश्‍वासात घेवून कामे करत होते.
– राहुल कलाटे, गटनेता, शिवसेना.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)