आर्थिक मागास शिष्यवृत्तीची उत्पन्नमर्यादा 8 लाखांवर

शालेय शिक्षण विभागाचा निर्णय : अटी व शर्ती पूर्वीप्रमाणेच राहणार

पुणे – राज्य शासन पुरस्कृत आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी शालांत परीक्षोत्तर गुणवत्ता शिष्यवृत्ती योजनेसाठी पालकांची वार्षिक उत्पन्न मर्यादा 30 हजार रुपयांवरून 8 लाख रुपये एवढी करण्यात आली आहे. याबाबतचा निर्णय शासनाच्या शालेय शिक्षण विभागाकडून घेण्यात आला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

सन 1978-79 पासून ही शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येत आहे. या शिष्यवृत्तीस पात्र होण्यासाठी माध्यमिक शालांत परीक्षेत म्हणजेच इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांची गुणमर्यादा 50 टक्के करण्यात आली आहे. एकूण 3 हजार 200 मुलांना शिष्यवृत्तीचा लाभ दिला जातो. पात्र विद्यार्थ्यांमधून जास्तीत जास्त गुण असणाऱ्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीसाठी निवड केली जाते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी पालकांची वार्षिक उत्पन्न मर्यादा सद्यस्थितीत खूप कमी असल्याने बहुसंख्य विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र असूनही त्यांना शिष्यवृत्ती लाभापासून वंचित रहावे लागते. यामुळे योजनेची उद्दिष्ट साध्य होत नसल्याचे आढळून येते.

उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या शासन निर्णयानुसार आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजनेचा लाभ देण्यासाठी विद्यार्थ्यांच्या पालकांची वार्षिक उत्पन्न मर्यादा 6 लाख रुपयांवरुन 8 लाख रुपये इतकी करण्यात आली आहे. याच धर्तीवर आता आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय असलेल्या इयत्ता 11 वी आणि 12 वीच्या विद्यार्थ्यांसाठी पालकांची एकत्रित वार्षिक उत्पन्न मर्यादा वाढविण्याचा निर्णय शासनाकडून घेण्यात आलेला आहे.

योजनेतील बदलाचा लाभ सन 2018-19 या शैक्षणिक वर्षापासूनच लागू होणार आहे. याच्या अटी व शर्ती पूर्वीप्रमाणेच राहणार आहेत. सुधारित उत्पन्न मर्यादेबाबत माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालकांनी विभागीय शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकारी यांना सूचना द्याव्यात, असे शालेय शिक्षण विभागाच्या कार्यासन अधिकारी नेहा हुमरसकर यांनी काढलेल्या आदेशात नमूद करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)