आर्थिक मंदीत विकासकामांना खीळ?

हवेली तालुक्‍यात सध्या आर्थिक मंदी सदृश्‍य परिस्थिती दिसून येत आहे. दुसरीकडे निवडणुकांच्या वातावरणात विकासकामांना खीळ बसू लागल्याने नागरिकांची डोकेदुखी वाढू लागली आहे. पुणे शहरालगत असणाऱ्या या भागामध्ये सध्या अनेक गृहप्रकल्पांची कामे रखडली आहेत. त्यामुळे गृहप्रकल्पांमध्ये गुंतवणूक करणाऱ्या व्यक्तींना बॅंकांचे हप्ते फेडण्याशिवाय पर्याय उरला नाही. ज्या नागरिकांनी सदनिका खरेदी करण्यासाठी गुंतवणूक केली आहे, अशा व्यक्‍तींनी ज्या बॅंकेकडून कर्ज घेतले आहेत. त्या व्यक्‍तींनाही कर्ज फेडत असताना नाकीनऊ येत आहे.

सांडपाणी, पिण्याचे पाणी, कचरा व्यवस्थापन आदी प्रश्‍न गंभीर होऊ लागले आहेत. मोठ्या गावांमध्ये कचरा, सांडपाणी, पिण्याच्या पाण्याची समस्या नागरिकांच्या जीवावर येऊन बेतली आहे. जून महिना आला तरी अनेक ठिकाणी पिण्याचे पाणी विकत घ्यावे लागत आहे. पावसाळ्यामध्ये कचऱ्यामुळे आरोग्याचे प्रश्‍न निर्माण होणार आहेत.

पुणे सोलापूर रोड, पुणे नगर रोड, पुणे सातारा रोड, आदी मार्गावर वाहतुकीचे प्रश्‍न विकासावर परिणाम करीत आहेत. त्यामुळे अनेक भागातील गुंतवणुकीवर या वाहतुकीमुळे परिणाम केला असल्याचे दिसत आहे. गुंठेवारी व्यवसायात 1 गुंठ्यांच्या नोंदी होत नसल्याने अनेकांनी गुंतवणुकीकडे पाठ फिरवली असल्याचे चित्र आहे. 11 गुंठे खरेदीचे व्यवहार सध्या मंदावले असल्याचे चित्र पहावयास मिळू लागले आहे. बांधकाम व्यवसाय, गुंठेवारी व्यवसायाशी निगडित इतर लहान- मोठे व्यवसायात अनेक कामे मिळवताना कसरत करावी लागत आहे. लोकसभा, ग्रामपंचायत आणि पंचायत समिती पोटनिवडणुकासाठी आचारसंहिता लागू झाल्याने विकासकामे रखडली आहेत. त्यातच विधानसभा निवडणुकीचे वातावरण तापणार आहे. त्यामुळे तालुक्‍यातील विविध प्रश्‍न गंभीर होण्याची चिन्हे आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)