आर्थिक नियोजनाविषयी बोलू काही… (भाग-१)

मागील काही वर्षांत लोकांमध्ये आर्थिक साक्षरता थोडी-फार वाढल्यामुळं लोक फायनॅन्शिअल प्लॅनिंग बाबतीत बोलू तरी लागलेले आहेत. खरंच हा विषय गांभीर्यानं घेण्यासारखा आहे का ? कोणत्या गोष्टी यामागे दडल्या आहेत ? काय आहेत यामागील तत्त्वं ? व आर्थिक नियोजन योग्यप्रकारे नेमकं कसं करावं ?

आर्थिक नियोजन ही कोणाच्याही आयुष्यातील फार महत्वाची अशी गोष्ट आहे. ही एक प्रक्रिया आहे जी आपण शास्त्रीयदृष्ट्या घेऊ शकतो. यामध्ये एका उत्तम, विश्वासू, स्पष्ट बोलणाऱ्या, सत्य न लपवणाऱ्या सल्लागाराची नितांत गरज असते. विशेष म्हणजे ही प्रक्रिया काही कमी अवधीसाठी नाही व यावर आपल्या संपूर्ण आयुष्याचे (आर्थिक) नियोजन एक प्रकारे अवलंबून असल्याने शक्यतो कुटुंबातील (इथं कुटुंब म्हणजे पति-पत्नी व मुलं एवढाच अर्थ गृहीत धरला आहे) प्रमुख व्यक्तींनी(पति-पत्नी) लक्ष घालणं क्रमप्राप्त आहे. त्यामुळं आर्थिक मार्गदर्शनासाठी पति-पत्नीमध्ये आर्थिक पारदर्शकता असणं गरजेचं आहे व याच मूलभूत गोष्टी इथं उत्तम आर्थिक नियोजनाच्या पायाभरणीसाठी महत्वाच्या आहेत.

नंतर येतं ते म्हणजे कुटुंबात येणाऱ्या उत्पन्नाचं व होणाऱ्या खर्चाचं विश्लेषण. इथं एक गोष्ट विशेष नमूद करावीशी वाटते तीम्हणजे, तुमचा आर्थिक सल्लागार (फायनॅन्शिअल अॅडव्हायजर) हा तुमच्यासाठी एक प्रकारे डॉक्टरचं काम करतो. त्यामुळं त्याच्यापासून कोणतीही आर्थिक गोष्ट लपवल्यास त्या सल्लागाराला तुमच्या कुटुंबासाठी योग्यप्रकारे आर्थिक नियोजन करता येऊ शकत नाही व तुमच्या उद्दिष्ट्यं नियोजनात अडथळा येऊ शकतो आणि त्यामुळं त्यामध्ये तुमचंच नुकसान होऊ शकतं.ज्याप्रमाणं आपण एखाद्या डॉक्टरांकडं गेल्यावर जसं सर्व गोष्टी न लपवता सांगतो आणि त्यावरून डॉक्टर अनुमान काढून काही पथ्यं पाळण्यास सांगतो व काही औषधं अथवा पूरक आहाराची शिफारस करतो, अगदी त्याप्रमाणेच आपल्या संपूर्ण विस्तृत माहितीच्या आधारे आपल्या आर्थिक नियोजनात कोणत्या त्रुटी आहेत, त्यावर उपाय काय, कोणत्या गोष्टी पाळावयास अथवा टाळावयास हव्यात व कोठ-कोठे कसरत करावी लागेल, इ. गोष्टी आपला आर्थिक सल्लागार आपल्याला समजावून देऊ शकतो, जेणेकरून तुमच्या आयुष्यातील उद्दिष्ट योग्य प्रकारे व योग्य वेळेत पार पाडायला हातभार लागू शकतो.

आर्थिक नियोजन करताना यात प्रामुख्यानं अग्रक्रम येतो तो म्हणजे, स्वतः त्या व्यक्तीचा त्याच्या वार्षिक उत्पन्नाच्या १२ ते १५ पट आयुर्विमा असणं व त्याचबरोबर कमीतकमी ३-५ लाखाचा आरोग्यविमा असणं. जसजसं कुटुंब वाढत जाईल तसतसा हा आरोग्यविमा देखील वाढवता येईल. जेणेकरून अनपेक्षित येणार परंतु क्रमप्राप्त ठरणारा मोठ्या खर्चाची भीती राहणार नाही. त्याच बरोबर आर्थिक नियोजनाच्या बाबतीत पुढील गोष्टी विचारात घेतल्या जातात –

माझी आताची आर्थिक परिस्थिती (नेटवर्थ) काय आहे ? यासाठी आपल्या एकूण मालमत्तेच्या मूल्यांकनातून (व्हॅल्युएशन) व एकूण केलेल्या गुंतवणुकीतून चालू असलेली कर्ज व एकूण दायित्व वजा करणं. यामध्ये त्या व्यक्तीचं आर्थिक आरोग्य कळू शकतं. उदा. जर एखाद्याकडं वडिलोपार्जित संपत्ती असेल व त्यासमोर किरकोळ कर्ज असेल तर त्या व्यक्तीच्या उद्दिष्ट नियोजनावर त्याचा फारसा परिणाम पडू शकत नाही. त्याचप्रमाणं, एखाद्या कुटुंबाचं एकूण निव्वळ उत्पन्न व मासिक खर्च यांचा हिशेब करून उरणारी रक्कम ही अतिरिक्त गुंतवणुकीस पात्र रक्कम (Investible Surplus) म्हणून गृहीत धरता येऊ शकते. यासाठी वर्षातून एकदाच येणारे खर्च, (उदा. इन्शुरन्स प्रीमियम, सणासुदीचा खर्च, कपडे-लत्ते, घरातील एखादा मोठा खर्च, पर्यटन, भेटवस्तू, दानधर्म, इतर खरेदी, वार्षिक शुल्क इ.) यांच्या एकूण रकमेस १२ ने भागून आलेली रक्कम महिन्याच्या खर्चाच्या रकमेत पकडणं. तसंच सर्वांत महत्वाचं म्हणजे निव्वळ मासिक उत्पन्नाच्या कमीतकमी १०-१५% रक्कम ही निश्चित गुंतवणूक म्हणून महिन्याच्या खर्चाच्याच रकमेमध्ये गृहीत धरणं. लक्षात ठेवा यशस्वी गुंतवणूकदारासाठी, उत्पन्न – खर्च = गुंतवणूक असं होऊ नदेता, उत्पन्न – गुंतवणूक = खर्च हेच सूत्र प्रत्येकानं अंगिकारलं पाहिजे.

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)