आर्थिक निकषावर आरक्षण मिळावे

पिंपरी – राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषद आणि भगवान महावीर शिक्षण संस्थेचे पाचवे विद्यार्थी-शिक्षक साहित्य संमेलन गुरुवारी (दि. 9) भोसरी येथे पार पडले. मात्र, मराठा मोर्चाने पुकारलेल्या बंदच्या पार्श्‍वभूमीवर दिवसभराचे साहित्य संमेलन उरकते घेण्यात आले. इतर जातींप्रमाणे मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे, परंतु, आगामी काळात सर्वच आरक्षण बंद करून आर्थिक निकषावर आरक्षण देण्यात यावे, असा ठराव संमेलनात एकमताने मंजूर करण्यात आला.

भोसरी येथील प्रितम प्रकाश महाविद्यालयात हे संमेलन पार पडले. अध्यक्षस्थानी कवी प्रा. चंद्रकांत वानखेडे होते. साहित्यिक प्रकाश रोकडे, डॉ. अशोक शिंदे, प्रकाश जवळकर, पी. एम. जैन, डॉ. प्रशांत गादिया, सामाजिक कार्यकर्त्या सुप्रिया सोळांकुरे, प्रशांत रोकडे आदी उपस्थित होते.

-Ads-

मराठा आरक्षण आंदोलनाच्या पार्श्‍वभूमीवर दिवसभराचे चार सत्रांचे साहित्य संमेलन परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत उद्‌घाटन आणि त्यानंतरच्या पहिल्या सत्रात उरकते घेण्यात आले. तीन तासांच्या कालावधीतच सर्व सत्रांचे कार्यक्रम प्रातिनिधीक स्वरुपात घेण्यात आले. 27 मिनिटांचे अध्यक्षीय भाषण 10 मिनिटांत संपवण्यात आले. सर्व विषयांना स्पर्श करत प्रा. वानखेडे यांना अध्यक्षीय भाषणाचे कसब दाखवावे लागले. प्रत्येक जाती-धर्मामध्ये आर्थिक दृष्टीने वरचा व खालचा गट यामध्ये संघर्ष आहे. वरच्या स्तरातील वर्ग खालच्या वर्गाची दिशाभूल करण्यासाठी जातीकडे बोट दाखवत आहे. हे धोक्‍याचे लक्षण आहे. त्यामुळे आर्थिक निकषावर आरक्षण द्यावे, असा ठराव प्रकाश रोकडे यांनी मांडला. एकमुखी हा ठराव मंजूर करण्यात आला.

प्रा. चंद्रकांत वानखेडे, डॉ. अशोककुमार पगारिया आणि प्रकाश रोकडे यांच्या व्याख्यानांचा संग्रह असलेल्या “बंधुतेचा अनुबंध’ या पुस्तकाचे विमोचन यावेळी करण्यात आले. कवी चंद्रकांत धस यांच्या अध्यक्षतेखाली काव्य संमेलन झाले. डॉ. अशोककुमार पगारिया यांनी दलाई लामा यांची “इमारतीची उंची वाढली, विचारांची कमी झाली’ ही मराठीत अनुवादीत कविता सादर केली. संमेलनाध्यक्ष प्रा. वानखेडे यांनी “गाव सोडून जाताना’, “माय बोललीच नाही’, “दुःख नितळून घ्यावं’ या कविता त्यांनी आपल्या खड्या आवाजात सादर करत उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. कवी शंकर आथरे यांनी डॉ. अशोककुमार पगारिया यांची प्रकट मुलाखत घेतली. “बाबा भारती साहित्य पुरस्कार’ डॉ. सुभाष आहेर यांना प्रदान करण्यात आला. महेंद्र भारती, सुनील यादव, प्रा. सदाशिव कांबळे, प्रा. पांडुरंग भास्कर, विलास पगारिया, राजेंद्र धोका, सतीश खाबिया यांनी संयोजन केले.

What is your reaction?
13 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
1 :blush:
0 :cry:
1 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)