आर्थिक दुर्बल घटकांसाठीची शिष्यवृत्ती परीक्षा 9 डिसेंबरला

राज्यात परीक्षेसाठी यंत्रणा सज्ज : 341 केंद्रांवर परीक्षा
– 1 लाख 15 हजार विद्यार्थी परीक्षा देणार

पुणे – महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठीची शिष्यवृत्ती परीक्षा (एनएमएमएस) येत्या 9 डिसेंबरला घेण्यात येणार आहे. यासाठी सर्व यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे.
इयत्ता आठवीत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना या परीक्षेला बसता येत असते. दीड लाख रुपयांपेक्षा वार्षिक उत्पन्न कमी असलेल्या पालकांची मुले परीक्षेसाठी पात्र ठरतात. अनुदानित शाळांमधील विद्यार्थ्यांसाठीच ही परीक्षा घेण्यात येत असते.

यात उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना दरमहा 1000 रुपये प्रमाणे इयत्ता नववी ते बारावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण होऊपर्यंत चार वर्ष शिष्यवृत्ती मिळणार आहे. मात्र, या प्रत्येक वर्षी विद्यार्थ्याला किमान 55 टक्‍के गुण मिळविणे आवश्‍यक राहणार आहे.
या परीक्षेला राज्यातील 1 लाख 15 हजार 71 विद्यार्थी बसणार आहेत. महाराष्ट्रातील 37 जिल्ह्यांमधील 341 केंद्रांवर एकाच दिवशी परीक्षा घेण्यात येणार आहे.

मुंबई विभागात 23, पुण्यात 55, नाशिकमध्ये 35, कोल्हापूरमध्ये 86, औरंगाबादमध्ये 37, अमरावती 43, नागपूरमध्ये 37 याप्रमाणे केंद्रे सज्ज ठेवण्यात आली आहेत. परीक्षेसाठी 8 हजार 274 अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या नेमणुका करण्यात आल्या आहेत. यात केंद्र संचालक 341, उपसंचालक 187, पर्यवेक्षक 5 हजार 744, लिपीक 341, शिपाई 1 हजार 661 असा मनुष्यबळाचा समावेश असणार आहे.

11 हजार 554 विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र
या परीक्षेसाठी दोन पेपर होणार आहेत. पहिला पेपर बौध्दिक क्षमता चाचणी या विषयावर 90 प्रश्‍नांचा व 90 गुणांचा असणार आहे. सकाळी 10.30 ते 12 या वेळेत हा पेपर होणार आहे. दुसरा पेपर हा शालेय क्षमता चाचणी या विषयावर होणार असून यातही 90 प्रश्‍न व 90 गुण असणार आहेत. हा पेपर दुपारी 1.30 ते 3 या वेळेत होणार आहे. बहुपर्यायी वस्तुनिष्ठ स्वरुपाचे दोन्ही पेपर असणार आहेत. परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी सर्वसाधारण संवर्गातील विद्यार्थ्यांना 40 टक्‍के तर मागासवर्गीय संवर्गातील विद्यार्थ्यांना 32 टक्‍के गुण मिळविणे आवश्‍यक राहणार आहे. अखिल भारतीय पातळीवर 1 लाख विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळणार असून महाराष्ट्रासाठी 11 हजार 682 विद्यार्थ्यांना कोटा निश्‍चित करून देण्यात आलेला आहे. गेल्या वर्षी महाराष्ट्रातून या परीक्षेला 79 हजार 543 विद्यार्थी बसले होते. यातील 11 हजार 554 विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले, अशी माहिती अधिकाऱ्यांकडून मिळाली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)