आर्थिक उद्दीष्टे व्यावहारिक असणे महत्त्वाचे! (भाग-२)

आपल्या आयुष्यात आपली काही स्वप्ने असतात. काही उद्दीष्टे असतात. त्यानुसार आपले किमान मनातल्या मनात हिशेब चालू असतात. त्याचवेळी अलिशान फ्लॅट, महागडी कार, परदेश सहल, महागडा मोबाईल अशा सगळ्या गोष्टींचे आकर्षण वाटत असते. त्याबरोबरच वयाच्या ५८ व्या वर्षाच्या आधी निवृत्त होण्याचेही स्वप्न असते. या सगळ्यांचा ताळमेळ घालायचा असेल तर आपली आर्थिक उद्दीष्टे व्यावहारिक असणे गरजेचे असते.

आर्थिक उद्दीष्टे व्यावहारिक असणे महत्त्वाचे! (भाग-१)

भपकेबाज लग्नाऐवजी शिक्षणावर खर्च करा – आपल्या देशात भपकेबाज आणि खर्चिक लग्नाला पसंती दिली जाते. वधू-वर आणि दोन्ही घरातील नातेवाईकांना लग्न साजरे करायचे असते आणि त्यासाठी लग्नात भपकेबाजपणा हवा असतो. त्यासाठी वर्षानुवर्षे बचत करून साठवलेले लाखो रुपये एका दिवसात खर्च करण्याची त्यांची तयारी असते. प्रसंगी कर्ज काढून किंवा निवृत्तीसाठीचा निधी लग्नासाठी वापरला जातो. अनेक पालक मुलांच्या शिक्षणाचाच नव्हे तर त्यांच्या लग्नाचाही खर्च करतात. त्यासाठी आयुष्यातील महत्त्वाच्या आर्थिक उद्दीष्टांनाही ते फाटा द्यायला तयार असतात. तुम्ही मुलांना शिक्षण दिल्यानंतर आता त्यांच्या लग्नाचा खर्च त्यांना करू द्या. आता लग्नापर्यंत मुलामुलींकडे बऱ्यापैकी पैसा आलेला असतो. त्यामुळे लग्नाच्या खर्चाची जबाबदारी पूर्णपणे त्यांच्यावर टाका. निवृत्तीनंतर आर्थिकदृष्ट्या मुलांवर अवलंबून राहण्यापेक्षा त्यांच्या लग्नाच्या खर्चाची जबाबदारी त्यांच्यावर टाकणे केव्हाही श्रेयस्कर.

घसारा असलेल्या वस्तू खरेदी करताना विचार करा – महागड्या मोटारी, भारीतल्या इलेक्ट्रॉनिक वस्तू, मोबाईल फोन घेण्याची प्रत्येकाची इच्छा असते परंतु त्या आपल्याला किती परवडणार आहेत याचाही विचार करा. तुमच्या आर्थिक उद्दीष्टांचा प्राधान्यक्रम ठरवून मगच अशा महागड्या वस्तूंवर खर्च करा. कधीही अशा गोष्टी कर्ज काढून खरेदी करू नका. कारण काळाच्या ओघात त्यांची किंमत वाढणार नसते. शून्य टक्के व्याजदराच्या योजना कितीही आकर्षक वाटत असल्या तरी वस्तूच्या किंमतीमध्येच प्रोसेसिंग फी आणि व्याजाची रक्कम समाविष्ट केलेली असते. त्याखेरीज अचानक उद्भवणाऱ्या अडचणींसाठी राखीव निधी आणि विमा नसेल तर तुमची बचत आणि गुंतवणूक काही दिवसात उडून जाऊ शकते. त्यामुळे लवकर निवृत्त व्हायचे असेल तर या सगळ्या मुद्यांचा तुम्हाला गांभीर्याने विचार करून त्यानुसार कृती करणे भाग आहे.

– चतुर


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)