आरोग्य विमा योजनेकडे माजी नगरसेवकांची पाठ

प्रशासनाची गटनेत्यांकडे धाव : माहिती उपलब्ध करुन देण्याचे साकडे

पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या माजी नगरसेवकांना आरोग्य विमा योजना लागू करण्याचा प्रस्ताव महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात आला आहे. या योजनेत सहभागी होण्याकरिता कुटुंबाची माहिती उपलब्ध करुन देण्याचे आवाहन करुनही त्याला फारसा प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळे महापालिका आयुक्तांनी सर्व राजकीय पक्षांच्या गटनेत्यांकडे धाव घेतली आहे. आपल्या पक्षाच्या माजी नगरसेवकांची नावे व त्यांची कौटुंबिक माहिती उपलब्ध करुन द्यावी, अशी मागणी केली आहे.

-Ads-

पिंपरी-चिंचवड महापालिका आस्थापनेवर कार्यरत असलेल्या सुमारे साडे सात हजार अधिकारी व कर्मचाऱ्यांना 1 सप्टेंबर 2015 पासून धन्वंतरी स्वास्थ योजना लागू करण्यात आली आहे. त्यानुसार वैद्यकीय उपचारांकरिता पिंपरी-चिंचवडबरोबरच पुणे व ग्रामीण भागातील रुग्णालयांचा यात समावेश करण्यात आला आहे. या योजनेअंतर्गत कर्मचाऱ्यांच्या स्वःहिस्स्यापोटी त्यांच्या वेतनातून दरमहा 300 रुपये वर्गणीच्या माध्यमातून कपात केले जातात. ही योजना महापालिकेच्या सेवानिवृत्त कर्मचारी व अधिकाऱ्यांना देखील लागू करण्यात आली आहे. तर सेवानिवृत्तांच्या वेतनातून 150 रुपये कपात केली जाते. त्यामुळे सेवानिवृत्तीनंतर देखील माजी कर्मचाऱ्यांना धन्वंतरी योजनेचा लाभ मिळतो.

या धर्तीवर, महापालिका सभा ठराव क्र. 680, दि. 13/5/2015 अन्वये ही योजना माजी नगरसेवकांना लागू करण्यासाठी त्यांच्याकडून 25 टक्‍के तर महापालिकेने 75 टक्‍के हिस्सा भरण्यास मान्यता देण्यात आली आहे. त्यानंतर ही योजना लागू करण्यासाठी महापालिका प्रशासनाकडून माजी नगरसेवकांची माहिती संकलित करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. आतापर्यंत न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीकडून शहरातील एकूण 82 माजी नगरसेवकांची माहिती संकलित करण्यात आली आहे. तसेच संजीवन विमा योजना नगरसदस्य स्वःहिस्सा लेखाशिर्षावर जमा करण्याबाबत 2 जानेवारी 2017 रोजी आदेश देण्यात आले आहेत. या 82 नगरसेवकांव्यतिरिक्त अन्य माजी नगरसेवकांकडून देखील या आरोग्य योजनेचा लाभ देण्याची महापालिका प्रशासनाकडे मागणी होऊ लागली आहे.

दरम्यान, या मागणीनुसार माजी नगरसेवकांच्या कुटुंबाची माहिती घेण्याचा प्रयत्न करुनही सर्व राजकीय पक्षांच्या माजी नगरसेवकांची माहिती प्रशासनाला अद्यापही मिळू शकलेली नाही. त्यामुळे आता माजी नगरसेवकांसह त्यांच्या कुटुंबियांची माहिती उपलब्ध करुन देण्याची मागणी गटनेत्यांकडे केली आहे. याबाबत सत्ताधारी भाजप, राष्ट्रवादी, मनसे आणि शिवसेना गटनेत्यांशी पत्रव्यवहार करण्यात आला आहे.

हे असणार लाभार्थी…
माजी नगरसेवकांसाठी ही योजना लागू करताना महापालिका कर्मचाऱ्यांच्या धर्तीवरच ही योजना लागू केली जाणार आहे. यामध्ये माजी नगरसेवक व त्यांची पत्नी तसेच 21 वर्षांच्या आतील दोन मुले यांना योजनेचा लाभ दिला जाणार आहे.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)