आरोग्य विभागाचा ठेकेदारांना दणका

पिंपरी – किमान वेतन दिल्याचा पुरावा सादर करण्यासाठी “बॅंक स्टेटमेंट’ सादर न करु शकलेल्या दोन ठेकेदारांचे तीन महिन्यांचे बील महापालिकेच्या आरोग्य विभागाने रोखले आहे. त्यामुळेच कंत्राटी कामगारांना तीन महिन्यांचे वेतन मिळू न शकल्याची बाब उघडकीस आली आहे. त्यामुळे हे “स्टेटमेंट’ सादर कसे करावे, असा गहन प्रश्‍न या ठेकेदारांना पडला आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेत कायमस्वरुपी असलेले 1 हजार 700 सफाई कर्मचारी तर कंत्राटी तत्त्वावर 1 हजार 529 कर्मचारी कार्यरत आहेत. या कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून शहरातील स्वच्छता राखली जाते. सात ठेकेदारांच्या माध्यमातून कंत्राटी कर्मचारी पुरविले जातात. या सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांना ईएसआय, पीएफ व किमान वेतन दिले जात नसल्याच्या अनेक तक्रारी या कर्मचाऱ्यांच्या संघटनांकडून महापालिका प्रशासनाला प्राप्त झाल्या होत्या.

त्यामुळे नव्याने काढलेल्या निविदांमध्ये या सर्व कर्मचाऱ्यांना या सुविधा पुरविण्यासह कर्मचाऱ्यांची “बायोमेट्रीक’ हजेरी असण्याचा नियम, अटी व शर्तींमध्ये समावेश करण्यात आला. त्यामुळे बहुतांशी सर्वच ठेकेदारांनी या कर्मचाऱ्यांना “ईएसआय’ व “पीएफ’ सुविधा पुरवायला सुरुवात केली आहे. मात्र, किमान वेतनाची अंमलबजावणी करण्यासाठी या सर्व कर्मचाऱ्यांचे बॅंकेत खाते उघडून, त्यामध्ये वेतन असलेल्या 15 हजार 550 रकमेतून “ईएसआय’ व “पीएफ’ची वजावट वगळता 11 हजार 500 रुपये जमा असणे आवश्‍यक होते. याकरिता महापालिकेच्या वतीने या ठेकेदारांना कर्मचाऱ्यांच्या वेतनाव्यतिरिक्त दहा टक्के सेवा शुल्क देण्यात आले आहे.

बहुतांशी सर्व ठेकेदारांनी या कर्मचाऱ्यांना “ईएसआय’ व “पीएफ’ या सुविधा पुरवत असल्याचे कागदोपत्री पुरावे महापालिकेच्या आरोग्य विभागाला सादर केले होते. मात्र, कर्मचाऱ्यांच्या बॅंक खात्यात किमान वेतनाची रक्कम जमा झाल्याचे “बॅंक स्टेटमेंट’ उपलब्ध करुन देण्यात अपयशी ठरलेल्या शुभम एन्टरप्रायजेस व डी. एम. एन्टरप्रायजेस या दोन ठेकेदारांच्या मार्च, एप्रिल, मे व जून या चार महिन्यांच्या बीलांची रक्कम रोखण्यात आली आहे. वास्तविक पाहता, महापालिकेच्या आठही प्रभाग कार्यालयांमधून या सर्व बाबींची पूर्तता करुन, ठेकेदाराच्या बीलांबाबतचा निर्णय घेणे अपेक्षित असताना, तसे प्रयत्न होत नसल्यानेच या कंत्राटी कामगारांनी महापालिका मुख्यालयावर धडक मोर्चा काढला होता.

दरम्यान, अनेक कर्मचाऱ्यांनी आपले एटीएम ठेकेदाराने काढून घेतले असून, परस्परपणे आपल्या बॅंक खात्यामधून वेतनाची रक्कम काढून घेतली जात असल्याची तक्रार महापालिका प्रशासनाकडे केली होती. तसेच, याबाबत विचारणा केली असता, कामावरुन काढून टाकण्याची धमकी दिली जात असल्याची तक्रार आरोग्य विभागाकडे केली आहे. तसेच या ठेकेदारावर कारवाई करण्यासंदर्भात पोलिसांकडेही धाव घेतली आहे.

ठेकेदारांचे काम नियमानुसार होत आहे की नाही, याची तपासणी करुनच महापालिकेच्या वतीने कामाची बीले अदा केली जातात. शुभम एन्टरप्रायजेस व डी. एम. एन्टरप्रायजेस या दोन ठेकेदारांच्या वतीने “बॅंक स्टेटमेंट’ सादर न केल्याने त्यांची बीले रोखण्यात आली आहेत. मात्र, कंत्राटी कर्मचाऱ्यांची ठेकेदाराकडून “एटीएम कार्ड’ काढून घेण्याची तक्रार महापालिका प्रशासनाशी संबंधित नसल्याने, यावर आरोग्य विभाग कोणताही निर्णय घेऊ शकत नाही.
– मनोज लोणकर, सहाय्यक आयुक्‍त, आरोग्य विभाग, महापालिका.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)