#आरोग्य: मद्यपानाला ब्रेक! 

श्रीकांत देवळे 
संसार उद्‌ध्वस्त करी दारू बाटलीस स्पर्श नका करू ही जाहिरात पूर्वी टीव्हीवर अनेकदा पाहिली असेल आणि मद्यपानामुळे होणाऱ्या शारीरिक, कौटुंबिक आणि सामाजिक समस्या देखील आपण पाहिल्या असतील. पण अतिमद्यपानावर आता मात करता येणे शक्‍य होणार आहे. संशोधकांनी मानवी शरीरातील असे जनुक शोधून काढले आहे जे मद्यपींना एका मर्यादेपेक्षा अधिक दारू पिण्यापासून परावृत्त करते. “बीटा क्‍लोथो’ असे या जनुकाचे नाव आहे. हे जनुक अतिमद्यपान करण्याच्या इच्छेत अडथळा आणते.
मद्य आणि मद्यपी व्यक्ती यांच्याकडे पाहण्याचा भारतीय दृष्टिकोन जगाहून भिन्न असला तरी प्राचीन भारतात मद्य किंवा दारू यांची उपलब्धता राहिली होती हेही तितकेच खरे आहे. मद्यपान युगानुयुगे सुरू आहे. पण सभ्यतेच्या कल्पनांमुळे समाजाने मद्यपानाला कधीही सार्वत्रिक मान्यता दिली नाही. कारण मद्यपानानंतर व्यक्तीचा विवेक हरवतो आणि तो उद्दाम, बेफिकीर होतो. अशी व्यक्ती कोणतेही चुकीचे वर्तन करु शकते. कारण त्याचे त्याच्या मेंदूवरील नियंत्रण हरपते. विविध प्रकारच्या गुन्ह्यांमधील व्यक्‍तींनी गुन्हा घडण्यापूर्वी केलेले मद्यप्राशन हे बरेच काही सांगून जाणारे आहे.
अनेक देशांमध्ये मात्र मद्यपानाकडे नैतिकता किंवा चारित्र्यहीन या दृष्टीने पाहिले जात नाही. काही देशांमध्ये तर सामाजिक पेय म्हणूनही याकडे पाहिले जाते. मात्र तरीही मद्यपान आणि मद्यपी यांच्यामुळे समाजाला बहुतांश वेळा त्रास होतो हे वास्तव आहे. व्यसनी लोक समाज आणि कुटुंब यांच्यासाठी सामाजिक आणि आर्थिक समस्या निर्माण करतातच; पण सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील बोजाही वाढवतात. एका अभ्यासानुसार संपूर्ण जगात प्रत्येक वर्षी अतिमद्यपानामुळे 30 लाख लोकांचा मृत्यू होतो. यापैकी काहींचा मृत्यू मूतखडा आणि यकृत खराब झाल्यामुळे होतो. त्याशिवाय दारु पिऊन गाडी चालवण्यामुळे लाखो लोकांचा अपघातात मृत्यू होतो. मद्यापानाची सवय ही संशोधकांसाठी एक दीर्घकालीन आव्हान बनलेली आहे. अनेकदा मद्यपी हा व्यसनी असतो पण तो एकाएकी दारु सोडून देतो. दुसरीकडे काही जण दीर्घकाळार्पंत नियमितपणाने थोडीच दारू पिऊ शकतात.
अर्थात, काही लोक असेही असतात जे आजन्म दारूत बुडालेले असतात. या सर्वांमागची कारणे असावीत याबाबत वैज्ञानिकांमध्ये नेहमीच कुतुहल राहिले आहे. वैज्ञानिकांना कायमच आव्हान वाटत आले आहे. पण आता या विचित्र कोड्याचे उत्तर शोधण्यात यश आले आहे. संशोधकांनी मानवी शरीरातील असे जनुक शोधून काढले आहे जे मद्यपींना एका मर्यादेपेक्षा अधिक दारु पिण्यापासून परावृत्त करते. “बीटा क्‍लोथो’ असे या जनुकाचे नाव आहे. हे जनुक अतिमद्यपान करण्याच्या इच्छेत अडथळा आणते.
अमेरिकेत टेक्‍सास विद्यापीठात यासाठी एक लाख लोकांवर संशोधन केले गेले. त्यातून असा निष्कर्ष काढण्यात आला की ज्या लोकांमध्ये वीटा क्‍लोथो नावाचे जनुक होते त्यांना दारू पिण्याची सवय किंवा व्यसन जडलेले नाही. यासंदर्भात उंदरांमध्ये हे जनुक टाकून एक प्रयोग केला. वीटा क्‍लेथो नावाचे हे जनुक व्यक्तीच्या यकृतामध्ये निर्माण होते. या हार्मोनची परिणाम करण्याची प्रक्रिया खूप गुंतागुंतीची असते. मात्र शरीरात हे हार्मोन्स सक्रीय झाल्यावर मद्यपींच्या मेंदूपर्यंत अती प्रमाणात मद्यप्राशन केल्याचा आणि आता ते थांबवण्याचा संदेश पोहोचतो. या प्रयोगादरम्यान वैज्ञानिकांनी मद्यपींच्या सवयींची एक परिभाषा निर्माण केली. ज्या व्यक्ती आठवड्यातून 21 किंवा त्याहीपेक्षा अधिक पेग मद्याचे सेवन करतात त्यांना अतिमद्यपानाच्या श्रेणीमध्ये ठेवले गेले.
कसे सुटणार व्यसन 
आता शास्त्रज्ञांचे दोन प्रकारे दारु सोडवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. पहिल्या प्रकारामध्ये मद्यपींना वीटा क्‍लोथो हार्मोन्सपासून निर्माण केलेले औषध देता येईल का यावर विचार सुरू आहे. कोणतीही नैतिकता न शिकवता मद्यपी स्वतःच हे औषध घेतील आणि दारूमुक्त होतील अशा प्रकारे याबाबत विचार सुरू आहे. अर्थात या उपचारांचा परिणाम सीमित असेल. कारण जेव्हा मद्यपी नियमितपणे औषधांचे सेवन करत राहील तोपर्यंतच त्यांचे जास्त दारू पिण्यावर अंकुश राहणार आहे. औषध घेणे सोडल्यावर तो पुन्हा पूर्वस्थितीला येऊ शकतो. दुसरी पद्धत अशी की मद्यपी व्यक्तीच्या शरीरातच वीटा क्‍लोथो जनुकांचे प्रत्यारोपण करणे. असे केल्यामुळे सतत औषधे पिण्याची गरजच भासणार नाही असे संशोधकांचे म्हणणे आहे. जगामध्ये अशा प्रकारची जीन्स थेरेपी विकसित झाली आहे. त्याच्या मदतीने जीन्स प्रत्यारोपण हे काही कठीण काम नाही. अर्थात वीटा क्‍लोथो नावाच्या जनुकाच्या प्रत्यारोपणाचे काम लगेच होईल असे नाही. पण ते केल्यानंतर मात्र अतिमद्यपानाला लगाम बसू शकेल असे संशोधकांना वाटते.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)