आरोग्य केंद्रास नगरसेवकांनीच ठोकले टाळे

कामकाज बंद पडल्याने रुग्णांचे झाले हाल

शेवगाव – शहराच्या मध्यवर्ती पैठण रस्त्यावर असलेल्या जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रास नगरपालिकेच्या सत्ताधारी काही नगरसेवकांनी टाळे ठोकल्याने तेथील कामकाज बंद पडले. यामुळे रुग्णांचे हाल झाले. यावर पंचायत समिती व आरोग्य खात्याने मात्र गुन्हा दाखल करण्याऐवजी फक्त कागदी घोडे नाचविण्याचे काम केले. या इमारतीत पोलीओ व गोवर- रुबेला या लसींबरोबरच गरोदर मातांना देण्यात येणारे तसेच इतर जिवनावश्‍यक औषधे असलेल्या खोलीलाही टाळे ठोकण्यात आल्याने काही गावात रुग्णांना ती लस देता आली नाही.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

शहरातील पैठण रस्त्यावर सुरु असलेले जिल्हा परिषदेचे प्राथमिक आरोग्य केंद्र शहरातील रुग्णांसाठी सोयीस्कर असल्याने येथे रुग्णांची नियमीत उपचारासाठी गर्दी असते. जिल्हा लोकल बोर्डाच्या स्थापनेपासून येथे डिस्पेन्सरी होती. तर पंचायत राज स्थापन झाल्यानंतर येथे जिल्हा परिषदेचे प्राथमिक आरोग्य केंद्र सुरु करण्यात आले. या जागेच्या नमुना क्रमाक 8 अ वर जिल्हा परिषद प्राथमिक आरोग्य अशी नोंद आहे. या आवारातच डॉक्‍टर व सेवकांची निवासस्थानेही आहेत.

नवीन नगरपालिकेच्या स्थापनेनंतर प्राथमिक आरोग्य केंद्र अन्यत्र हलविण्याचा शासन निर्णय झालेला असला तरी ही जागा अत्यंत मोक्‍याच्या ठिकाणी असल्याने नगरपपालिकेने या नोंदीला कंस करुन शेवगाव नगरपालिकेचे नाव लावल्याचे समोर आले आहे. वास्तविक हा विषय स्थानिक नसून शासन पातळीवरील आहे हे समजण्याची जाण नसावी याबद्दल जाणकार चिंता व्यक्त करत आहेत. या प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अशोक भवारी यांनी तालुका आरोग्य अधिकाऱ्यांना पत्र देवून संबंधीत टाळे ठोकणाऱ्यांविरुध्द कायदेशीर करण्याबाबतचे आदेश दिले.

मात्र यात कुणाचेही नाव घातले नसल्याने त्यांच्यावर राजकीय दबाव आहे काय, याविषयी तर्कवितर्क लढवण्यात येत आहेत. याबाबतच्या प्रती तहसीलदार पोलीस निरीक्षक यांना देण्यात आल्या आहेत. शेवगाव पंचायत समिती राष्ट्रवादीकडे तर नगरपालिका भाजपाकडे असल्याने एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न होत असल्याचे या घटनेतून स्पष्ट होते. या संदर्भात दोन्ही ठिकाणच्या अधिकारी व पदाधिकाऱ्यांच्या प्रतिक्रीया समजून घेण्यासाठी संपर्क साधला असता त्यानी प्रतिसाद दिला नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)