आरोग्य केंद्रांना सीसीटीव्हीचे कोंदण

35 आरोग्य केंद्रात यंत्रणा कार्यान्वित होणार 


सर्व केंद्रे इंटरनेटद्वारे जोडणार

पुणे- जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र डिजीटल करण्यात येणार असून, तेथील आरोग्य सेवा सुरळीत चालते का? त्यावर देखरेख ठेवण्यासाठी सीसीटीव्ही बसवण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील 35 प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये हे सीसीटीव्ही यंत्रणा बसवण्यात येणार असून, ही सर्व केंद्र इंटरनेटद्वारे जोडण्यात येणार आहे, अशी माहिती आरोग्य व बांधकाम सभापती प्रवीण माने यांनी दिली.

पुणे जिल्ह्यात 96 प्राथमिक आरोग्य केंद्र तर 534 आरोग्य उपकेंद्र आहेत. सध्या आरोग्य विभागाकडून उपकेंद्राची संख्या वाढवण्याचे काम प्रगतीपथावर असून, त्याला जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेने मान्यता दिली आहे. ज्या गावची लोकसंख्या तीस हजार किंवा त्यापेक्षा अधिक असेल त्या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्र उभारण्यात येते. गावातील नागरिकांना प्राथमिक उपचार मिळावे यासाठी या प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्राची उभारणी करण्यात आली आहे. दिवसभरात शेकडो नागरिक या केंद्रामध्ये उपचारासाठी येतात. परंतू, काहीवेळा केंद्रामध्ये डॉक्‍टर किंवा कर्मचारी नाही, स्वच्छतेचा अभाव, औषधांचा पुरेशा साठा नाही, रूग्णांची हेळसांड होते अशा अनेक तक्रारी आरोग्य विभागाकडे आल्या आहेत.

या तक्रारींची दखल घेत आणि प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रातील कामकाज सुरळीत सुरू रहावे, रूग्णांना वेळेत आणि चांगले उपचार मिळतात का? डॉक्‍टर, परिचारिका आणि कर्मचारी आरोग्य केंद्रात वेळेत येतात का? तेथील कामकाज कशा पध्दतीने सुरू आहे तसेच तेथील स्वच्छता, शिस्त या सर्व बाबींवर लक्ष ठेवण्यासाठी सीसीटीव्ही बसवण्यात येणार आहे. या प्रस्तावाला मान्यता मिळाली असून 20 लाख रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

त्यानुसार पहिल्या टप्प्यात 35 आरोग्य केंद्रामध्ये हे सीसीटीव्ही बसवण्यात येणार आहेत. त्याबाबतची प्रक्रिया सुरू असून येत्या काही दिवसातच कॅमेरे बसवण्याच्या कामाला सुरवात होईल. तसेच हे आरोग्य केंद्र इंटरनेटद्वारे जोडले जाणार असून, जिल्ह्यातील आरोग्य केंद्रामधील कामकाज जिल्हा परिषदेत बसून अधिकाऱ्यांना पाहता येणार आहे. त्यामुळे एकप्रकारे काही केंद्रामध्ये डॉक्‍टरांसह परिचारिका आणि कर्मचारी यांचा सुरू असलेल्या मनमानी कारभाराला आळा बसणार आहे.

जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र डिजीटल करण्यात येणार असून, काही केंद्रामध्ये सीसीटीव्ही लावण्यात येणार आहे. तसेच सर्व केंद्र इंटरनेटद्वारे जोडण्यात येणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील आरोग्य सेवा चांगल्या पध्दतीने सुरू ठेवण्यासाठी मदत होईल.
– प्रवीण माने, सभापती, आरोग्य आणि बांधकाम, जिल्हा परिषद.


प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात सहा सीसीटीव्ही बसवण्यात येणार आहे. त्यामुळे आरोग्य केंद्रातील कामकाजावर लक्ष केंद्रीत राहणार आहे. त्यासाठी वीस लाख रूपयांचा निधी मंजूर झाला. जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि आरोग्य सभापती यांच्या प्रयत्नातून येत्या काही दिवसातच ही यंत्रणा बसवण्याच्या कामाला सुरवात होईल.
– डॉ. दिलीप माने, आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)