आरोग्य केंद्रांच्या रुग्णवाहिकाच “व्हेंटिलेटर’वर

– सागर येवले

पुणे – जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांकडील रुग्णवाहिका “शेवटच्या घटका’ मोजत असून काहींनी “दम’ सोडल्यामुळे त्या धूळखात पडून आहेत. वारंवार दुरूस्ती करूनही त्या व्यवस्थित होत नाही. त्यामुळे नवीन रुग्णवाहिका मिळण्याबाबत जिल्हा परिषद आरोग्य विभागाने राज्य शासनाकडे प्रस्ताव पाठविला आहे. त्याला दोन वर्षे झाली, तरीही त्यावर अजून कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे या प्रस्तावावरील धूळ कधी झटकणार आणि जिल्ह्याला रुग्णवाहिका कधी मिळणार, असा प्रश्‍न आहे.

-Ads-

पुणे जिल्हा परिषदेत 96 प्राथमिक आरोग्य केंद्र (पीएचसी) आहेत. प्रत्येक आरोग्य केंद्रासाठी एक रुग्णवाहिका आहे. परंतु, यातील काहींचे “लाइफ’ संपत आले आहे. यातील काही वाहने आठ ते नऊ वर्षे जुनी असल्याने वारंवार दुरुस्ती करूनही ऐनवेळी रस्त्यात बंद पडण्याचे प्रकार अनेकवेळा घडले आहेत. त्यामुळे रुग्णाला उपचार मिळण्यास अडचणी येत आहेत. अशा परिस्थितीत रुग्णाला वेळेत उपचार देण्यासाठी किंवा प्राथमिक आरोग्य केंद्रातून जिल्हा रूग्णालयात दाखल करताना डॉक्‍टर आणि रुग्णवाहिका चालकांची दमछाक होते. त्यामध्ये जिल्ह्यातील 11 ठिकाणच्या रुग्णवाहिका ह्या दुरूस्तच होऊ शकत नसल्याने त्या नवीन मिळाव्या, असा प्रस्ताव आरोग्य विभागाने उपसंचालक आणि परिवहन विभाग आरोग्य सेवा उपसंचालकांना डिसेंबर-2016 आणि जानेवारी-2017 मध्ये पाठविला आहे. मात्र, त्याबाबत राज्य शासनाकडून कोणतीच कार्यवाही झाली नसल्याचे दिसून येते. त्यामध्ये जोगवडी, नेरे प्राथमिक आरोग्य केंद्र ता. भोर, कडूस, वाडा आणि वाफगाव केंद्र ता. खेड, करंजावणे, ता. वेल्हा , कुंजीरवाडी ता. हवेली, निरवांगी आणि शेळगाव ता. इंदापूर, कार्ला ता. मावळ, लांडेवाडी ता. आंबेगाव या केंद्रांना रुग्णवाहिकेची अत्यावश्‍यक गरज आहे. असे असताना शासनाची दिरंगाई ही रुग्णाच्या जीवावर बेतू शकते.

जीव गेल्यावर रुग्णवाहिका मिळून काय उपयोग?
“रुग्णवाहिका’ ही रुग्णाला वेळेत उपचार देणारी आणि जीवदान देणारी वाहिनी आहे. मात्र, प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही रुग्णवाहिका नादुरूस्त आणि वेळोवेळी रस्त्यामध्येच बंद पडत असल्याने रुग्णाच्या जीवाला धोका होण्याची भीती अधिक आहे. त्यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्राला लवकरात लवकर रुग्णवाहिका मिळावी, एखाद्याचा जीव गेल्यावर रुग्णवाहिका देणार का? असा संतप्त प्रश्‍न नागरिकांनी उपस्थित केला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)