आरोग्यासाठी योग

 

21 जून हा आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा करण्याची घोषणा 11 डिसेंबर 2014 रोजी संयुक्‍त राष्ट्राच्या परिषदेत झाली. त्यामुळे दरवर्षी जगभर 21 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला जाणार आहे.

योगाचे मूळ
भगवतगीता हा हिंदू धर्मातील अतिशय पवित्र आणि मूलभूत ग्रंथ मानला जातो. या ग्रंथात योगाचा उल्लेख आढळतो. बुद्धियोग, संन्यासयोग, कर्मयोग.
योग हा शब्द संस्कृत युज या शब्दापासून बनला आहे. ज्याचा अर्थ होतो जोडणे किंवा एकत्रित करणे.
सहाव्या शतकात संस्कृत व्याकरणकार पाणिनी यांनीही योग हा शब्द युज या संस्कृत शब्दापासून आला असे सांगितले, पतंजली यांनीही हाच अर्थ सांगितला आहे. पाणिनी आणि व्यासांनी सर्वप्रथम योगसूत्र नावाने योगाबद्दल लिहिले. त्यांच्या दृष्टीने योग म्हणजे समाधी होय. मनुष्याला मोक्षापर्यंत नेणारा मार्ग म्हणजे योग अशीही योगाची व्याख्या आहे.
शरीर, मन आणि आत्मा यांना एकत्रित आणून मोक्षाची किंवा मन:शांतीची अत्युच्च पातळी गाठणे म्हणजे योग अशी योगाची आधुनिक व्याख्या आहे.
पतंजली यांनी लिहिलेली योगसूत्रं ही हिंदू तत्त्वज्ञानात प्रमुख योगसूत्र मानली जातात. या योगसूत्रांना पतंजली यांनी राजयोग म्हणजे राजासाठी योग असे संबोधले, म्हणजेच समाधी अवस्थेला नेणारा तो राजयोग. स्वामी विवेकानंद यांनी या योगसूत्रांचा अभ्यास करून त्याला अष्टांग योग हे नाव दिले. अष्टांग योगात यम आणि नियम यांचा समावेश झाला. हठयोग ज्याला हठविद्या असेही म्हणतात. आसनाद्वारे शरीर आणि प्राणायामांचा समावेश होतो. अष्टांग योग म्हणजेच सध्या आपण जी योगविद्या शिकतो तो योग वर्षापूर्वी याचा उगम झाला. अष्टांग म्हणजे आठ अंग अर्थात अवयव आणि आध्यात्म यांची सांगड आहे. यात यम, नियम, आसने, प्राणायाम, पत्यहरा, धारणा, ज्ञान आणि समाधी या आठ गोष्टींचा समावेश होतो.

योगाभ्यासाचे फायदे :
1. योगाभ्यासामुळे शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक लाभ होतो. आजच्या तणावपूर्ण आणि असुरक्षित जगण्यात योगाभ्यास शारीरिक आणि मानसिक स्वस्थतेसाठी मानवजातीला मोठे वरदान आहे.
2. आजच्या आधुनिक जिममध्ये जाण्याने शरीराच्या कुठल्या तरी विशिष्ट भागाचा व्यायाम होतो. योगाभ्यासामुळे मात्र शरीराच्या सर्व अंग-प्रत्यांगात ग्रंथींना व्यायाम मिळतो. त्यामुळे संपूर्ण शरीर कार्यरत राहातं.
3. योगाभ्यासामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते. वृद्धत्व लवकर येत नाही. चेहऱ्यावर तेज येतं. शरीर स्वस्थ, निरोगी आणि बलवान होतं.
4. योगाभ्यासामुळे शरीर लवचिक आणि शरीरातील मांसपेशी पुष्ठ होतात. यामुळे योगाभ्यास कृश, दुर्बल व्यक्‍तीला बलवान बनवतो तर दुसरीकडे योगाभ्यासामुळे शरीरातील चरबी कमी होते. त्यामुळे दुर्बल आणि स्थूल दोन्ही व्यक्‍तीसाठी योगाभ्यासाचा फायदा होतो.
5. नियमित योगाभ्यासामुळे शरीरातील सर्व मांसपेशींना उत्तम व्यायाम होतो. ज्यामुळे मानसिक तणाव दूर होऊन चांगली झोप येते, उत्तम भूक लागते आणि पचन चांगले होते.

प्राणायामाचे लाभ : प्राणायामामुळे श्‍वास-उच्छवासाच्या गतीवर नियंत्रण ठेवता येते. ज्यामुळे श्‍वसन संस्थेशी निगडित रोगांमध्ये खूप फायदा होतो. दमा, ऍलर्जी, सायनोसायटिस, सर्दीसाठी प्राणायाम खूप लाभकारी ठरतो. नियमित प्राणायामामुळे फुप्फुसांची प्राणवायू ग्रहण करण्याची क्षमता वाढते. शरीरातील कोशिकांना जास्त प्राणवायूचा पुरवठा झाल्याने संपूर्ण शरीरावर सकारात्मक परिणाम होतो.
ध्यानधारणा : ध्यानधारणा हे देखील योगाभ्यासाचे महत्त्वपूर्ण अंग आहे. ध्यानधारणेचा म्हणजेच मेडिटेशनचा प्रचार परदेशात जास्त होतो आहे. आजच्या भोगवादी आणि भौतिक संस्कृतीत दिवस-रात्र धावपळ, कामाचा ताण, संबंधात अविश्‍वास, बिघडलेले नातेसंबंध, सामाजिक विषमता, असुरक्षितता यामुळे ताणतणावाचं प्रमाण खूप वाढलं आहे. अशा स्थितीत मेडिटेशन खूप लाभदायी आहे. यामुळे मानसिक तणाव दूर होऊन गहन आत्मिक शांती मिळते. कार्यशक्‍ती वाढते. उत्तम झोप येते. मनाची एकाग्रता आणि धारणाशक्‍ती वाढते.
आजारावर नियंत्रण : नियमित योगाभ्यासाने रक्तातील वाढलेल्या साखरेचे प्रमाण कमी होते. तसेच एलडीएल म्हणजेच वाईट कोलेस्ट्रोलचे प्रमाण कमी होते. त्यामुळे मधुमेहींनी नियमित योगाभ्यास केल्यास त्यांना फायदा होतो, या व्यतिरिक्‍त काही योगासनांमुळे आर्थरायटिस, पाठीचं दुखणं, कंबरेचं दुखणं, मानेचं दुखणंही कमी होतं. तसंच उच्च रक्‍तदाब, टाईप टू डायबिटीज यावरही योगाभ्यास उपयुक्‍त आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)