आरोग्यदायिनी लसूण

कोणतंही चमचमीत, चटकदार खाणं असो की तिखट रश्‍श्‍याची भाजी त्यात लसूण असायलाच हवी. लसूण चटणी तर आपल्या महाराष्ट्रात सर्वत्र लोकप्रियच आहे… चुर्रर्रर्र आवाज करत फोडणीत लसूण पडला की जो काही खमंग वास पसरतो, तो आजूबाजूच्या सात-आठ घरांना तरी दरवळून टाकतोच.
गौतम धर्मसूत्र, मनुस्मृती, याज्ञवल्क्‍य स्मृती, महाभारत, सुश्रुत संहिता, चरक संहिता इ. प्राचीन ग्रंथांमधून लसणाचा उल्लेख अनेकवेळा केलेला आढळतो. कच्चा लसूण आयुर्वेदामध्ये औषधी म्हणून गौरविला गेला आहे. आयुर्वेदात मधुर, खारट, आंबट, तुरट, कडू आणि तिखट अशा सहा चवींचा उल्लेख आढळतो. लसूण ही अशा दुर्मिळ वनस्पतींपैकी एक आहे की, ज्यामध्ये आंबट सोडून इतर पाचही चवींचे अस्तित्व आढळते. लसणामध्ये ऍन्टीएजिंग गुण आहे. याशिवाय ती उष्ण, हृदयासाठी टॉनिक, पाचक, सारक, डोळ्यांसाठी उत्तम, पोषक व वर्धक, दमा-अस्थमा या रोगांसाठी गुणकारी अशी आहे. थोडी काळजीपूर्वक वापरल्यास लसूण ही उत्तम आरोग्यादायिनी ठरू शकते.
मराठीत आपण लसूण म्हणतो, तर हिंदीत लहसून आणि इंग्रजीत रीश्रळल म्हणतात. हिचे शास्त्रीय नाव आहे अश्रश्रर्ळीा ीरींर्ळीीां ङळपप. आणि कूळ आहे ङळश्रळरलशरश.
“कृमिकुष्ठकिलासघ्नो वातघ्नो गुल्मनाशन: ।
स्निग्धश्‍चोष्णश्‍च वृष्यश्‍च लशुन: कटुको गुरु: ।। (चरकसंहिता).
संस्कृतमध्ये लसणाला म्लेन्छगन्धा, यवनेष्ठा, लशून, महौषधा, महाकंद, वातारि, दीर्घपत्रका, रसोना अशी अनेक नावे आहेत.
लसणाचे अनेक गुणकारी व औषधी उपयोग आहेत. लसणाच्या नियमित सेवनाचे अनेक फायदे आहेत. कितीतरी लोक याच्या उग्र वासामुळे लसूण खाण्याचे टाळतात. सुमारे पाच हजार वर्षांपासून भारतीयांच्या खाण्यात असलेल्या लसणाचे औषधी उपयोग जाणून घ्यायलाच हवेत, नाही का?
ब्लडशुगर व मधुमेह नियंत्रित करण्यासाठी लसूण महत्त्वाचे काम करते. रोज लसणाची एक कच्ची पाकळी चावून खाल्ल्याने शरीरातील इन्शुलिनचे प्रमाण वाढते व रक्‍तातील साखर प्रमाणात राहते. तसेच यामधील ऍलीसीन तत्त्व ब्लडप्रेशर नॉर्मल ठेवते. शरीरातील अतिरिक्‍त चरबी कमी करण्यातही लसूण महत्त्वाचे काम करतो. यामधील कॅल्शियम सांधेदुखी दूर करण्यास सक्षम असते. लसूण खाण्याने सांधेदुखीतील वेदना कमी होतात. हृदयासाठी लसूण खूप फायदेशीर आहे. यामधील एजोईन तत्त्व रक्‍ताच्या गुठळ्या होण्यास प्रतिबंध करते व रक्‍ताभिसरणास चालना देते.
यामुळे हृदयाच्या बऱ्याच समस्या दूर करण्यात सहायक ठरते. लसणामधील ऍन्टिऑक्‍सिडन्ट घटक अल्झायमर व डिमेनशिया यासारखे आजार दूर करण्यास सक्षम आहेत. यामध्ये असणारे आयोडीन, थायरॉईड ग्रंथीचे काम सुरळीत करण्यात मदत करते. यातील जीवनसत्त्व ‘बी-सहा’मुळे रोगप्रतिकारक शक्‍ती वाढते. लसणातील ऍन्टिबॅक्‍टेरियल गुणधर्मामुळे जंतुसंसर्ग होण्यापासून शरीराचा बचाव होतो. कान जर दुखत असेल तर लसणाच्या तेलाचे दोन-तीन थेंब कानात टाकल्यास कानातील वेदना शांत होते आणि तिथे जर जंतुसंसर्ग असेल तर तोही बरा होतो. फुफ्फुसात कफ असेल, सर्दी, ताप असेल तर थोडी लसूण पेस्ट खाल्ल्याने फायदा होतो.
रोज थोडी कच्ची लसूण सकाळी रिकाम्या पोटी खाल्ल्याने पूर्ण दिवसभर शरीराला संरक्षक कवच लाभते आणि भरपूर शक्‍ती मिळते. लसूण शिजवल्यावर त्यातील औषधी तत्त्वे कमी होतात. म्हणून शक्‍यतो लसूण कच्चीच खावी, असा सल्ला दिला जातो.
दात दुखण्यावर लसूण अतिशय प्रभावी आहे. लगेच आराम हवा असेल तर दात व हिरड्यांवर लसणाचे तेल लावावे. किंवा कच्च्या लसणाची पेस्ट बनवून दुखऱ्या जागी लावावी. लसूण योग्य प्रमाणात खाल्ल्यास, पचनक्रिया नियंत्रित राहते व पचनशक्‍ती वाढते. लसणामुळे जठरातील पचनासाठी आवश्‍यक रस अधिक प्रमाणात स्रवतात. लसूण यकृताला शरीरातील विषारी द्रव्ये बाहेर काढण्यासाठी मदत करते. त्यामुळे यकृताचे काम उत्तमप्रकारे चालते. परंतु जर जास्त प्रमाणात लसूण खाल्ला तर पोटात आग पडते आणि छातीतही जळजळ होण्याची शक्‍यता असते.
लसणाचा सर्वात प्रभावी गुणधर्म आहे, कॅन्सरला प्रतिबंध करण्याचा. लसणातील ऍलील सल्फर कंपाऊंड हा घटक कॅन्सरच्या पेशींची वाढ होण्यास अटकाव करतो. जास्त प्रमाणात लसूण कधीही खाऊ नये. तोंडाला वास येण्याबरोबरच, पोट फुगणे, पोटात जळजळ, गॅस इ. त्रास होऊ शकतात. घसा खराब असेल, तिथे इन्फेक्‍शन व सूज असेल तर मध आणि लसूण पेस्ट एकत्र करून खावे. त्यामुळे घशातील खवखव कमी होऊन सूजही कमी होते.
लसणाच्या पाकळ्या जर कुंडीत पेरल्या तर चार-पाच दिवसातच तिथे हिरवेगार कोंब उगवतात. पातीच्या स्वरुपात लांबच लांब लसणाची पाने वाढू लागतात. ही कोवळी, हिरवीगार लसूणपात आपण कशातही लसणाच्या ऐवजी घालू शकतो. हिरव्या चटणीत लसूण पाकळ्यांऐवजी ताजा लसूणपात वापरून तर पाहा.. त्याचा एक वेगळाच रंग आणि स्वाद चटणीला येतो. या पातीचा रस काढून तोही औषधी आपल्याला वापरता येतो.
तर असा ही लसूण… बाजारात सहज मिळणारी, घरात नेहमीच असणारी, कुंडीतही विनासायास येणारी… तरीही असंख्य गुणांनी समृद्ध.. उपयोगी, औषधी.. अनेकजण हिच्या उग्र वासामुळे किंवा धार्मिक कारणांनी लसूण खाणे टाळतात. लसूण खाणे हा तामस आहार आहे असं मानलं जातं.. हे काही अंशी खरं असलं तरी लसणाच्या गुणांकडे आपण दुर्लक्ष करून चालणार नाही.. आरोग्यदायिनी लसूण आता आपल्या आहारात जरूर समाविष्ट करा.. पण योग्य प्रमाणातच !!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)