आरास-देखाव्यांच्या कलेचा लोप

शिर्डी, (प्रतिनिधी) – गणेशोत्सव म्हटलं की डोळ्यांसमोर सर्वप्रथम येतो तो म्हणजे आरास देखावा. शहरी भागातील सार्वजनिक गणेश मंडळे मोठ्या आकाराच्या गणेशमूर्ती बसविण्यातच आपापसात स्पर्धा निर्माण करू पाहत असल्यामुळे काळाच्या ओघात गणपतीचे आरास देखावे ही बहुचर्चित कला लोप पावत चालली असल्याचे चित्र बघावयास मिळत आहे.

श्रावण सरत आला की मग गणरायाच्या आगमनाचे वेध लागलेले असतात. गणेशोत्सव म्हटलं की, आपल्या सर्वांना वेध लागतात ते गणपतीची आरास, मोठमोठे देखावे बघण्याचे. पूर्वीच्या काळी गणेश मंडळे देखावे बनविण्यासाठी महिनाभरापासून अगोदरच तयारीला लागायचे. प्रसंगी मंडळाचे कार्यकर्ते आकर्षक देखावे करण्यासाठी रात्रंदिवस एक करायचे. डोळ्यासमोर दिसायचा तो सजावटींच्या वस्तूंनी फुललेला बाजार. प्लॅस्टिकच्या फुलांच्या माळा, मोत्यांचा हार, थर्माकोल आणि पत्र्यांवर नक्षीकाम केलेले मखर, पाट, चौरंग तसेच मखराच्या प्रकारांमधली विविधता पहायला मिळायची. त्यावेळी मंडळाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या उरात मोठा उत्साह असायचा. पूर्वी गणेशोत्सवाच्या 10 दिवसांत सार्वजनिक गणेश मंडळांत आकर्षक देखावे उभारण्यापेक्षा सांस्कृतिक व सामाजिक कार्यक्रमांची रेलचेल असायची. मात्र, गेल्या काही वर्षांत ती कमी झाली आहे. विविध सार्वजनिक गणेश मंडळांमध्ये रस्त्यांवर मंडळांचे देखावे पाहण्यासाठी महिला व बालगोपाळांची एकच गर्दी व्हायची.

मागील काही वर्षांपासून गणेश देखावे ही संकल्पनाच काळाच्या पडद्याआड लोप पावत चालली असल्याने गणेश मंडळांपुढे ना गर्दी दिसते ना रांगा दिसतात. गल्लोगल्लीतल्या गणेश मंडळांवर राजकीय नेत्यांनी वर्चस्व साधून मक्तेदारी मिळवली आहे. त्यामुळे बघ्यांच्या भाऊगर्दीसाठी सकाळ- सायंकाळच्या आरतीला बाहेरून सेलिब्रेटी आयात करायची वेळ येऊ घातली आहे. गणेश मंडळ कार्यकर्त्यांच्या डोक्‍यात काय सजावट करू, कोणतं मखर करायचं याखेरीज कोणकोणत्या प्रकारच्या लायटिंगच्या माळा वापरायच्या असे अनेक प्रश्न भेडसावत आहेत. पुढील काळात गणपतीची आरास हा विषय पूर्णतः बंद होईल की काय? अशी चिंता भाविकांना सतावत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)