आरबीआयने उघडला तिसरा डोळा 

नियमांचा भंग केल्यामुळे करूर वैश्‍य बॅंकेला ठोठावला पाच कोटी रुपयांचा दंड 
कारवाई केलेल्या बॅंकांची संख्या वाढू लागली 
मुंबई: नियमाप्रमाणे काम करा अन्यथा कडक कारवाईला सामोरे जा, असा संदेश रिझर्व्ह बॅंकेने सर्व बॅंकांना दिला आहे. गेल्या काही दिवसांत बॅंकेने अनेक बॅंकांवर कारवाई केली आहे. आता रिझर्व्ह बॅंकेने करूर वैश्‍य बॅंकेला 5 कोटी रुपयांचा दंड लावला आहे.
करूर वैश्‍य बॅंकेने उत्पन्न ओळख आणि मालमत्ता वर्गिकरणासंबधीचे नियम पाळले नसल्यामुळे या बॅंकेला पाच कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. या बॅंकेने नवी खाती उघडतांना पुरेशी काळजी घेतली नाही. त्याचबरोबर घोटाळ्याबाबत योग्य वेळी माहिती दिली नसल्याचे रिझर्व्ह बॅंकेने म्हटले आहे.
बॅंकेची अनुत्पादक मालमत्ता बेसुमार वाढल्यानंतर बॅंकांना शिस्त लावण्याचा प्रयत्न रिझर्व्ह बॅंकेकडून केला जात असल्याचे वातावरण सध्या आहे. त्याचबरोबर एनपीए कमी करण्यासाठी इतर उपाययोजना केल्या जात आहेत. करूर वैश्‍य बॅंकेवर कारवाई करण्याअगोदर काही तास रिझर्व्ह बॅंकेने नव्याने स्थापन झालेल्या आणि वेगाने वाढणाऱ्या बंधन बॅंकेवर कडक कारवाई केली होती.
रिझर्व्ह बॅंकेने बंधन बॅकेला आणखी शाखा उघडण्यास मज्जाव केला. त्याचबरोबर बॅंकेचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रशेखर घोष याचा पगार गोठविण्यास सांगितले. परवाना देताना ज्या अटी घालण्यात आल्या होत्या त्या अटीचा बॅंकेने भंग केला असल्यामुळे ही कारवाई करण्यात आली. बॅंकेच्या होल्डींग कंपनीचे बॅंकेत 40 पेक्षा जस्त भागभांडवल आहे, हे भांडवल कमी केले नसल्यामुळे बॅंकेला आता आणखी शाखा उघडता येणार नसल्याचे रिझर्व्ह बॅंकेने सांगितले आहे. त्याचबरोबर पुढील सूचना मिळेपर्यंत घोष यांचा पगार सध्याच्या पातळीवर गोठवला जाणार आहे. या बॅंकेच्या 937 शाखा आहेत. सोमवारी या बॅंकेच्या शेअरच्या भावावर काय परिणाम होतो याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.
त्या अगोदर रिझर्व्ह बॅंकेने येस बॅंकेचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी राणा कपूर यांना जानेवारीपासून पदभार सोडण्यास सांगितले आहे. त्यांनी अनुत्पादक मालमत्तेच्या वर्गीकरणाकडे लक्ष दिले नसल्यामुळे त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. संचालक मंडळाने कपूर यांना काही वेळ वाढवून मागितला आहे. त्यावर पुढील आठवड्यात निर्णय घेतला जाण्याची शक्‍यता आहे.
त्या अगोदर रिझर्व्ह बॅंकेने ऍक्‍सिस बॅंकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी शिखा शर्मा यांना चौथी मुदतवाढ देण्यास नकार सूचित केला होता. त्यांच्या कार्यकाळात बॅंकेची अनुत्पादक मालमत्ता वाढली त्याचबरोबर इतर काही बाबी घडल्यामुळे ही कारवाई करण्यात आली असल्याचे बोलले
जात आहे.
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)