“आरटीई’ प्रवेशाची पाचवी फेरी आज

पुण्यात पुन्हा अर्ज मागविणार नाही : तर राज्यात गरज पडेल तेथे अर्ज घेणार

  • राज्यात आतापर्यंत 48 टक्‍के जागांवर प्रवेश
  • प्रतिसाद मिळूनही पुण्यात 63 टक्‍के प्रवेश पूर्ण

पुणे – शिक्षण हक्‍क कायद्यांतर्गत देण्यात येणारे मोफत प्रवेश हे आता मे महिन्याच्या मध्यापर्यंत 50 टक्‍क्‍यांचा आकडाही गाठू शकलेले नाहीत. त्यामुळेच राज्यात गरज पडेल तेथे पुन्हा अर्ज भरुन घेतले जाणार असल्याचे राज्याच्या प्राथमिक शिक्षण विभागाचे उपसंचालक शरद गोसावी यांनी सांगितले आहे. तर पुण्यात मागणी नसल्यामुळे हे पुन्हा अर्ज मागविले जाणार नसल्याची माहिती शिक्षणाधिकारी मुश्‍ताक शेख यांनी दिली.
शिक्षण हक्‍क कायद्यांतर्गत देण्यात येणाऱ्या 25 टक्‍के मोफत प्रवेशात एकूण 8 हजार 278 शाळांसाठी 1 लाख 20 हजार 543 जागांसाठी 1 लाख 44 हजार 704 अर्ज आले असल्यामुळे यंदा प्रवेश 50 टक्‍क्‍यांच्या पुढे जातील, अशी अपेक्षा व्यक्‍त करण्यात येत होती. मात्र प्रत्यक्षात आतापर्यंत 57 हजार 918 म्हणजेच 48 टक्‍केच प्रवेश राज्यभरात झालेले आहेत. बाकी जिल्ह्यांच्या तुलनेत पुण्यात चांगला प्रतिसाद मिळाला असून पुण्यात 849 शाळांमध्ये 15 हजार 693 जागा उपलब्ध होत्या. त्यासाठी 36 हजार 933 अर्ज आले होते. मात्र चौथ्या फेरीच्या अखेरीस 9 हजार 956 जागा भरल्या असून आतापर्यंत 63.44 टक्‍के प्रवेश झाले आहेत.
याबाबत माहिती देताना शिक्षणाधिकारी मुश्‍ताक शेख म्हणाले, पुण्यात दोनशेहून अधिक अशा शाळा आहेत ज्या शाळांसाठी अर्जच आलेले नाही. काही ठाराविक शाळांसाठीच अर्ज आलेले होते व त्या सर्व शाळांमध्ये प्रवेश देण्यात आलेले आहेत. दरम्यान पाचवी फेरी 20 मे रोजी होणार आहे. चौथ्या फेरीत 849 विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आले होते त्यापैकी केवळ 309 विद्यार्थ्यांचे प्रवेश झालेले आहेत. अन्य पालकांनी प्रवेश मिळूनही घेतला नाही, तर काहींचे अर्ज कागदपत्रांअभावी बाद करण्यात आले आहे.

राज्यातील काही ठिकाणी प्रवेश प्रक्रिया अजूनही सुरू असून राज्यातील ज्या ज्या जिल्ह्यांमध्ये पुन्हा अर्ज प्रक्रिया राबविण्याची मागणी होईल तिथे पुन्हा अर्ज भरुन घेतले जातील. सध्या राज्यभरातील प्रवेशादरम्यान 48 टक्‍के भरल्या आहेत. शहरी भागातील शाळांनाच जास्त मागणी आहे तर ग्रामीण भागातील बऱ्याच शाळांसाठी अर्जच आलेले नाहीत. त्यामुळे रिक्‍त जागांची संख्या जास्त दिसते आहे.
शरद गोसावी, उपसंचालक
राज्य शालेय शिक्षण विभाग

आरटीई प्रवेशाची पाचवी फेरी शनिवारी काढण्यात येणार आहे. दरम्यान पुन्हा नव्याने अर्ज घ्यावेत, अशी केवळ एका पालकाची मागणी झाल्यामुळे आम्ही पुणे जिल्ह्यापुरते तरी पुन्हा अर्ज मागवून प्रवेश प्रक्रिया न करण्याचा निर्णय घेतला आहे. शहरी भागातील जवळपास सर्व शाळांमध्ये पूर्ण प्रवेश झाला आहे. ग्रामीण भागातील शाळांना मात्र मागणी असलेली दिसत नाही.
मुश्‍ताक शेख, शिक्षणाधिकरी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)