– अतिक्रमणांमध्ये वाढ : सीमाभिंती उभारण्याची अपेक्षा

पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीतील विविध प्रकल्पांसाठी आरक्षित असलेल्या मोकळ्या जागांवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे करण्यात आली आहेत. शहरातील ठिकठिकाणच्या संबंधित जागांचा अनधिकृतपणे वापर केला जात आहे. त्यामुळे संबंधित जागांवर सीमाभिंत उभारण्यात यावी, अशी सूचना महापौर राहुल जाधव यांनी प्रशासनाला केली आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने विविध विकास कामांसाठी शहरात जागा आरक्षित करण्यात आल्या. त्यापैकी काही जागा महापालिकेच्या ताब्यात आल्या आहेत. त्यांचे भूसंपादन झाले आहे. तर, काही जागा अजूनही ताब्यात आलेल्या नाहीत. ताब्यात आलेल्या जागांवर नागरिकांनी अतिक्रमणे केली आहेत. अनधिकृतपणे या जागांचा वापर सुरू आहे. मात्र, महापालिका प्रशासनाचे त्यावर कुठलेही नियंत्रण नाही. त्यावरून महापौर जाधव यांनी नगररचना व स्थापत्य विभागाची बैठक घेतली.

विशेष म्हणजे, अनेकांकडून परस्पर या जागा इतरांना भाड्याने देऊ पैसे गोळा केले जात आहेत. ही बाब निदर्शनास आली असून, त्यात महापालिकेचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. त्यासाठी शहरातील सर्व आरक्षित जागांची माहिती काढवी. भूसंपादन झालेल्या व न झालेल्या भूखंडाची माहिती द्यावी. तसेच, भूसंपादन झालेल्या महापालिकेच्या ताब्यातील जागांना येत्या महिनाभरात सीमाभिंत बांधून तेथे महापालिकेचा फलक लावावा, अशा सूचना महापौरांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

समन्वयाचा अभाव
आरक्षित जागांच्या भूसंपादनाची कार्यवाही नगररचना विभागाकडून केली जाते. तर, जागा ताब्यात आल्यानंतर जागेला सिमाभिंत बांधणे किंवा तेथील नियोजित प्रकल्पाची कार्यवाही करण्याची जबाबदारी स्थापत्य विभागाची आहे. मात्र, या दोन्ही विभागातील अधिकाऱ्यांमध्ये समन्वयाचा अभाव आहे. त्यामुळे अनेक आरक्षित जागांवर अतिक्रमणे झाली असून त्याकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे प्रशासनाच्या कारभारावर प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)