आरक्षित कोचमधील सामान चोरीला गेल्यास…

प्रवासात सामान चोरी जाणे ही सर्वसाधारण बाब मानली जाते. बसस्थानक असो किंवा रेल्वेस्थानक असो, प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेणारी गैरकायद्याची मंडळी मोठ्या संख्येने असतात. अशा वेळी प्रवाशांनी स्वत:च्या वस्तूंची काळजी घेणे अपेक्षित असते. विशेषत: महिलांच्या दागिन्यांवर चोरांचे अधिक लक्ष असते. म्हणून तर प्रवासात दागिने घालू नका, असे आवाहन केले जाते. तरीही लग्नसमारंभ किंवा अन्य कारणामुळे दागिने सोबत नेणे अपरिहार्य असते. रेल्वे प्रवासात कोणतीही अप्रिय घटना घडू नये म्हणून आरक्षित कोचमधून प्रवास केला जातो, जेणेकरून अन्य कोचप्रमाणे या कोचमध्ये कोणीही घुसखोरी करू शकणार नाही. मात्र, आरक्षित कोचमध्ये एखादा अनधिकृत व्यक्ती जर प्रवेश करत असेल तर हा रेल्वेच्या सुरक्षा व्यवस्थेतील हलगर्जीपणा आहे. आरक्षित कोचमधील एखाद्या प्रवाशाचे सामान चोरीस गेल्यास रेल्वेचा ढिसाळपणा असल्याचे गृहित धरले जाते.

रेल्वेतील आरक्षित कोचसंबंधी एक प्रकरण पाहता येईल. यात एक महिला प्रवासी द्वितीय श्रेणीच्या कोचमध्ये मुलासह प्रवास करत होती. तिच्या सुटकेसमध्ये 33 तोळे सोने होते. तिने ती सुटकेस लॉक करून ठेवली होती. मात्र जेव्हा पहाटे साडेपाचच्या सुमारास चहावाल्याचा आवाज आला तेव्हा तिला जाग आली. परंतु तिला सुटकेसचे कुलूप तोडलेले आढळून आले आणि आतील सामान गायब होते. तिने ही माहिती तत्काळ रेल्वे पोलिसांना दिली आणि गुन्हा दाखल केला. या प्रकरणात रेल्वे पोलिसांनी बराच काळ कारवाई केलीच नाही. जेव्हा पीडित महिलेकडून सतत दबाव आणला जाऊ लागला तेव्हा पोलिसांनी थोडीफार हालचाल केली. शेवटी रेल्वेतील चोर पकडला गेला आणि त्याच्याकडून साडेसात तोळे सोने जप्त करण्यात आले. मात्र उर्वरित सोन्याचा थांगपत्ता लागला नाही.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

या प्रकरणी महिलेने ग्राहक मंचचा दरवाजा ठोठावला आणि पाच लाख रुपयाच्या नुकसानभरपाईची मागणी केली. सुनावणीदरम्यान रेल्वेने बाजू मांडताना म्हटले की, पीडित महिलेने सामानाची कोणतीच बुकिंग केली नव्हती आणि मॅन्युअलनुसार सामानाची सुरक्षा राखणे हे रेल्वेचे काम नाही. मात्र हे प्रकरण आरक्षित कोचमध्ये बेकायदा व्यक्‍तीस प्रवेश देण्याचे होते. यात रेल्वेचा ढिसाळपणा होता. सामानाची संपूर्ण जबाबदारी ही रेल्वेवर टाकता येणार नाही. कारण प्रवाशाने सामान दुसऱ्या सीटच्या खाली ठेवले होते, असे रेल्वेचे म्हणणे होते.

परंतु पिडित महिलेकडे प्रवासादरम्यान 33 तोळे सोने होते, याचा ठोस पुरावा सादर करू शकली नाही. मात्र मानसिक त्रास आणि अन्य कारणांमुळे ग्राहकाला एक लाख रुपयाची भरपाई देण्याचे आदेश ग्राहक मंचाने पोलिसांना दिले. या आदेशाविरुद्ध रेल्वेने राज्य ग्राहक आयोगाचा दरवाजा ठोठावला. सामानात मौल्यवान वस्तू असल्याने त्याची बुकिंग करणे गरजेचे होते. त्यामुळे रेल्वेला जबाबदार धरता येणार नाही. रेल्वे मॅन्युअल इथे लागू होत नाही, असे रेल्वेचे म्हणणे होते. कारण चोरी अनधिकृत व्यक्‍तीकडून झाली आहे. परंतु कोचच्या टीईटीने आपली जबाबदारी योग्य रितीने पार पाडली नाही आणि सामानाची सुरक्षा राखण्याबाबत मदत केली नाही. कोणताही व्यक्‍ती बाहेरून येऊन कोचमध्ये चोरी करतो हा तर रेल्वेचा निष्काळजीपणा आहे, अशा शब्दांत आयोगाने ताशेरे ओढले. टीईटी अनोळखी व्यक्‍तीला आतमध्ये येण्यापासून का रोखू शकला नाही, यावर रेल्वेकडून आयोगाचे समाधान झाले नाही. शेवटी जिल्हा आयोगाच्या निकालाला योग्य ठरवण्यात आले आणि एक लाख रुपये भरपाई देण्याचे आदेश देण्यात आले.

– सूर्यकांत पाठक, कार्याध्यक्ष, अ.भा. ग्राहक पंचायत


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)