आरक्षण सर्वांना हवंय का?

राज्यात आरक्षणाचा मुद्दा तापला असून मराठा आरक्षण मिळण्याची चिन्ह दिसत आहेत. सध्या सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनात देखील आरक्षण हा प्रमुख मुद्दा चर्चिला जात आहे. आज शिक्षण, रोजगार आणि गरिबी या दृष्ट चक्रामध्ये आजची तरुणाई भरडली जात आहे. या सर्वांमधून मुक्ती मिळवण्यासाठी आरक्षण हा एकमेव मार्ग असल्याचा समज झाल्याचे चित्र निर्माण झाल्याचे पाहायला मिळत आहे. सर्वच समाजांकडून आज आरक्षणाची मागणी करण्यात येत आहे. या पार्श्‍वभूमीवर आरक्षणाबाबत विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला.

अर्थिक निकष वापरणेच संविधानिक ठरेल
आज आपल्याकडे अशी परिस्थिती आहे की आरक्षण प्राप्त समुदायातील काही लोकांच्या एकूण सामाजिक आणि अर्थिक परिस्थितिमध्ये काही प्रमाणात बदल झाले आहेत. तर दुसरीकडे ज्या समुदायाला आरक्षण नाही यातील काही लोकांची अर्थिक आणि शैक्षणिक पिछेहाट झाली आहे. अशावेळी आरक्षणासाठी अर्थिक निकष वापरणेच संविधानिक ठरेल. अर्थिक निकषांवर आरक्षणाची अंमलबजावणी करणे थोडेसे कठीण असले तरी यातूनदेखील काहीतरी मार्ग नक्की काढता येऊ शकतो. मात्र यासाठी राज्यकर्ते आणि प्रशासकीय व्यवस्थेची इच्छाशक्ती आवश्‍यक ठरणार आहे.
– आशुतोष मसगोंडे


संधी देणे महत्त्वाचे 

-Ads-

सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षण नकोच त्या ऐवजी शिक्षण , रोजगार संधी द्यावी. आरक्षणामुळे गुणवत्ता असूनही विद्यार्थी नोकरीपासून वंचित राहतो. आरक्षण द्यायचं झाल्यास जातीवर नाही तर आर्थिक निकषांवर देण्यात यावे. कारण आर्थिक संपन्न असूनही काही लोक आरक्षणाचा फायदा घेतात त्यामुळे गरीब लोक गरीबच राहतात.
– सागर गुंजाळ


‘आरक्षण’ ही संकल्पना पुसणे गरजेचे
‘आरक्षण’ हे त्या काळानुरूप प्रगतीच्या दृष्टीने टाकलेले पाऊल असले तरी, आधुनिक युगात विकसित देशांच्या स्पर्धेत पुढे जाऊ पाहणारा हा भारत देश आज मागास वर्गात येऊ पाहतोय, प्रगत वर्गात जाण्यापेक्षा मागासलेपणात प्रतिष्ठा मानत आहे. एक विकसित राष्ट्र बनण्यासाठी सगळ्या स्तरावरील सर्वसामान्यांना एका पातळीवर आणणे गरजेचे आहे. त्यासाठी, सरकारने सामाजिक, आर्थिक दृष्टीने योग्य ते बदल करून, ‘आरक्षण’ ही संकल्पना पुसणे गरजेचे आहे.
– पूजा ढेरिंगे


मराठा समाजाला आरक्षण मिळायला हवे
मराठा जनसमुदाय गेल्या काही दिवसांपासून आरक्षणासाठी दिवस-रात्र लढा देत आहे. कित्येक युवकांनी आपले प्राण गमावले आहेत. मला वाटते मराठा समाजाला आरक्षण मिळायला हवे. कारण आज शिक्षण,नोकरी सर्वठिकाणी जातीनिहाय वर्गीकरण करण्यात येत आहे. त्यामुळे मराठा मुले गुणवत्ता असूनही मागे राहतात. त्यामुळे असंतोष निर्माण होतो. शिक्षण, रोजगार यामध्ये तरी सर्वाना सामान संधी मिळावी. त्यामुळे आरक्षण गरजेचे आहे. आज विविध जातीतील लोकांना आरक्षण फायदा होत आहे. सरकारी नोकऱ्यांमध्ये प्राधान्य, शैक्षणिक फी मध्ये सवलत मिळते. हे सर्व फायदे मराठा तरुणाला देखील मिळावे.

– प्रियंका गाडे


आरक्षण द्यायचे असेल तर गरिबांना द्या !

आरक्षण जाहीर करण्याअगोदर हे पाहणे महत्त्वाचे आहे की, आज आरक्षणाची गरज कोणाला आहे. आरक्षणाचे खरे हकदार कोणी असतील तर गरीब लोक आहेत. मग ते कोणत्याही जाती धर्माचे असो. आपल्या देशात जाती-धर्माला जास्त महत्व आहे. काही लोकांना आरक्षणाची गरज नसताना ते आरक्षणाचा फायदा घेत आहेत आणि त्यांच्या पुढील पिढीचे भविष्य उज्ज्वल करत आहेत. आजही काही गरीब लोकांना आरक्षणाचा अर्थ देखील माहित नाही. गरिबी धर्म आणि जातीवरून येत नाही. कोणत्याही जातीचा धर्माचा व्यक्ती गरीब असू शकतो. मग आरक्षण जाती धर्मावरून का ? असा प्रश्‍न निर्माण होतो. खरंच आरक्षण द्यायचे असेल तर गरिबांना द्या!

– सौरभ प्रजापत


– संदीप कापडे


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)