आरक्षण लोकसंख्येच्या आधारे प्रवर्ग लागू करा

  • सचिन आरडे : जिल्ह्यात 10 दिवसांची संवाद यात्रा

रेडा – अनुसूचित जातीमध्ये भटक्‍या विमुक्‍तांप्रमाणे आरक्षणात लोकसंख्येच्या आधारे अ, ब, क व ड प्रवर्ग लागू करावा, जेणे करून आरक्षणातही वंचित राहिलेल्या मातंग समाजाला योग्य न्याय व संधी मिळेल, अशी मागणी भाजप युवा मोर्चाचे पुणे जिल्हा सरचिटणीस सचिन आरडे यांनी आज (शनिवारी) सकाळी काटी (ता इंदापूर) येथे आयोजित पत्रपरिषदेत बोलताना केली.
अण्णा भाऊ साठे जयंतीनिमित्त भाजप युवा मोर्चा पुणे जिल्ह्यात ग्रामीण भागात दहा दिवसांची संवाद यात्रा काढणार आहे. त्यानिमित्त या पत्रपरिषदेचे आयोजन केले होते. आरडे म्हणाले की, मंदाकृष्ण मादिगांनी देशभरात सुरू केलेली सामाजिक चळवळ विचारात घेऊन अनुसूचित जातीमध्ये देखील भटक्‍या विमुक्‍तांप्रमाणे अ, ब, क, ड प्रवर्ग लागू करावा अशी अवघ्या उपेक्षित पोटजातीची अपेक्षा आहे. राज्यभरात एकट्या मातंग समाजात 300 संघटना असून दलित समाजातील प्रमुख 5 पोटजातीमध्ये अशीच मतभेदाची दारूण अवस्था आहे. अनुसूचीत जातीच्या 59 जातीमधील 52 उपेक्षित जाती अशा आहेत की त्यांना सवलती कशाशी खातात हे देखील माहित नाही. अशा उपेक्षित जातींना सवलतींचा प्रत्यक्ष लाभ मिळायचा असेल तर अ, ब, क, ड असा प्रवर्ग लागू करणे आवश्‍यक आहे. राज्यात दलित समाजाची लोकसंख्या 1 कोटी 30 लाख आहे. त्यात बौद्ध समाजाची लोकसंख्या 65 लाख आहे. त्यांना “अ’ वर्ग द्यावा. मातंग समाजाची लोकसंख्या 28 लाख आहे. त्यांना “ब’ वर्ग द्यावा. तर मोची, कोलार, चर्मकार व ढोर या चार जातींना “क’ वर्ग तर 11 ते 12 लाख लोकसंख्या असलेल्या उर्वरीत 52 जातींना “ड’ वर्ग द्यावा, अशी अपेक्षा समाजाची आहे. आरोग्य, शिक्षण, बचतगट यात पुढाकार घेण्यासाठी प्रयत्न करणे हा जयंतीनिमित्त आखलेला कार्यक्रम आहे, अशीही सचिन आरडे यांनी दिली.पश्‍चिम महाराष्ट्र संघटन मंत्री रविजी आनासपुरे, भाजप युवा मोर्चा प्रदेश अध्यक्ष आमदार योगेश टिळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही संवाद यात्रा दहा दिवस चालणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)