आरक्षण प्रकियेत खारीचा वाटा मिळाल्याचे समाधान

आ. शंभूराज देसाई यांनी युती शासनाचे मानले जाहिर आभार

काळगाव – राज्यातील यापूर्वीच्या आघाडी शासनाने सत्तेत राहून राज्यातील मराठा समाजाला आरक्षणापासून झुलवत ठेवले. सकल मराठा समाजाला आरक्षण मिळावे ही अनेक वर्षांची मागणी आहे ते आरक्षण आघाडी शासन देऊ शकले नाही. मात्र राज्यातील चार वर्षापूर्वी सत्तेत आलेल्या भाजप -शिवसेना युती शासनाने घटनात्मक बाबींची पूर्तता करून कायद्याच्या चौकटीत टिकेल आणि तेही इतर कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का पोहचणार नाही असे पूर्ण राज्यातील मराठा समाजाला 16 टक्के आरक्षण देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला.

शासनाच्या या ऐतिहासिक निर्णय प्रक्रियेत राज्य शासनाचा घटक म्हणून मला सहभागी होता आले हे माझे भाग्य असून हा ऐतिहासिक निर्णय घेणारे मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युती शासनाचे आणि राज्यातील सर्व आमदारांचे आभार मानून युतीच्या राज्य शासनाचे अभिनंदन करतो, असे गौरवोद्गार आ. शंभूराज देसाई यांनी काढले.

नवारस्ता ता. पाटण येथे राज्य शासनाने सकल मराठा समाजाला 16 टक्के आरक्षण देण्याच्या घेतलेल्या ऐतिहासिक निर्णयाचे स्वागत व युतीच्या शासनाचे जाहीर अभिनंदन व आभार मानण्याकरीता पाटण मतदारसंघाच्या वतीने आयोजित आभार कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी पाटण मतदार संघातील युवक, सकल मराठा समाजातील कार्यकर्ते, शिवसेना व शंभूराज युवा संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.

प्रारंभी मुंबई अधिवेशनातून मतदारसंघात आलेले आ. देसाई यांचे स्वागत निसरेफाटा येथे करण्यात आले. मानाचा फेटा बांधून आ. शंभूराज देसाईंना हजारो युवकांनी पेढे व साखर भरवली. त्यानंतर मोटारसायकल रॅलीवरुन हजारो युवक नवारस्ता येथील आभार कार्यक्रमस्थळी आले.

यावेळी आ. देसाई म्हणाले, गेली पंधरा वर्षे सातत्याने सत्तेत असणाऱ्या आघाडी सरकारने 2014 मध्ये निवडणुकीच्या तोंडावर घाईघाईने मराठा आरक्षण जाहीर केले. मात्र हे आरक्षण कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर चौकटीत न बसविल्यामुळे केवळ दोनच दिवसांत ते आरक्षण रद्द झाल्याचे जाहीर झाले. सातत्याने सत्तेत राहूनही तत्कालिन आघाडी शासन आणि या शासनात मिरविणाऱ्यांना गेल्या अनेक वर्षात सकल मराठा समाजाला आरक्षण देता आले नाही.

अनेक वर्षाची असणारी मागणी पुर्ण होत नाही म्हणून राज्यामध्ये एकूण 58 ठिकाणी लाखोंच्या संख्येने मोर्चे, आंदोलने झाली. कायद्याच्या चौकटीत बसेल आणि तेही कोणत्याही इतर समाजाच्या आरक्षणाला धक्का पोहचणार नाही असे आरक्षण देण्यासाठी युती शासनाने प्रयत्नांची पराकाष्ठा करत हे आरक्षण जाहीर केले.

केंद्रात नरेंद्र आणि राज्यात देवेंद्र अशी ज्यावेळी भाजप शिवसेना या युती सरकारची भगवी लाट आली त्याचवेळी राज्यातील गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित असणाऱ्या मराठा आरक्षणाचा प्रश्न यशस्वीपणे सुटणार अशी महाराष्ट्र राज्यातील सकल मराठा समाजाला आशा वाटत होती. ते काम युती शासनाने करुन दाखविले. कोणतेही आरक्षण देण्याचा अधिकार हा केवळ मंत्री समिती नेमून या मंत्री समितीला नव्हे तर राज्य मागास आयोगाला असतात याची साधी कल्पना आघाडी शासनकर्त्यांना नसावी, हे दुर्दैव आहे. अशी टीका त्यांनी केली. आरक्षणाबाबत शिवसेना पक्षानेही सातत्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी केल्याचे सांगत धनगर समाजाला आरक्षण देण्याचा प्रश्नही अधिवेशनात मांडणार आहे. तसेच मुस्लिम आरक्षणासाठी ही शासन सकारात्मक असल्याचे आमदार देसाई यांनी यावेळी बोलताना सांगितले.

मुख्यमंत्री यांना श्रेयच घ्यायचे असते तर…!
मराठा आरक्षणाचा प्रलंबित प्रश्न सोडिविण्यासाठी फार मोठे दिव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पार करावे लागले. विरोधकांना गेल्या 20 वर्षात जमले नाही ते अवघ्या 4 वर्षात त्यांनी करून दाखवले.मराठा आरक्षण हा तर ऐतिहासिक निर्णय यशस्वी झाला.याचे श्रेयच घ्यायचे असते तर… मुख्यमंत्र्यांनी सभागृहात तासभर भाषण केले असते मात्र मराठा आरक्षण प्रक्रियेत त्यांना कोणताही धोका पत्कारायचा नव्हता असे आ. देसाई यांनी स्पष्ट केले. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी एकूण 58 मोर्चातील 42 मराठा बांधव शहीद झाले त्यामध्ये पाटण तालुक्‍यातील खोनोली येथील रोहन तोडकर याचा समावेश आहे.त्यामुळे सर्व शहीद यांना श्रद्धांजली व्यक्त करून तोडकर यांच्या कुटुंबाला मदत देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)