आरक्षण न मिळाल्यास खासदार, आमदारांच्या घरांसमोर ठिय्या आंदोलन-  मराठा क्रांती मोर्चा

 मराठा क्रांती ठोक मोर्चाचा इशारा 

मुंबई: मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी भाजप सरकारशी खूप चर्चा झाली, निवेदने आणि बैठकाही झाल्या. आता सरकारशी कोणतीही चर्चा नाही. आता आमचा सरकारवरच विश्वास राहिला नसून दिलेल्या मुदतीत मराठा समाजाला आरक्षण न मिळाल्यास 25 नोव्हेंबरपासून महाराष्ट्रातील सर्व आमदार तसेच खासदारांच्या घरांसमोर ठिय्या आंदोलन करू. तरीही मागण्या मान्य न झाल्यास 1 नोव्हेंबरपासून गनिमी काव्याने आंदोलन केले जाईल, असा इशारा मराठा क्रांती ठोक मोर्चाकडून आज देण्यात आला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीने आज मुंबई मराठी पत्रकार संघात पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी मराठा मोर्चाचे समन्वयक आबासाहेब पाटील यांनी 25 नोव्हेंबरपासून ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा दिला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आंदोलनादरम्यान मराठा तरुणांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेण्याचे आश्वासन पाळले नाही. 15 नोव्हेंबरपर्यंत मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबतच्या आश्वासनाबाबतही सरकारी पातळीवर कोणतीच हालचाल नाही. त्यामुळे सरकारने मराठा समाजाच्या आरक्षणाचा निर्णय जाहीर करावा. अन्यथा सरकारला मराठा समाजाच्या पुढच्या मोठ्या आणि तीव्र आंदोलनाला सामोरे जावे लागेल, असा इशारा त्यांनी दिला.

आमची सर्व आमदार आणि खासदारांना सूचना आहे कि त्यांनी आपल्या पक्ष प्रमुखांशी बोलून व मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून विशेष अधिवेशन घेऊन मराठा आरक्षण जाहीर करावे. मग ते आमदार आणि खासदार कोणत्याही पक्षाचे असतील, त्यांनी ताबडतोब ठोस निर्णय घ्यावा, त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट करावी आणि आम्हाला पाठिंबा द्यावा. त्यांनी आमच्याशी कटिबद्ध राहावे, अन्यथा आम्ही त्यांच्या घरासमोर ठिय्या आंदोलन करू, असेही ते म्हणाले.

संपूर्ण महाराष्ट्रभर मराठा क्रांती ठोक मोर्चाचे एकच आंदोलन असेल. हे राज्यव्यापी आंदोलन शांतपणे ठिय्या आंदोलन असेल. आम्ही आमच्या आंदोलकांना आचारसंहिता आखून देणार आहोत. परंतु या आंदोलना व्यतिरिक्त जर दुसछया कोणी आंदोलन जाहीर करेल त्यांना मराठा समाजाचा हिसका दाखवू, असा इशारा यावेळी देण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)