आरक्षणासंदर्भात काहीही निकाल लागला, तरी राज्यभर मोर्चे निघतील

अॅड. प्रकाश आंबेडकर : अर्थसंकल्पात आरक्षणाच्या टक्केवारीवर तरतूद व्हावी

पुणे – मराठा आंदोलनासंदर्भात नोव्हेंबरअखेर निकाल येणार आहे. तो काहीही लागला, तरी त्यानंतर महाराष्ट्रात मोर्चे- प्रतिमोर्चे निघतील, असे भाकित भारिप बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी वर्तविले. बहुजन समाजाच्या विकासासाठी आरक्षणाच्या टक्केवारीवर अर्थसंकल्पात तरतूद केली पाहिजे, अशी मागणीही आंबेडकर यांनी मंगळवारी केली.

बहुजन वंचित आघाडीत सहभागी होण्यासाठी दलित युवक आंदोलनाच्या वतीने मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अॅड. आंबेडकर बोलत होते. यावेळी “उपरा’ कार लक्ष्मण माने, माजी आमदार अॅड. विजय मोरे, सचिन बगाडे, लक्ष्मण आरडे, जोशीला लोमटे, शीतल साठे, डॉ. इंद्रकुमार भिसे यांच्यासह अन्य समाजाचे नेते या मेळाव्याला उपस्थित होते.

“इंग्रजांनी समाजात फूट पाडण्यासाठी फोडा आणि झोडा ही नीती अवलंबली. सध्याचे राज्यकर्तेही सत्तेसाठी हीच नीती अवलंबत असून त्याचा समाजव्यवस्थेवर परिणाम होत आहे. लढाऊ विमानांच्या घोटाळ्यानंतर याच प्रश्‍नावर भाजपा सरकारला घेरले आहे. त्यामुळेच शासनाने राम मंदिराच्या नावाखाली नवीन राजकारण सुरू केले आहे, एखाद्या प्रश्‍नाला भावनिक करायचे आणि नंतर मैदानातून पळ काढायचा हीच त्यांची पद्धत आहे. मात्र, आपला समाज दुर्दैवाने त्यांच्या या भावनिक खेळाला बळी पडत असून समाजाच्या विकासासाठी संघटित होण्याची आवश्‍यकता आहे. स्वातंत्र्य मिळाल्यापासून बहुजन समाजाला आरक्षणात वाटा मिळाला असला, तरी या समाजाच्या विकासासाठी आतापर्यंतच्या कोणत्याही शासनाने अर्थसंकल्पात भरीव तरतूद केलेली नाही. ही बाब लक्षात घेऊन या समाजाच्या उन्नतीसाठी अर्थसंकल्पात टक्केवारीवर तरतूद करण्याची आवश्‍यकता आहे. हा मालकी हक्क संविधानाने या समाजाला दिला आहे,’ असे अॅड. आंबेडकर म्हणाले.

अयोध्येत राममंदिर उभारुन गरिबांची पोटे भरणार नाहीत. ही बाब लक्षात घेऊन शासनाने आधी आदिवासी कुपोषण बेरोजगारी आदी प्रश्‍न सोडविण्यासाठी प्राधान्य देण्याची आवश्‍यकता आहे.
– अॅड. प्रकाश आंबेडकर, राष्ट्रीय अध्यक्ष, भारिप बहुजन महासंघ


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
1 :blush:
0 :cry:
1 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)