आरएसएसचे सनातनशी काय संबंध हे जाहीर करा

राधाकृष्ण विखे पाटील : डॉ. जयंत आठवले यांना अटक करण्याची केली मागणी
पुणे – सनातनसारखी कट्टरवादी संघटना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी आपले मधूर संबंध असल्याचे सांगते. कदाचित त्यामुळेच त्यांच्यावर कारवाई करायला राज्य सरकार तयार नाही, असा आरोप करून सरसंघचालक मोहन भागवत यांनीच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सनातनशी नेमके काय संबंध आहेत ते जाहीर करावे, असे आव्हान विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले. सर्व पुरावे लक्षात घेऊन शासनाने सनातनचे प्रमुख डॉ. जयंत आठवले यांना अटक करावी, अशी मागणीही त्यांनी केली.

कॉंग्रेसच्या जनसंघर्ष यात्रेच्या पहिल्या टप्प्याच्या समारोपावेळी बोलताना विखे पाटील यांनी हे आव्हान दिले. ते म्हणाले, सनातनचे डॉ. जयंत आठवले यांनी अनेकदा लोकांना नक्षलवादी, दहशतवादी बनण्याचे आवाहन केले आहे. राजकीय नेत्यांना ठार मारण्याची आणि राजकीय व्यवस्था उलथवून लावण्याची भाषा वापरली आहे. यासंदर्भातील त्यांची चिथावणीखोर विधाने त्यांचेच मुखपत्र सनातन प्रभातमधून प्रसिद्ध झाली आहेत. हा एक ठोस पुरावा असून, पुरोगामी विचारवंतांप्रमाणेच या पुराव्यांच्या आधारे पोलीस डॉ. आठवले यांना अटक करणार का? असा खडा सवाल त्यांनी उपस्थित केला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा कारभार पेशवाईतील नाना फडणविसांसारखाच आहे. आधुनिक फडणवीस सुद्धा पेशवाईतील फडणविसांसारखेच पडद्यामागून सारी सूत्रे हलवतात. पण, त्याचा सूत्रधार नेमका कोण, हे शेवटपर्यंत कळत नाही. साहित्यिक व विचारवंतांच्या अटकेच्या समर्थनार्थ राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक व पुणे पोलीस आयुक्तांनी पत्रकार परिषदा घेतल्या. या प्रकारावरून सर्वोच्च न्यायालयाने सरकारची आणि पोलिसांची कानउघाडणी केली. तरीही या पत्रकार परिषदांबाबत मुख्यमंत्री मौन धारण करून बसले आहेत. त्यांचे हे मौनच ते या पत्रकार परिषदांचे मूळ आयोजक असल्याचे स्पष्ट करते, असा ठपकाही त्यांनी ठेवला.

भाजप सरकारच्या सत्तेच्या काळात राज्यभरात तब्बल पंधरा हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. त्यामुळे या सरकारवर 302 चा गुन्हा का दाखल करू नये, असा सवाल करून कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण म्हणाले; भाजपचे आमदार राम कदम आणि सुधाकर परिचारक यांच्या वक्तव्यावरून भाजपला आणि त्यांच्या नेत्यांना सत्तेचा माज आला आहे, हे स्पष्ट होत आहे. या सरकारच्या काळात सर्वाधिक शांत समजल्या जाणाऱ्या पुणे आणि नागपूर शहरांत सर्वाधिक गुन्हे घडले असून ही शहरे गुन्हेगारीची राजधानी बनली आहेत, असा आरोपही त्यांनी केला.
राफेल, सिडको आणि समृध्दी मार्ग या माध्यमातून भाजपच्या सरकारने घोटाळे सुरू केले आहेत, असा आरोप करून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले; बेरोजगारांना नोकरी देण्याचे आणि इतर आश्‍वासनांची खैरात करून हे सरकार सत्तेवर आले. मात्र, सत्तेची चार वर्षे उलटूनही या सरकारला अद्याप एकही आश्‍वासनांची पूर्तता करता आलेली नाही. त्यामुळे भाजप सरकार हे फसवे असल्याचा आरोपही चव्हाण यांनी केला.

शिवसेनेचा विक्रम हुकला!
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सत्तेतून बाहेर पडणार नसल्याच्या विधानाचा राधाकृष्ण विखे पाटील यांनी खरपूस समाचार घेतला. त्यांच्यावर बोचरी टीका करताना ते म्हणाले, शिवसेनेने आजवर 235 वेळा सत्तेतून बाहेर पडण्याचा इशारा दिला आहे. लवकरच ते 250 वा इशारा देऊन नवा विक्रम करतील, अशी अपेक्षा होती. परंतु, त्यापूर्वीच उद्धव ठाकरे यांनी सत्तेत बाहेर पडण्याची घोषणा करून शिवसेनेची विक्रमी संधी हुकवली, याचे दुःख असल्याचा टोलाही विखे पाटील यांनी लगावला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)