आयुष्यभर विद्यार्थी व्रत सोडू नका

  • नागेश गायकवाड ः अंबडवेट येथे संतोष भूमकर यांचा नागरी सत्कार

पिरंगुट – आयुष्यात कोणतेही ध्येय गाठायचे असेल तर जिद्द, चिकाटी व सातत्य याला पर्याय नाही. आपण आयुष्यभर शिकत राहिलो तरी विश्वाचे ज्ञान न संपणारे आहे. शिकण्याला वयाची मर्यादा नसते म्हणून आयुष्यभर विद्यार्थी व्रत सोडू नका, असे आवाहन मुळशीचे नायब तहसीलदार नागेश गायकवाड यांनी केले.
अंबडवेट (ता. मुळशी) येथील संतोष भूमकर यांची पोलीस उपनिरीक्षकपदी निवड झाल्याबद्दल सर्वज्ञ विकास प्रबोधिनी पिरंगुट व राष्ट्रीय सर्वांगीण ग्रामविकास संस्था यांच्या वतीने नागरी सत्कार आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी नागेश गायकवाड बोलत होते. अंबडवेटचे सुपूत्र संतोष भूमकर यांनी दहावी नापास झाल्यानंतरही अपयशाने खचून न जाता गवंड्याच्या हाताखाली बिगारी कामगार म्हणून व अन्य पडेल ती कामे करत करत अत्यंत हलाखीच्या परिस्थितीतून पुढे जात शिक्षण पूर्ण करून राज्य राखीव पोलीस दलात पोलीस शिपाई ते पीएसआय पदी निवड होण्यापर्यंत मजल मारली. त्यानिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या सत्कार समारंभासाठी भूमकर यांचे मार्गदर्शक व पिरंगुट शाळेचे माजी प्राचार्य गुलाबराव सपकाळ, माजी सभापती पांडुरंग राऊत, माजी जिल्हा परिषद सदस्य सुभाष अमराळे, राष्ट्रीय सर्वांगीण ग्रामविकास संस्थेचे विश्वस्त चिंतामणी चितळे, रवी देव, राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष सुनील चांदेरे, राम गायकवाड, सर्वज्ञ विकास प्रबोधीनी व शिवसमर्थ बचत गटाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर पवळे, अंबडवेट ग्रामपंचायतीचे उपसरपंच निलेश ढमाले आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी भूमकर यांचे मार्गदर्शक शिक्षक सपकाळ म्हणाले, प्रशासनातील पदे ही काटेरी मुकुट घातल्यासारखी असतात. यशाने भाराऊन गेले तरी भरकटू मात्र नये. चिंतामणी चितळे यांनी आपल्या प्रास्ताविकातून संस्थेच्या कार्याची तसेच संतोष भूमकर याच्या शालेय जीवनातील आठवणींना उजाळा दिला. याप्रसंगी विविध पक्षाचे प्रतिनिधी, अंबडवेट ग्रामस्थ, भूमकर यांचे कुटुंबीय व नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी विराज गावडे याचा शिष्यवृत्ती परीक्षेत राज्यात 14वा व तालुक्‍यात पहिला आल्याबद्दल विशेष सत्कार करण्यात आला.
स्वागत व परिचय प्रदीप पाटील यांनी केले. सूत्रसंचलन संतोष गावडे यांनी केले. ज्ञानेश्वर पवळे यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)