आयुक्‍त-विरोधी पक्षनेत्यांचे “पॅचअप’

पिंपरी – महापालिका आयुक्‍त श्रावण हर्डीकर आणि विरोधी पक्षनेते दत्ता साने यांच्या वादाचे पडसाद महासभेत उमटले. महासभेत आयुक्‍तांनी जाहिरपणे दिलगिरी व्यक्‍त केल्यामुळे राष्ट्रवादीनेही सामंजस्याने घेतले. त्यामुळे साने आणि आयुक्‍तांमध्ये “स्मार्ट सिटी’च्या बैठकीत झालेल्या वादावर अखेर पडदा पडला आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्मार्ट सिटी कंपनीच्या शहर सल्लागार समितीची बैठक 31 ऑगस्ट रोजी झाली. त्यावेळी खासदार, आमदार, पालिकेतील प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी विरोधी पक्षनेते आणि आयुक्‍त यांच्यात खडाजंगी झाली होती.

“स्मार्ट सिटी’अंतर्गत कासारवाडी आणि सेक्‍टर 23 येथे प्रायोगिक तत्त्वावर राबविण्यात येणाऱ्या “सोलर सिस्टीम’मधून वीज महापालिका प्रति युनीट साडेतीन रुपये या दराने विकत घेणार आहे. तर, महापालिका कचरा व राडारोड्यापासून तयार होणारी वीज साडेसहा प्रति युनीट दराने विकत घेणार आहे. याला विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी आक्षेप घेतला होता. यावर आयुक्‍त हर्डीकर यांनी, “”दोन्ही विषय वेगळे असून, गफलत करु नका. अज्ञानातून असे काही बोलू नका”, असे उत्तर दिले होते. आयुक्‍तांचे उत्तर ऐकून विरोधी पक्षनेते दत्ता साने संतापले होते. आक्रमक होत त्यांनी आयुक्‍तांवर हल्लाबोल करीत बैठकीतून काढता पाय घेतला होता.

दरम्यान, गुरुवारी झालेल्या महासभेत महासभेत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नगरसेवकांनी डोक्‍याला काळीपट्टी बांधून सभागृहात प्रवेश केला. महापालिका आयुक्‍तांच्या वक्‍तव्याचा निषेध करण्यात आला. राष्ट्रवादीचे नगरसेवक भाऊसाहेब भोईर म्हणाले की, महापालिका आयुक्‍त शहराचे असतात. एखादा विषय नगरसेवक किंवा लोकप्रतिनिधींना समजला नसेल, तर त्यांनी त्याबाबत योग्यरित्या माहिती दिली पाहिजे. माहिती विचारल्यास अज्ञान आणि सज्ञान असा वाद निर्माण करू नये. आयुक्‍तांच्या वक्‍तव्यातून नगरसेवकांचा अवमान होत असेल, तर मी त्यांचा निषेध करतो.

यानंतर शिवसेनेचे गटनेते राहुल कलाटे यांनी विरोधी पक्षनेते आणि आयुक्‍तांना आपली बाजू मांडण्याची विनंती केली. त्यानंतर साने यांनी बैठकीत घडलेला घटनाक्रम सांगितला. त्यावर आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिलगिरी व्यक्‍त केली. त्यामुळे विरोधी पक्षनेते आणि आयुक्‍त यांच्यातील वादावर पडदा पडला.

मी शहराच्या हिताचे काम करत आहे. मनोभावे काम करत असताना सर्वांचा आदर, सन्मान राखणे माझे कर्तव्य आहे. माझ्याकडून अनुचित शब्द गेले असेल. त्यातून कुणाचा अवमान झाला असेल तर मी दिलगीर आहे.
– श्रावण हर्डीकर, आयुक्‍त, महापालिका.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)