आयुक्‍त म्हणतात…बार्सिलोना दौऱ्याचे फलित अवघड

पिंपरी – सर्वाधिक वादामध्ये अडकलेल्या बार्सिलोना दौऱ्याचे फलित शहराला मिळवून देणे अशक्‍य नाही. परंतु “टाऊन प्लॅनिंग’ पाहता ते अवघड असल्याची स्पष्टोक्‍ती आयुक्‍त श्रावण हर्डीकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. तर दौऱ्याचे समर्थन करताना सत्ताधारी व विरोधकांमध्ये चढाओढ लागली होती.

महापालिकेचे पदाधिकारी व अधिकारी स्पेन येथील बर्सिलोना येथे “स्मार्ट सिटी’वर आयोजित दौऱ्यासाठी गेले होते. त्यात विरोधक तसेच ठेकेदारही सहभागी झाल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या होता. खर्चावरुन तसेच लांबलेल्या या दौऱ्यावरून मोठ्या प्रमाणावर टीका झाली होती. दौऱ्याचा अहवाल जनतेसमोर मांडण्याची मागणी सामाजिक कार्यकर्त्यांनी केली होती. अखेर अधिकारी व पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी (दि. 30) संयुक्‍त पत्रकार परिषद घेत दौऱ्याचे समर्थन केले. महापौर राहुल जाधव, सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार, विरोधी पक्षनेते दत्ता साने, मनसेचे गटनेते सचिन चिखले, महापालिका अधिकारी राजन पाटील, निलकंठ पोमण आदी उपस्थित होते.

आयुक्‍त म्हणाले की, हा दौरा “स्मार्ट सिटी’ प्रकल्पातून खर्चातून करण्यात आला आहे. यामध्ये केवळ “स्मार्ट सिटी’शी संबंधीत अधिकारी व पदाधिकारी होते. तर आमदार लक्ष्मण जगताप व त्यांचे सहकारी ही स्वखर्चाने व स्वतंत्र आले होते. या दौऱ्यामध्ये जगातील 146 “स्मार्ट’ शहरे सहभागी झाली होती. तर “स्मार्ट प्रोजेक्‍ट’ दाखवणारे 844 स्टॉलचे तेथे प्रदर्शन भरवण्यात आले होते. त्यामुळे एकाच छताखाली जगभरातील “स्मार्ट सिटी’चा आढावा घेता आला. त्याचा फायदा भविष्यात शहरासाठी होणार आहे. इतर देशांमधील वाहतूक व्यवस्था, पार्किंग व्यवस्था, तेथील खेळ व खेळाडूंवर केला जाणारा खर्च व त्यातून त्या शहराला होणारा फायदा हा आदर्श आहे. त्यानुसार आपल्या शहरात देखील “स्पोर्ट कल्चर’ रुजवू शकतो. शहरात पार्किंग सुविधा उपलब्ध करु शकतो, असे आयुक्तांनी स्पष्टीकरण दिले.

या दौऱ्याचे समर्थन करत सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार म्हणाले की, अभ्यास दौरे भविष्यासाठी फायदेशीर असतात. त्यामुळे दौऱ्यावरील खर्च हा कधीच वाया जात नाही. शिवसेनेने आमच्यावर टीका करण्याऐवजी कमी खर्चात दौरे करणारी त्यांची एखादी ट्रॅव्हलिंग कंपनी असेल तर ती सुचवावी, असा टोला त्यांनी लगावला. तर दत्ता साने यांनी सत्ताधाऱ्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी आपण दौऱ्यात सहभागी झाल्याचे सांगत स्वतःचीच पाठराखण करुन घेतली.

“स्मार्ट टेंडरिंग’चा अवलंब
पिंपरी-चिंचवड महापालिका यापुढे “स्मार्ट टेंडरिंग’चा अवलंब करणार असल्याची माहिती आयुक्‍त श्रावण हर्डीकर यांनी दिली. टेंडरींग पद्धत कशी करावी, त्यात स्पर्धा कशी घ्यावी व यातून आधुनिक कामे कशी करवून घ्यावी याचा अभ्यास या दौऱ्यात करण्यात आला आहे. त्यानुसार, “स्मार्ट सिटी’च्या कामांसाठी ही निविदा पद्धत वापरली जाणार आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड महापालिकेची निविदा प्रक्रिया भारतातील सर्वात अत्याधुनिक व स्मार्ट असेल, असा विश्‍वास आयुक्‍तांनी व्यक्त केला.

“सायकल ट्रॅक’बाबत चुप्पी
पत्रकार परिषदेत अधिकारी व पदाधिकाऱ्यांनी परदेशातील पार्किंग व सायकल ट्रॅकचे वारंवार कौतुक केले. यावेळी पत्रकारांनी आपल्या शहरातील सायकल ट्रॅक व पार्किंग व्यवस्थेचे काय झाले, आत्ता पर्यंतची विकसीत कामांची आकडेवारी याबाबत प्रश्‍न विचारले असता पदाधिकारी व आयुक्‍तांनीही यावर चुप्पी साधली. तर सह शहर अभियंता राजन पाटील यांनी ट्रॅक आहेत मात्र त्यांचा वापरच होत नसल्याचे उत्तर देत प्रशासनाची बाजू सावरण्याचा प्रयत्न केला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)