आयुक्‍तांच्या निवासासमोरच रखडले बीआरटीचे काम

पिंपरी – काळेवाडी-देहूला जोडल्या जाणाऱ्या बीआरटी मार्गावर मोरवाडी, सायन्स पार्क चौकातून आयुक्त बंगल्याच्या दरम्यानचे काम अर्धवट स्वरूपात रखडले असल्याची तक्रार पिंपरी-चिंचवड शहर राष्ट्रवादी कॉंग्रेसने केली आहे.

यासंदर्भात राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन देत त्यांचे लक्ष वेधण्यात आले आहे. निवेदनात म्हटले आहे की, काळेवाडी ते देहू येथे जोडल्या जाणाऱ्या बीआरटीचे काम वेगाने सुरु आहे. परंतु, या मार्गातील बाधित कंपन्यांनी आपले बांधकाम काढून न घेतल्याने सायन्स पार्क चौकातून आयुक्त बंगल्याच्या दरम्यानचे काम रखडले आहे. त्यामुळे हा मार्ग विकसित करण्यात आडकाठी निर्माण झाली आहे.

महापालिका आयुक्तांच्या बंगल्यासमोरील भागातच हे काम रखडलेले असताना त्याकडे दुर्लक्ष झाल्याने आश्‍चर्य व्यक्त होत आहे. या मार्गाचे काम रखडल्याने या मार्गावरील वाहतुकीचा प्रश्‍न जटील होत चालला आहे. या मार्गावरुन मोठ्या प्रमाणावर एमआयडीसी परिसरात वाहतूक होत असते. तसेच भोसरी, चिखली आदी ठिकाणी जाण्यास या मार्गाचा वापर होत असतो. त्यामुळे या मार्गावरील बाधित कंपन्यांचे स्थलांतर करून काम पुर्ण करावे. अथवा हा प्रश्‍न निकालात निघत नसेल तर या चौकात उड्डाणपुलाची उभारणी असेही या निवेदनात सुचित करण्यात आले आहे. हा मार्ग खुला झाल्यास औद्योगिक परिसरातील वाहतूक तसेच कामगारांची गैरसोय दूर होईल, अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली आहे.

आयुक्तांना निवेदन सादर करतेवेळी नगरसेविका मंगला कदम, अपर्णा डोके, गीता मंचरकर, प्रज्ञा खानोलकर, संगिता ताम्हाणे, पक्ष प्रवक्ते फजल शेख, व्यापारी संघटना अध्यक्ष प्रदीप गायकवाड, युवक अध्यक्ष विशाल वाकडकर, सेवा दल अध्यक्ष आनंदा यादव, प्रदेश युवक संघटक विशाल काळभोर, युवक उपाध्यक्ष अलोक गायकवाड, महिला संघटक कविता खराडे, महिला कार्याध्यक्ष पुष्पा शेळके, पिंपरी विधानसभा महिला कार्याध्यक्षा वर्षा शेडगे, सरचिटणीस रूपाली गायकवाड, राजन सूर्यवंशी, रशीद सय्यद आदी यावेळी उपस्थितीत होते.

बाधितांच्या मोबदल्याचा प्रश्‍न
सायन्स पार्क चौकापासून ते आयुक्त निवासस्थानादरम्यान 16 लहानमोठे उद्योग बाधित होत आहेत. या उद्योगांना मोबदला देण्याचा प्रश्‍न न्यायप्रवीष्ठ आहे. या उद्योजकांना मोबदल्याची पूर्तता करावी अथवा त्यांचे पुनर्वसन करुन याप्रकरणी महापालिकेने तोडगा काढणे गरजेचे होते. मात्र, महापालिका प्रशासनाचे त्याकडे दुर्लक्ष झाल्याने हा प्रश्‍न जटील होत चालला असल्याची तक्रार राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या व्यापारी संघटनेने अध्यक्ष प्रदीप गायकवाड यांनी यावेळी आयुक्तांकडे केली. त्यावर याप्रश्‍नी तोडगा काढण्याचे आश्‍वासन आयुक्त श्रावण हर्डीकर यांना शिष्टमंडळाला दिले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)