आयुक्‍तांचे भाजपासाठी निवडणूक फंड “कलेक्‍शन’

पिंपरी – महापालिका आयुक्त हे कोणत्या आधारावर बांधकाम व्यवसायिकांना पाणी पुरवठ्‌यासाठी ना हरकत प्रमाणपत्र देत आहेत व कोणत्या आधारावर ते अचानकपणे बंद करत आहेत. केवळ मर्जीतल्या बांधकाम व्यावसायिकांना “ना हरकत’ देऊन आगामी निवडणुकांसाठी भाजप फंड गोळा करत आहेत, अशी टीका शिवसेनेचे गटनेते राहुल कलाटे यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्यावर केली आहे.

पाणी पुरवठा विस्कळीत होत असल्याचे कारण पुढे करत चिंचवड पाठोपाठ भोसरी विधानसभा मतदार संघातील बांधकामांना परवानगी न देण्याच्या सूचना भाजपच्या आमदार द्वयींनी केल्या आहेत. त्यामुळे राजकीय वातावरण पेटले आहे. राहुल कलाटे यांनी पत्रकार परिषद घेत त्यांचा समाचार घेतला. ते म्हणाले की, शहराला चोविस तास पाणी पुरवठा करण्याच्या योजनेचे बारा वाजले आहेत. महापालिकाच एका बाजूला ड प्रभागातील पाणी पुरवठ्यासाठी बांधकाम व्यवसायिकांना ना हरकत प्रमाणपत्र देण्यास मनाई करते तर दुसऱ्या बाजूला गुरुवारी (दि. 4) ठराविक दहा बिल्डरांना ना हरकत प्रमाणपत्र कसे काय दिले जाते याचे उत्तर आयुक्तांनी द्यावे.

-Ads-

महापालिकेने रहाटणी, काळेवाडी, वाकड, पिंपळे निलख, ताथवडे या भागात 27 जूनपासून नवीन बांधकामांना नळजोड देण्यास बंदी केली होती. त्यासाठी त्यांना ना हरकत प्रमाणपत्र घेणे बंधनकारक केले होते. यासंदर्भात माहिती घेण्यासाठी 4 जुलै व 21 ऑगस्ट 2018 रोजी आपण आयुक्तांना पत्र पाठवले होते. मात्र त्याचे कोणतेच उत्तर आपल्याला अद्याप मिळालेले नाही. उलटपक्षी स्थायी समितीमध्ये ठरावीक भागात बांधकाम धारकांना नळजोड देण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. आयुक्त कोणाच्या सांगण्यावरुन असे निर्णय घेत आहेत, असा सवाल कलाटे यांनी केला.

चोविस तास पाणी पुरवठ्यासाठी नागपूरच्या एका खासगी कंपनीला आराखडा तयार करण्याचे कंत्राट देण्यात आले आहे. मात्र प्रत्यक्षात शहरात योजनेसाठी पाईप येवून पडले असताना त्या कंत्राटदारांचा आराखडाच तयार नाही. याकडे कलाटे यांनी लक्ष वेधले.

पाणी पुरवठा विभागात बदल – पक्षनेते
पाणी प्रश्‍नावरुन भाजपवर होणाऱ्या आरोप-प्रत्यारोपांना उत्तर देताना सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार म्हणाले की, पाण्याचा प्रश्‍न व समस्या पाहता विभागात काही अंतर्गत बदल करण्यात येणार आहेत. सध्याची स्थिती पाहता नागरिक अधिकाऱ्यांना फोन करतात व अधिकारी त्यांच्या कर्मचाऱ्यांना व कर्मचारी संबंधीत कामगारास सांगतात. यामुळे पाणी पुरवठा विभागातील तक्रारी निवारणासाठी वेळ जात आहे. यावर उपाय म्हणून पाणी पुरवठा विभागात काही बदल करण्यात येतील व कामचुकार अधिकाऱ्यांवर योग्य ती कारवाई करण्यात येणार आहे, असे पवार यांनी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)