आयुक्‍तांचा पाय पालिकेतून निघेना…

मुदतवाढीसाठी थेट मुख्यमंत्र्यांनाच घातले साकडे


आणखी सहा महिन्यांची मागितली मुदतवाढ

पुणे- महापालिकेत तब्बल साडेतीन वर्षांचा कार्यकाल पूर्ण करणाऱ्या आयुक्त कुणाल कुमार यांची केंद्रात सहसचिवपदी बढती झाली आहे. मात्र, त्यानंतरही त्यांचा पाय महापालिकेतून निघत नसल्याने त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा मुदतवाढीचे साकडे घातले आहे. आयुक्तांनी आणखी सहा महिन्यांची मुदतवाढ मागितल्याची माहिती विश्‍वसनीय सूत्रांनी दिली आली.

केंद्रात वर्णी लागल्यानंतर पुढील दहा दिवसांत पदभार सोडणार, असे स्वत: आयुक्तांनीच सांगितले होते. मात्र, त्या आदेशाला 20 दिवस झाले, तरी अजून आयुक्त आपल्या पदावरच कायम आहेत. त्यामुळे त्यांच्या मुदतवाढीच्या मागणीच्या वृत्ताला दुजोरा मिळत आहे. महापालिकेत आयुक्त म्हणून कुणाल कुमार यांचा जवळपास साडेतीन वर्षांपेक्षा अधिक कालावधी पूर्ण झाला आहे. त्यामुळे गेल्या सहा महिन्यांत राज्यभरातील आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या होतानाच; कुणाल कुमार यांच्या बदलीबाबतही चर्चा होती.

महापालिकेच्या महत्त्वाकांक्षी समान पाणी पुरवठा योजनेच्या मंजुरीसाठी आयुक्तांची बदलली होत नसल्याचे सांगण्यात येत होते. आता या योजनेलाही मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे आता कधीही त्यांची बदली होईल, प्रामुख्याने केंद्राच्या स्मार्ट सिटी योजनेसाठी दिल्लीत त्यांची नगरविकास खात्यात बदली होणार असल्याची चर्चा यापूर्वी अनेकवेळा झाली होती. त्यानुसार कुमार यांची दिल्लीत बदली होणार, हे जवळपास निश्‍चित झाले आहे. मात्र, त्यांच्याकडे केंद्रीय गृहनिर्माण व शहर विकास मंत्रालयाच्या सहसचिवपदी बदली निश्‍चित झाली आहे. केंद्र शासनाचे अधिकारी आणि त्यांच्या पदांच्या यादीतून ही बाब समोर आली आहे. या पदावर त्यांची पाच वर्षांसाठी नियुक्ती केली जाणार असल्याचे नमूद करण्यात आले आहे. केंद्रशासनाकडून ही यादी 7 मार्च रोजी जाहीर करण्यात आली होती.

मुख्यमंत्र्यांना घातले साकडे?
मागील आठवड्यात कुणाल कुमार यांनी आणखी सहा महिन्यांची मुदतवाढ मिळावी, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साकडे घातले आहे. त्यासाठी भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांनीही पुढाकार घेतल्याची खात्रीलायक माहिती आहे. यापूर्वी तीन वर्षांचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर आयुक्तांनी समान पाणी योजनेसाठी मुदतवाढ मागितली होती. त्यानंतर त्यांनी शहरातील सायकल योजना आणि नुकतीच पार्किंग पॉलिसीही मंजूर करून घेतली. मात्र, त्यांचा महत्वांकाक्षी प्रकल्प असलेली मुळा-मुठा नदी सुधार योजना आणि नदीकाठ विकसन प्रकल्प केवळ मान्य असून त्यांचे काम अजून सुरू झालेले नाही. त्यामुळे या दोन्ही प्रकल्पांचे कारण आयुक्तांकडून पुढे करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

सौरभ राव यांचेही कारण?
महापालिका आयुक्तांच्या बदलीनंतर त्यांच्या जागी जिल्हाधिकारी सौरभ राव यांचे नाव निश्‍चित समजले जात आहे. मात्र, सध्या राव यांच्याकडे पुरंदर येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय विमानतळाची जबाबदारी आहे. या विमानतळाची अंतिम मान्यता आणि भूसंपादन अजून सुरू झालेले नाही. त्यामुळे राव यांची जिल्हाधिकारी पदावरून बदली झाल्यास हे काम मागे पडण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे शासनाकडून अजून राव यांचीही बदली थांबविण्यात आली आहे. त्यामुळे आयुक्तांनी राव यांचा निर्णय होईपर्यंत महापालिकेत कायम ठेवण्यासाठी आयुक्तांचे प्रयत्न सुरू असल्याचे बोलले जात आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
1 :heart:
1 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)