आयुक्त-सभागृह नेत्यांमध्ये खडाजंगी

आयसीसी टॉवर जागा : जागा स्मार्ट सिटीलाच द्या

पुणे –
 सेनापती बापट रस्त्यावरील आयसीसी टॉवरमधील महापालिकेस आर-7 अंतर्गत मिळालेली तब्बल 40 हजार चौरस फूट जागा बांधकाम व्यावसायिकांना भाडे कराराने देण्याबाबत महापालिका आयुक्त सौरभ राव आग्रही आहेत. मात्र, ही जागा मुख्यसभेने ठराव करून स्मार्ट सिटीच्या कार्यालयासाठी निश्‍चित केली आहे. त्यामुळे ती जागा स्मार्ट सिटीलाच द्यावी अशी भूमिका सभागृह नेते श्रीनाथ भिमाले यांनी स्मार्ट सिटीच्या बैठकीत शनिवारी घेतली. त्यावरून महापालिका आयुक्त राव आणि भिमाले यांच्यात चांगलीच खडाजंगी झाली.

या बैठकीला महापौर मुक्ता टिळक, सभागृहनेते श्रीनाथ भिमाले, शिवसेनेचे गटनेते संजय भोसले, विरोधीपक्षनेते दिलीप बराटे, रविंद्र धंगेकर, आयुक्त सौरभ राव, स्मार्ट सिटीचे कार्यकारी संचालक राजेंद्र जगताप उपस्थित होते.
स्मार्ट सिटीचे कार्यालय आयसीसी टॉवरमध्ये आहे. येथील 40 हजार स्केअर फुट जागा पालिकेच्या ताब्यात आली आहे. ही जागा भाड्याने दिल्यानंतर वर्षाला 6 कोटी रुपये महापालिकेला मिळतील. महापौर व पदाधिकाऱ्यांची कार्यालये आणि नगरसचिव कार्यालय नवीन विस्तारीत इमारतीमध्ये गेल्यानंतर रिकाम्या होणारी जुन्या इमारतीमधील जागा स्मार्ट सिटी कार्यालयासाठी देण्याची भूमीका आयुक्त राव यांनी बैठकीत मांडली. त्यावर पालिकेच्या अनेक विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी सावरकर भवन व इतर ठिकाणी बसतात.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

रिकाम्या होणाऱ्या ठिकाणी बाहेरील सर्व कार्यालये व विभाग प्रमुख आणावेत आणि स्मार्ट सिटीचे कार्यालय आहे, त्याच ठिकाणी ठेवावे, अशी भूमीका सभागृहनेते भिमाले यांनी मांडली. त्यावरुन भिमाले आणि राव यांच्यात बराच वेळ वाद झाला. अखेर स्मार्ट सिटीचे कार्यालय सावरकर भवन किंवा मंथन इमारतीमध्ये हलविण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र आयसीसी टॉवरच्या जागेबाबत कोणताही निर्णय झाला नाही. मात्र, या वादामुळे या बैठकीत चांगलीच गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती.

ही जागा स्मार्ट सिटीला मंजूर झाली आहे. त्यामुळे त्या ठिकाणी त्यांचेच कार्यालय असावे, मात्र, आयुक्तांकडून काही ठराविक बांधकाम व्यावसायिकांना डोळयासमोर ठेऊन हा निर्णय घेतला जात आहे. त्यामुळे ही जागा कोणाच्याही घशात जाऊ दिली जाणार नाही. शहरात इतर ठिकाणीही महापालिकेच्या जागा आहेत. मात्र, प्रशासन त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करत असून याच जागेबाबत निर्णय घेण्याची घाई प्रशासनाला झाली आहे.
– श्रीनाथ भिमाले, सभागृह नेते, मनपा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)