“आयपीपीबी’ला अपुऱ्या मनुष्यबळाचे ग्रहण

पिंपरी – बॅंक सेवा ग्राहकांच्या घरी आणण्यासाठी केंद्र सरकारने इंडिया पोस्ट पेमेंट बॅंकेची (आयपीपीबी) घोषणा केली. मात्र, या योजनेची भिस्त असलेल्या टपाल कर्मचाऱ्यांची वाणवा असल्याने दैनंदिन आणि “आयपीपीबी’ची काम याची सांगड कशी घालायची असा प्रश्‍न टपाल खात्यासमोर आहे.

केंद्र सरकारकडून “आयपीपीबी’ची घोषणा केली आहे. बचत खाते आणि चालू खाते उघडणे, पैसे पाठवणे व हस्तांतरण करणे, डायरेक्‍ट बेनिफिट ट्रान्स्फर (डी.बी.टी.), बिल आणि “युटीलिटी पेमेंट’ आदी सेवा यामाध्यमातून नागरिकांना घर बसल्या मिळणार आहेत. शून्य रकमेवर केवळ आधार क्रमांक आणि “बायोमेट्रिक’वर खाते उघडले जाणार असून टपाल कर्मचारी ही घरपोच सेवा देणार आहेत. खाते उघडल्यानंतर घरबसल्या केवळ संदेश पाठवून पोस्टमनकडून पैसे मागवू तसेच पैसे भरणे शक्‍य होणार आहे. “डिजीटायझेशन’ बरोबरच टपाल खात्यालाही यातून नवसंजीवनी मिळणार आहे.

-Ads-

पुणे शहरात 1 सप्टेंबरपासून या योजनेला सुरूवात झाली आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये नोव्हेंबर अखेरपर्यंत योजना सुरु करण्याचे उद्दीष्ट्य आहे. टपाल खात्याकडे गेली अनेक वर्षे मनुष्यबळाची वाणवा आहे. टपाल खात्याच्या पुणे पुर्व विभागामध्ये पिंपरी-चिंचवड शहराचा समावेश होतो. यामध्ये पिंपरी-चिंचवडसह खडकी, हडपसर असा पुण्याचा काही भाग देखील येतो. पिंपरी, चिंचवड, प्राधिकरण, चिखली, हिंजवडी, पिंपरी कॉलनी याठिकाणी टपाल कार्यालये आहेत. सुमारे 22 लाख लोकसंख्येच्या शहरासाठी अवघे 136 टपाल कर्मचारी कार्यरत आहेत. शहरातील 16 टपाल कार्यालयांमधील स्थिती पाहिली असता निम्म्या मनुष्यबळावर काम सुरु आहे.

पत्र व्यवहाराबरोबरच, विविध परवाने, आधारकार्ड, पासपोर्ट (पारपत्र), धनादेश, मुलाखतीचे कॉल, विविध पार्सल नागरिकांपर्यंत टपाल कर्मचाऱ्यांना पोहचवावे लागतात. त्यातच आता घरोघरी जात “आयपीपीबी’चे खाते उघडण्याचे काम टपाल कर्मचाऱ्यांना करावे लागणार आहे. कर्मचाऱ्यांना नुकतेच याबाबतचे प्रशिक्षण देण्यात आले. खाते उघडून देण्यासाठी कर्मचाऱ्यांना मोबाईलचे वितरण सुरू करण्यात आले आहे. मात्र, रोजचे टपाल वाटप पुर्ण करायचे की “आयपीपीबी’साठी फिरायचे, असा सवाल कर्मचाऱ्यांना सतावत आहे. आधीच मनुष्यबळ कमी असताना नवीन कामाचा बोजा पडल्याने कामाचे नियोजन कसे करायचे, असा पेच टपाल कार्यालयातील वरिष्ठांसमोर निर्माण झाला आहे.

पिंपरी-चिंचवड टपाल कार्यालय
शहरातील पोस्टमनची संख्या – 136
ग्रामीण डाक सेवक – 34
रिक्‍त पदे – 120
पत्रांची डिलिव्हरी होणारी केंद्रे – 16
दैनंदिन एका केंद्रावर येणारी रजिस्टर व स्पीड पोस्ट – 1000 ते 2000

What is your reaction?
1 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)