आयपीओ जाहीर होण्याच्या आधीचे ‘छुपे रुस्तम’ (भाग-२)

आयपीओ जाहीर होण्याच्या आधीचे ‘छुपे रुस्तम’ (भाग-१)

काही कंपन्यांबद्दल आज आपण जाणून घेऊयात की ज्या कंपन्या आपल्या परिचयाच्या आहेत परंतु त्यांची शेअरबाजारात अजून नोंदणी झालेली नाहीय.

एचडीबी फायनॅन्शिअल सर्व्हिसेस –

ही एचडीएफसी बँकेचीची सब्सिडिअरी असलेली गैर बँकिंग वित्तीय संस्था आहे. या कंपनीमध्ये एचडीएफसी बँकेचा हिस्सा हा ९५% पेक्षा अधिक आहे. या कंपनीस क्रिसिल व केअर या पतमापन कंपन्यांचं AAA रेटिंग देखील आहे. आजमितीस या कंपनीच्या देशभरात एकूण १००० शाखा कार्यरत आहेत ज्यामार्फत कंपनी विविध पर्यायांद्वारे कर्ज देते. उदा. पर्सनल लोन, बिझनेस लोन, कार लोन, सोनं तारण कर्ज, मालमत्ता तारण कर्ज इ. कंपनीचं सहामाही उत्पन्न (एप्रिल ते सप्टें. २०१८) हे ४०७१ कोटी रुपयांवर आहे जे मागील वर्षाच्या पहिल्या सहामाहीत ३३३७ कोटी होतं, म्हणजेच एका वर्षात १८% वाढ. तर कंपनीचा २०१७-१८ च्या पहिल्या सहामाहीतील नफा ४०२.७७ कोटी रुपयांवरून वाढून या वर्षी ५२५.६० कोटी रुपयांवर पोहोचलेला आहे. तर अशा या कंपनीच्या शेअर्सचा भाव, जो दोन महिन्यांपूर्वी ११५० च्या वर गेलेला होतातो इतर गैर बँकिंग वित्तीय संस्थांबद्दलच्या (NBFC) अफवांमुळं आज रोजी साधारणपणे ८०० रुपयांच्या आसपास आलेला आहे. या कंपनीच्या शेअर बाजारातील नोंदणीबाबत सध्या जोरदार चर्चा देखील होत आहे. नक्कीच या भावात खरेदी केलेलीही कंपनी भवितव्यात उत्तम परतावा देऊ शकते. उद्याची बजाज-फायनान्स म्हणून या कंपनीकडं पाहिलं जातंय.

कर्ल-ऑन एन्टरप्रायजेस –

सर्वांच्या परिचयाची असलेली ही भारतातील गाद्या (मॅट्रेसेस) बनवणारी एक अग्रगण्य कंपनी म्हणून ओळखली जाते. जी स्प्रिंग, फोम, कॉयर व थेरप्युटिक या प्रकारांमध्ये आपली गाद्यांची उत्पादनं विकते. गाद्यांव्यतिरिक्त या कंपनीनं विविध प्रकारच्या उशा, सोफे, कॉट्स, बेडशीट्स आदी उत्पादनं देखील बाजारात आणली आहेत. या आर्थिक वर्षाअखेरीस कंपनीचा नक्त नफा हा ८४.३५ कोटीं रुपयांच्या घरात आहे जो मागील वर्षी ६०.७९ कोटी होता. कंपनीनं जाहीर केलेल्या अहवालात म्हटल्याप्रमाणं या वर्षीचा EPS (प्रति शेअर उत्पन्न) हे ३०.३६ रु.आहे. तसंच दोन महिन्यांपूर्वी कंपनीनं बोनस शेअर्स देखील दिलेले आहेत. या कंपनीचे शेअर्स गुंतवणुकीसाठी सध्या ११०० च्या भावात उपलब्ध आहेत.

कॅथलिक सीरियन बँक :

या कंपनीविषयीआपण पूर्वी जाणून घेतले आहे. (फेब्रुवारी) फेअरफॅक्स ही, कॅनडास्थित गुंतवणूकदार प्रेम वत्स यांची कंपनी केरळच्या कॅथलिक सीरियन बँकेद्वारे भारतात गुंतवणूक करत आहे असं म्हटलं होतं. त्याप्रमाणे, यातील एकूण रु. १२ बिलियन गुंतवणुकीपैकी पहिला रु. ४.४ बिलियनचा टप्पा मागील महिन्यात पार पडला. आता यात संधी कशाप्रकारे आहे ते पाहुयात. एका अग्रगण्य वृत्तसंस्थेच्या परीक्षण अहवालानुसार मार्च १७ रोजी या बँकेचं पुस्तकी मूल्य हे रु.१२३ इतके होतं व सध्या या बँकेचे शेअर्स रु. १६०-१७० दरम्यान उपलब्ध आहेत. बाजार मूल्य व पुस्तकी मूल्य यांचं गुणोत्तर पाहता इतर कोणत्याही खासगी बँकेच्या तुलनेत ही बँक उजवीच वाटते.

स्टारलाईट पॉवर:

पॉवर ट्रान्समिशन या पायाभूत सुविधेकरिता ही एक अग्रगण्य कंपनी म्हणून ओळखली जाते.  सध्या कंपनीकडं भारतातील १२ व ब्राझील येथील ९ असे एकूण २१ प्रोजेक्ट्स असून १२५०० सर्किट किलोमीटर्सची कामं सुरु आहेत. कंपनीचा सध्याचा बाजारातील हिस्सा हा ३० % असून गुंतवणूक करण्यासाठी २५०-३०० दरम्यानचा भाव रास्त वाटतो.

यूटीआय एएमसी:

एचडीएफसी एएमसीला मिळालेला प्रतिसाद पाहता या कंपनीच्या आयपीओ ला देखील चांगला प्रतिसाद अपेक्षित आहे. सध्याचा भाव रु. ८०० च्या घरात असून लवकरच आयपीओची घोषणा अपेक्षित आहे.

यांव्यतिरिक्त अनेक चांगल्या कंपन्या ह्या, बाजारात त्यांचे आयपीओ येण्याअगोदर उपलब्ध आहेत. पैकी कॅरिअर व तामिळनाड बँक यांसारख्या कंपन्यांनी भक्कम लाभांश देखील दिलेला आहे (अनुक्रमे, ५१% व २०%). जागेअभावी त्यांच्याबद्दल विस्तृत न लिहिता त्यांची नांवं व कंसात त्यांचे सध्याचे भाव (रु.) देत आहे.

नॅशनल स्टॉक एक्स्चेंज (९००-९५०), उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक (२२५-२४०),कॅरिअर एअरकॉन (१६०-१६५), भारत निधी (१५०००-१६०००), भारती टेली. (१२५-१३०), फिनो पे-टेक (११०), एचडीएफसी सिक्युरिटीज (९०००-९३००), मेट्रोपॉलिटन स्टॉक एक्स्चेंज (१.३०-१.५०), तामिळनाड मर्कंटाईल बँक (३८०-४००), बार्बेक्यू नेशन (१०००-१०५०) , वन ९७ कम्युनिकेशन्स म्हणजेच पेटीएम (१९०००-१९५००), फ्लिपकार्ट (५०००), एसबीआय होम फायनान्स (२५-३५), इ.

(अस्वीकृती : वरील कंपनीत लेखकाचे कोणतेही हितसंबंध नाहीत अथवा गुंतवणूक देखील नाही व असल्यास ती कंपनीच्या भागभांडवलाच्या १% पेक्षा कमी आहे.)


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)