आयपीएलचे यश : पैसा की गुणवत्ता? 

अमित डोंगरे 

यंदा 12.5 कोटी मिळवून इंग्लडचा बेन स्टोक सर्वाधिक महागडा परदेशी खेळाडू ठरला त्याला राजस्थान रॉयल्सने विकत घेतले. भारतीय खेळाडूत जयदेव उनाडकट हा सर्वांत महागडा खेळाडू ठरला त्याला साडेअकरा कोटी रुपये बोलीवर राजस्थान रॉयल्स्‌ने खरेदी केला. मराठमोळा केदार जाधवही 7 कोटी पेक्षा जास्त रक्‍कम मिळवत चेन्नई सुपर किंग्ज्‌कडे दाखल झाला. 

यंदा युवराज सिंगला केवळ 2 कोटी रुपयांवर समाधान मानावे लागले तर लसीत मलिंगा आणि टी-20 बादशहा क्रिस गेल यांच्यावर कोणी बोलीच लावली नाही. जगात ‘इमान आणि श्रध्दा’ या दोन-गोष्टी स्पर्धेत विकत घेतल्या जातात व सिद्धही केल्या जातात. या जागतिक खेळाडूंचा भरणा असणाऱ्या स्पर्धेतून गेल्या अकरा वर्षात भारताला एकही दर्जेदार यष्टीरक्षक फलंदाज मिळू नये यातच ही स्पर्धा किती ‘फ्लॉप’ ठरते हे स्पष्ट होते. महेद्रसिंग धोनी याचा पर्याय अद्यापही आपल्याला सापडत नाही हेच या 11 वर्षाच्या आयपीएलचे अपयश आहे. क्रिकेटची चिंता इथे आहेतच कोणाला कारण चौकार-षटकार घडतात, आयटम गर्ल नाचतात त्यात भारतीय अभिनेते व अभिनेत्रीही हातभार लावतात व करमणुकीच्या पातळीवर गेली 11 वर्षे ही ‘सर्कस’ यशस्वी झाल्याचे भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) सिध्द करते इतकेच.

करार आणि आकडे 
या स्पर्धेसाठी जी रक्‍कम लिलावादरम्यान बोली लावून खेळाडूला देण्यात येणार असते ती रक्‍कम व प्रत्यक्षात दिली जाणारी रक्‍कम यांत वसिम अक्रम ते आशिष नेहरा इतका मोठा फरक असतो. यंदा बेन स्टोक्‍सला 12.5 कोटी रकमेत खरेदी केले गेले. या करारांचे ढोबळ स्वरूप आता समजून घेवू. स्टोक्‍सला संघाचा प्रत्येक सामन्यात खेळावे लागेल. समजा एका स्पर्धेत एका संघाला 12 सामने मिळणार असतील तर त्या सर्व सामन्यांत स्टोक्‍स ‘प्लेईंग इलेव्हन’ मध्ये हवा. तसेच त्याची कामगिरी हा देखील एक निकष आहे. उपांत्य व अंतिम सामन्यांत त्याची कामगिरी अन्य खेळाडूंपेक्षा सरस हवी. फलंदाजीत प्रमुख धावा आणि गोलंदाजीत ठराविक बळीही मिळायला हवेत. तो जर कर्णधार असेल तर संघाची विजयाची सरासरी 100 टक्के हवी. त्यात सामनावीर वा मालिकेचा मानकरी ठरणे हा देखील एक भाग आहे.
हे झाले मैदानावरील कामगिरीबाबत. आता संघाच्या प्रत्येक ‘प्रमोशन इव्हेंट’ला कोणत्याही वेळी तो उपलब्ध असावा. मैदानावर व मैदानाबाहेर कोणत्याही वादात त्याचे नाव येता कामा नये. स्पॉट फिक्‍सिंग, बुकी, नाईट पार्टी, डेटींग या पैकी कोणत्याही गोष्टीत त्याचा सहभाग नसावा. खेळाडूंशी, पंचाशी व प्रेक्षकांशी त्याचे वर्तन शिस्तबध्दच असावे. हे आणि असे सगळे अडथळे पार केले तर आयकर, होल्डींग मनी वगैरेंसारखे पोट नियम वापरून स्टोक्‍सला या रकमेच्या अर्धी रक्‍कम तरी मिळेल का याची खात्री नाही. स्टोकला शिस्तभंगाची कार्यवाही म्हणून इंग्लडने ऍशेस मालिके तून वगळले त्याला आयपीएलमध्ये मात्र स्वीकारले गेले म्हणजेच या स्पर्धेला खेळाडूच्या मैदानाबाहेरील वर्तनाशी कोणतेही देणे-घेणे नाही हेच स्पष्ट होते.

या स्पर्धेच्या इतिहासात रोहित शर्मा, हरभजनसिंग, युवराज सिंग, आर. अश्‍विन, महेंद्रसिंग धोनी, विराट कोहली, संजु सॅमसन, शेन वॉर्न, जहीर खान, प्रविण तांबे, जॅक कॅलीस, स्मिथ, सनथ जयसुर्या याच खेळाडूंना जितकी बोली लावली गेली ती रक्‍कम दिली गेल्याचे सांगितले जाते. म्हणजेच स्पर्धेतील सर्व संघ मिळून जितके खेळाडू असतील त्यातील केवळ 2-5 टक्‍के खेळाडूंना संपूर्ण रक्‍कम मिळाली बाकीच्यांना ‘आश्‍वासन आणि गाजर’. आयकॉन खेळाडूंना या यादीत धरलेले नाही कारण सचिन तेंडुलकर, व्ही. व्ही. एस. लक्ष्मण, सौरव गांगुली, राहुल द्रविड या आयकॉन खेळाडूंचा करार व त्याचे निकष वेगळे होते. असो, करार कोटी-कोटी रूपयांचा जरी मिळाला तरी प्रत्यक्षात दिसणारी रक्‍कम अर्थसंकल्पीय त्रुटींसारखी फसवीच असते.

लोढा समिती काय करणार ? 
माजी न्यायमूर्ती आर. एम. लोढा यांनी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) कारभाराबाबत काही सूचना व शिफारशी केल्या आहेत. लोढा अहवालाला एक प्रकारे केराची टोपलीच मंडळाने दाखवली आहे.
आयपीएल व अन्य स्पर्धांतील सामन्यांत प्रत्येक षटकांनंतर ज्या जाहिराती दाखवल्या जातात त्यावरही बंदी देण्याबाबत लोढा यांनी सुचवले आहे. अशा स्थितीत आयपीएल व इतर स्पर्धेतून मिळणारे जाहिरातींचे करोडो रुपयांचे उत्पन्न बुडण्याची भीती मंडळाला वाटते आहे. जाहिराती बंद झाल्या तर उत्पन्न बुडेल व त्याचा पूर्ण परिणाम स्पर्धांवर, सामन्यांच्या आयोजनावर, थेट प्रक्षेपणावर व निवृत्त खेळाडूंना दिल्या जाणाऱ्या ‘पेन्शन’वर होईल हे उघड आहे. मुळात आयपीएल जेव्हा सुरू झाली तेव्हा सुरुवातीची दोन-तीन वर्षे त्याची तुफान लोकप्रियता होती आज मात्र त्याला ओहोटी लागलीये. 2013 मध्ये आयपीएल स्पॉट फिक्‍सिंग, सट्टेबाजी सर्व उघड झाल्यानंतर तर या स्पर्धेपासून मूळ क्रिकेटचा चाहता दुरावला आहे..

युवा खेळाडूंचे काय ? 
भारताच्या युवा संघातील (19 वर्षांखालील) खेळाडूंनी आयपीएल खेळावी का खेळू नये याबाबत खूप दिवस चर्चा रंगत आहे. कसोटी, एकदिवसीय क्रिकेटसाठी लागणारी एकाग्रता, फटक्‍यांची निवड व बचाव यासाठी युवावस्थेत आयपीएल घातक ठरू शकते असे अनेक वरिष्ठ खेळाडू सांगतात. पण कमी वेळात, कमी श्रमात जास्त पैसा हे गणित सध्या खेळाडू, प्रशिक्षक व पालक सोडवतात. आमचा मुलगा अगदी सचिन बनला नाही तरी चालेल पण त्याला आयपीएल खेळायला मिळावी असे पालक म्हणू लागलेत. हीच भारतीय क्रिकेटसाठी धोक्‍याची घंटा आहे. कसोटीसाठी लागणारे भक्‍कम तंत्र हे खेळाडू आयपीएलमुळे गमावून बसतात आणि म्हणूनच एकेकाळी फिरकी समोर दादागिरी करणारे भारतीय फलंदाज आज परदेशी फिरकी गोलंदाजीसमोर ‘पिंगा’ घालताना दिसतात. पृथ्वी शॉ, नितीश राणा, कमलेश नागरकोटी, शुभमन गील, अभिषेक शर्मा, इशान किशन, ऋषभ पंत, सर्फराज खान, महीपाल लोमरोर, अरमान जाफर हे युवा खेळाडू खरेतर उद्याच्या भारतीय संघाचे ‘बिग फिश’ होवू शकतात मात्र आयपीएलच्या ‘हिट आऊट गेट आऊट’ तत्वामुळे त्यांचे नुकसान होणार हे स्पष्ट आहे. पण त्याला कोणीच काही करू शकत नाही. मंडळानेच जर पाऊले ओळखली तर अशा खेळाडूंना आयपीएल बंदी लावता येईल व संघाची भविष्यकालीन तरतूद करता येईल.

इंग्लिश प्रिमिअर लिग, एनबीए, कौंटी क्रिकेटचा आदर्श घेत आयपीएल सुरू झाले. त्यांनी त्यांचा दर्जा सांभाळालाच नव्हे तर उंचावला पण आपण त्याच्या आहारी जाऊन तंत्रशुद्ध फलंदाजीचा खून करत आहोत. मुली नाचतात काय, समालोचन करण्याचा केविलवाणा प्रयत्न करतात काय, सगळेच अनाकलनीय आहे. क्रिकेट हा खेळ होता एकेकाळी, एकेकाळी तो सज्जनांचाच होता पण आज त्याचा बाजार झालाय. जनावरे किंवा पूर्वी आफ्रिकेतले लोक अमेरिकेत गुलाम म्हणून विकले जायचे इथे क्रिकेटपटू विकले जातात. जो जास्त पैसा देईल त्याच्यावर त्या मोसमापुरती श्रद्धा ठेवायची नाही तर दुसऱ्या वर्षी नवीन घरोबा करायचा व त्याच्या नावाचे कुंकू लावायचे. कली शीरलेले युग म्हणतात ते हेच. यातून क्रिकेटचे, खेळाडूंचे काय भले होणार याचा साधा विचारही करायला कोणाला वेळ नाही.

आयपीएल स्पर्धेला इंडियन प्रिमिअर लीग म्हणावे का इंडियन पैसा लीग ? आता या स्पर्धेने इतर देशांच्या संघांनी काय कमावले व आपण काय गमावले हे बघु. याच स्पर्धेतून गुणवत्ता हेरून वेस्ट इंडीज संघाने टी-20 विश्‍वकरंडक जिंकला व गतवैभवाकडे वाटचाल सुरू केली. अन्य संघांनाही या स्पर्धेतून ‘मॅचविनर’ खेळाडू मिळत आहेत पण भारतीय संघाला या स्पर्धेतून गेल्या दहा वर्षात पैसा सोडून बाकी काहीही गवसले नाही ही वस्तुस्थिती आहे. मुळात आयपीएल मधली कामगिरी भारतीय संघात स्थान मिळविण्यासाठी ग्राह्यच धरली जात नाही. आज तरी आपला टी-20 चा संघ पहा, जो संघ एकदिवसीय आणि कसोटीसाठी आहे, त्यातच संगीत खुर्चीचा खेळ ठेवतात, जागा बदलतात व टी-20 संघ तयार होतो. आयपीएलमधून असा एकही खेळाडू नाही की ज्याने भारताच्या टी-20 संघात स्थान मिळवले आहे व पक्‍के केले आहे. उलट बाकीच्या जवळपास प्रत्येक संघात याच स्पर्धेतून नावारूपाला आलेले खेळाडू स्थान टिकवून आहेत. गेल, सॅम्युअल, सिमन्स वगैरेंना याच स्पर्धेतून विंडीज संघात स्थान मिळाले व त्यांनी टी-20 विश्‍वकरंडक जिंकण्याची किमया साधली. बाकीचे देश गुणवत्ता मिळवतायेत आणि आपण फक्‍त पैसा.

स्टीव स्मिथ, शॉन मार्श, जेम्स फ्लॉकनर (ऑस्ट्रेलिया), जे. पी. डयुमिनी, फाफ टु फ्लेसी, डेल स्टेन (दक्षिण आफ्रिका), सकीब अल हसन, मशफीहुर रहीम, मशरफी मोर्तझा (बांगला देश), दिनेश चंडीमल, तिलकरत्ने दिलशान, तिसेरा परेरा, अँजेलो मॅथुज (श्रीलंका), मार्टीन गुप्टील, ब्रैडन मॅकलम, कोरी अँडरसन, रॉस टेलर (न्यूझीलंड), जो रूट, ऍलक्‍स हेल, जोस बटलर, केवीन पीटरसन (इंग्लंड) या देशांना हे असे मॅचविनर खेळाडू याच स्पर्धेने दिले. भारताकडे यादीच नाही.

रूद्रप्रताप सिंग, आर. अश्‍विन, रविंद्र जडेजा, जहीर खान किंवा संपूर्ण भारतीय संघाचे अनेक खेळाडू वेगवेगळया संघांकडून खेळतात मात्र हे ‘आयपीएल फाईंड’ नाहीत. ते मुळात रणजी स्पर्धेतून भारतीय संघात निवडले गेले आहेत. आज ही स्पर्धा अकरा वर्षांची झाली मात्र आजही भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) या स्पर्धेतील कामगिरीची दखल घेवून संघ निवडत नाही. बेजबाबदारपणा दाखवणाऱ्या रोहित शर्मा, शिखर धवन व मधल्या फळीत अपयशी ठरत असलेल्या सुरेश रैनाला यंदाच्या स्पर्धेतून पर्याय मिळाला तरच भारताचे ‘मिशन 2019’ यशस्वी होईल.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)