“आयटीयन्स’ची वाहतूक कोंडी सुटणार का?

पिंपरी पोलीस आयुक्‍त उतरले रस्त्यावर : पुणे ते हिंजवडी आयटी पार्क मार्ग “वन वे’

पिंपरी – हिंजवडी येथे होणाऱ्या वाहतूक कोंडीचे गांभीर्य लक्षात घेता स्वतः पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांनी हिंजवडीच्या रस्त्यावर उतरुन त्यांनी थेट नागरिकांशी संवाद साधला. हिंजवडी वाहतूक पोलिसांनी सोमवारपासून (दि. 3) प्रायोगिक तत्त्वावर पुणे ते हिंजवडी आयटी पार्क हा मार्ग “वन वे’ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचा “श्रीगणेशा’ देखील यावेळी करण्यात आला. त्याला “आयटीयन्स’नी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

प्रायोगिक तत्त्वानुसार तुर्तास काही दिवस पुण्याकडून सकाळी आठ ते अकरा या “पिक अवर’मध्ये येणारी वाहतूक ही शिवाजी चौकातून “फेज वन’कडून “फेज टू’ व “थ्री’कडे जाईल. यावेळी वाहतूक गतिमान असल्यामुळे वाहतूक कोंडीचा कोणताही त्रास होणार नाही. स्थानिक नागरिक दुसऱ्या “लेन’चा वापर पुण्याकडे जाण्यासाठी करतील. तर सायंकाळी सुद्धा चार ते सात या वेळेत “फेज वन’च्या आयटी कर्मचाऱ्यांना “फेज टू’ मार्गेच शिवाजी चौकात यावे लागणार आहे.

वाहतूक बदलाबाबत आयुक्‍त पद्मनाभन यांनी रस्त्यावरुन जाणाऱ्या आयटी कर्मचाऱ्यांना थांबवून त्यांच्याशी संवाद साधला. त्यावेळी एका दुचाकीस्वाराने या बदलामुळे 15 मिनिटे वेळ वाचल्याचे सांगितले. तर चारचाकी चालकाने अवघ्या 10 मिनिटांत शिवाजी चौक गाठल्याचे सांगितले. हा बदल तुर्तास प्रायोगिक तत्त्वावर आहे मात्र तो कायम कसा ठेवता येईल यासाठी आयुक्तांनी तेथील स्थानिक गावकरी व ग्रामपंचायतीचे आजी-माजी पदाधिकारी यांच्याशीही संवाद साधला. काही ग्रामस्थांनी या बदलास विरोध देखील केला. “पिक अवर’च्या बदलामुळे आम्हाला गावातच अडकून पडावे लागले, अशी भूमिका घेतली. आयुक्तांनी ही सुरुवात असून यातून मध्यम मार्ग काढण्याचे आवाहन केले. गावकऱ्यांनी अंतर्गत मार्ग वापरले तर प्रश्‍न मार्गी निघू शकतो, असेही सुचवले.

“आयटीयन्स’ला शिस्त गरजेची!
दरवेळी केवळ गावकऱ्यांनाच लक्ष्य केले जाते. यामध्ये कंपनीतील कर्मचाऱ्यांनाही शिस्त लावणे गरजेचे आहे. आयटी कर्मचाऱ्यांनीही सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करावा, चार चाकीतून जात असाल तर त्यातून किमान तिघांनी एकत्रित प्रवास करावा. रस्त्यावर अशा 90 टक्के चार चाकी वाहनांमधून केवळ एक व्यक्ती प्रवास करत असते. त्यात बेशिस्त दुचाकीस्वार भर घालत असतात. त्यामुळे केवळ गावकरीच नाही तर “आयटीयन्सनी’ही स्वतःला शिस्त लावणे गरजेचे असल्याची अपेक्षा ग्रामस्थांनी यावेळी व्यक्त केली.

आयटी पार्क बनवताना आधी रस्त्याचा विचार होणे गरजेचे होते. तो झाला नाही. त्यामुळे ही परिस्थिती ओढावली आहे. आत्ताही गावकरी व स्थानिक नागरिकांनी यातून तोडगा काढला नाही तर परिस्थिती गंभीर बनू शकते. यासाठी पोलीस प्रशासन, पीएमआरडीए, ग्रामपंचायत, महापालिका व येथील आयटी कंपन्यांनी संयुक्तपणे तोडगा काढणे गरजेचे आहे. यासाठी कंपन्यांकडून मिळणाऱ्या “सीएस’आर फंडातून कामे करण्यावर भर द्यावा. यासाठी कंपन्यांनाही हाताशी घेणे गरजेचे आहे.
– आर. के. पद्मनाभन, पोलीस आयुक्‍त.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)