आयटीपार्क तळवडे भागात होणारी वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी लवकरच उपाययोजना

पोलीस आयुक्‍त आर. के. पद्‌मनाभन यांची देहुरोड पोलीस ठाण्याला भेट

देहुरोड – पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्‍तालयासह त्याच्या कार्यक्षेत्रात असलेले 15 पोलीस ठाण्यात वाहने व पोलीस कर्मचारी वर्गाची कमतरता आहे. पोलीस कर्मचाऱ्यांची भरती करण्यास वरिष्ठांची मान्यता मिळालेली आहे. देहुरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आयटीपार्क तळवडे भागात होणारी वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी लवकरच उपाययोजना करण्यात येणार आहे. असे पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्‍त आर. के. पद्‌मनाभन यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

-Ads-

देहुरोड येथे विविध पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची बैठक पोलीस आयुक्‍त पद्‌मनाभन यांनी घेतली होती. त्यावेळी पत्रकारांशी वार्तालाप करताना ते बोलत होते. त्यावेळी पोलीस उपायुक्‍त नम्रता पाटील उपस्थित होत्या. पत्रकारांनी उपस्थित केलेल्या विविध प्रश्‍नांना उत्तरे देताना आयुक्‍त पद्यनाभन यांनी तळवडे येथील आयटी पार्क परिसरातील नित्याची होणारी वाहतूक कोंडीवर भाष्य केले. तळवडे भागातून चाकण एमआयडीसीकडे व आळंदीकडे ये-जा करणारी अवजड मालवाहू वाहने तसेच आयटी पार्कमधील वाहने मोठ्या प्रमाणात असून, तळवडे आयटी पार्क चौक तसेच तळवडे गाव चौक येथे होणारी वाहतूक कोंडी दूर करण्यास लवकरच उपाय योजना करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले.

आयुक्‍तालयाकडे पुरेसे मनुष्यबळ नाही. उपलब्ध मनुष्यबळावर पोलीस चांगले काम करीत आहेत. देहुरोड व तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यातील मनुष्यबळ कमी झाले असून, आयुक्‍तालयासाठी चारशे पोलीस कर्मचाऱ्यांची भरती करण्यास मान्यता मिळाली आहे. विविध पोलीस ठाण्यातील वाहनांच्या कमतरतेबाबत प्रश्‍न उपस्थित केले. त्यांनी वाहनांची संख्या कमी असल्याचे मान्य केले. आयुक्‍तालय नवीन आहे. व्यवस्थित सुरळीत होण्यास हळूहळू वेळ लागेल. नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन केले.

द्रुतगती महामार्ग, पुणे-मुंबई महामार्ग व देहुरोड कात्रज बाह्यवळण मार्ग असून, वाहतुकीची समस्या वारंवार निर्माण होत असल्याबाबत विचारले असता त्यांनी वाहतूक विभागाकडेही पोलीस कर्मचाऱ्यांची संख्या कमी असल्याचे स्पष्ट केले. तरी देखील येत्या काही दिवसांत किवळेतील मुकाई चौक, देहूरोड येथील सेंट्रल चौक व महामार्गावरील सवाना चौकात लवकरच पोलीस उपलब्ध होतील आणि येथून त्वरीत कंट्रोल केले जाईल, असे पद्‌मनाभन यांनी सांगितले. अधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर त्यांनी देहूरोड पोलीस ठाण्यातील लॉकअप रूमची पाहणी केली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)