“आयटीनगरी’च्या रस्त्यांनी घेतला मोकळा श्‍वास

पिंपरी – हिंजवडीतील वाहतूक कोंडी सोडवण्यावर सध्या पिंपरी-चिंचवड आयुक्तालयाचा भर आहे. त्यासाठी गेल्या 15 दिवसांपासून हिंजवडी वाहतूक पोलीस विविध उपक्रम राबवत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून एमआयडीसी प्रशासन व वाहतूक पोलिसांनी संयुक्‍त कारवाई करत परिसरातील सुमारे 300 ते 350 अनधिकृत टपऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे.

ही कारवाई सकाळी आठ ते सायंकाळी चार वाजेपर्यंत सुरु होती. परिमंडळ एकच्या पोलीस उपायुक्त नम्रता पाटील, सहायक पोलीस आयुक्त श्रीधर जाधव, हिंजवडीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी गवारे, वाहतूक पोलीस निरीक्षक किशोर म्हसवडे, एमआयडीसी कार्यकारी अभियंता निलेश मोढवे, प्रादेशिक अधिकारी संतोष देशमुख, उपअभियंता विठ्ठल राठोड यांच्या अधिपत्याखाली कारवाई करण्यात आली.

यावेळी हिंजवडी फेज एक व दोन मधील 30 ते 35 टपऱ्या तर शिवाजी चौक ते इंडियन ऑईल चौक या मार्गाच्या दोन्ही बाजूच्या 250 ते 300 टपऱ्या हटवण्यात आल्या आहेत. अखेर हिंजवडीच्या रस्त्यांनी मोकळा श्‍वास घेतला. त्यामुळे रस्त्यावरील वाहतुकीचा वेग वाढला व वाहतूक कोंडी सोडवण्याबाबत आणखी एक यशस्वी पाऊल उचलले गेले आहे. यावेळी वाहतूक पोलीस निरीक्षक किशोर म्हसवडे यांनी स्वतः तेथील अतिक्रमण हटवले आहे.
ट्रक, क्रेन व पोलीस यांच्या मदतीने सुरु असलेल्या कारवाईबाबत “आयटीयन्स’नी ट्विटरद्वारे समाधान व्यक्त केले. यामध्ये त्यांनी त्यांचा आणखी दहा मिनिटांचा वेळ वाचल्याचेही आवर्जून सांगितले आहे. एमआयडीसी प्रशासन अनेकदा कारवाई करते. मात्र काही तासातच परिस्थिती “जैसे थे’ होते. त्यामुळे आवश्‍यक तेथील अतिक्रमणे कायमस्वरुपी काढून टाकणे गरजेचे असल्याचे मत स्थानिकांनी व्यक्त केले.

“गोल्डन अवर्स’चाही फायदा
पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांनी या परिसरात महामार्गाप्रमाणे “गोल्डन अवर्स’ राबवण्याचे आदेश वाहतूक पोलिसांना दिले आहेत. त्यानुसार दुपारी एक ते चार या वेळेतच जड वाहतूक हिंजवडी परिसरात सुरु राहणार आहे. “पिक अवर्स’मध्ये जड वाहनांना पूर्णपणे बंदी करण्यात आली आहे. त्यामुळे वाहतूक कोंडीतील मोठा अडथळा दूर झाला आहे.

अतिक्रमण हटवल्याने रस्ता रुंद झाला आहे. त्यामुळे गाड्या कुठेच थांबल्या नाहीत. तसेच अनधिकृत दुकाने काढल्याने त्यांच्या जवळ होणारे पार्किंगही बंद झाले आहे. त्याचाही फायदा झाला. या साऱ्यामुळे चक्राकार पद्धतीने होणाऱ्या वाहतुकीपेक्षाही दहा मिनिटे वाचली आहेत. हे आमचे खूप मोठे यश आहे.
– किशोर म्हसवडे, वरीष्ठ वाहतूक पोलीस निरीक्षक, हिंजवडी.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)