आयकॉनिक गृह प्रकल्पाच्या बांधकामाला स्थगिती

तळेगाव-दाभाडे, (वार्ताहर) – नम्रता डेव्हलपर्सचे शैलेश शहा यांनी सामाईक रस्ता खरेदी केल्याचे भासवून नगर परिषद नगर रचना विभागाकडून 6,500 चौरस मीटरमध्ये 200 सदनिकेच्या गृह प्रकल्पाच्या बांधकामाचा प्लॅन मंजूर करून गृह प्रकल्पाचे काम सुरू केले होते. तो सामाईक रस्ता बाळासाहेब बाबुराव शेळके व माधव पांडुरंग शेळके यांच्या मालकीचा असल्याचे निष्पन्न झाल्याने तळेगाव-दाभाडे नगर परिषद मुख्याधिकारी वैभव आवारे यांनी सक्षम प्राधिकरण अथवा न्याय प्रविष्ट होईपर्यंत नम्रता डेव्हलपर्सचे शैलेश शहा यांच्या तपोधाम कॉलनी (तळेगाव दाभाडे) येथील आयकॉनिक गृह प्रकल्पाच्या बांधकामाला स्थगिती दिली आहे.

नम्रता डेव्हलपर्सचे शैलेश शहा यांनी सदाशिव राणुबा शेळके यांच्या मालकीचा गट नंबर 49/2/1 मधील 80 गुंठे 2000 साली व त्यांची मुली व सूनेकडून पुन्हा 33 गुंठे 2016 साली जमीन खरेदी केली. सदाशिव राणुबा शेळके, बाळासाहेब बाबुराव शेळके व माधव पांडुरंग शेळके कुटुंबियांचा 1970 पासून सामाईक मालकी असलेला रस्ता खरेदी केला. रस्ता खरेदी करताना बाळासाहेब बाबुराव शेळके व माधव पांडुरंग शेळके यांची संमती घेतली नाही.

नम्रता डेव्हलपर्सचे शैलेश शहा यांनी हा सामाईक रस्ता खरेदी केल्याचे भासवून तळेगाव-दाभाडे नगर परिषद नगर रचना विभागाच्या अधिकाऱ्यांना कागदोपत्री पुरावे दाखवून त्यांची दिशाभूल करून 6,500 चौरस मीटरमध्ये 200 सदनिकेच्या गृह प्रकल्पाच्या बांधकामाचा प्लॅन मंजूर करून घेतला. या सामाईक रस्त्याबाबत न्यायालयात दावा सुरू असताना सदर गृह प्रकल्पाचे काम सुरू केले होते. माहिती अधिकार कार्यकर्ते प्रदीप नाईक यांनी नगर परिषदेच्या नगर रचना विभागातून माहिती अधिकारात माहिती मागवून आयकॉनिक गृह प्रकल्पाच्या बांधकामाची माहिती मिळाली. त्यात हे उघड झाले.
नम्रता डेव्हलपर्सचे शैलेश शहा यांच्या विरोधात बाळासाहेब बाबुराव शेळके व माधव पांडुरंग शेळके यांनी नगर परिषदेच्या मुख्याधिकारी वैभव आवारे यांच्याकडे दाद मागितली. दिशाभूल करून गृह प्रकल्पाचा प्लॅन मंजूर केल्याने मुख्याधिकारी वैभव आवारे यांनी नम्रता डेव्हलपर्सचे शैलेश शहा यांच्या तपोधाम कॉलनी (तळेगाव दाभाडे) येथील आयकॉनिक गृह प्रकल्पाच्या बांधकामाला स्थगिती दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)