आयआयटीच्या यशाने देशभरात अभियांत्रिकी महाविद्यालयांची निर्मिती

पंतप्रधानांचे गौरवोदगार


आयआयटी मुंबईला केंद्राकडून एक हजार कोटी रुपये


भारत हे जगातील सर्वात मोठे तांत्रिक मनुष्यबळ असलेले केंद्र

मुंबई – गेल्या सहा दशकांत भारतीय तंत्रज्ञान संस्थेने (आयआयटी) केलेल्या निरंतर प्रयत्नांमुळे आज या संस्थेने देशातील नामांकित संस्थांमध्ये आपले स्थान निर्माण केले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

आयआयटी आणि येथील पदवीधरांच्या उल्लेखनीय कार्याचा राष्ट्राला अभिमान आहे. आयआयटीच्या यशाने देशभरातील अभियांत्रिकी महाविद्यालयांची निर्मिती झाली आहे. यामुळे भारत हे जगातील सर्वात मोठे तांत्रिक मनुष्यबळ असलेले केंद्र बनले आहे, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबईच्या आयआयटीचा गौरव केला.
केंद्र शासनाच्या मानव संसाधन विभागाच्या वतीने मुंबईच्या आयआयटीला एक हजार कोटी रुपयांचे साहाय्य देण्यात आल्याची घोषणा करतानाच या निधीतून उच्च दर्जाच्या पायाभूत सुविधा निर्माण होणार असून संशोधन आणि नावीन्यपूर्णतेवर विद्यार्थ्यांनी विशेष भर द्यावा, असे आवाहन मोदी यांनी केले.

मुंबईतील आयआयटीच्या 56व्या वार्षिक पदवीदान समारंभाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची विशेष उपस्थिती होती. यावेळी बोलताना पंतप्रधानांनी आयआयटीच्या विद्यार्थ्यांचे तोंडभरून कौतुकही केले. या कार्यक्रमास राज्यपाल सी. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना पंतप्रधान म्हणाले, आयआयटीला देशात, जगात इंडियन इ्‌स्टिटट्यूट ऑफ टेक्‍नॉलॉजी म्हणून ओळखले जात असले तरी आज त्याची व्याख्या बदलली आहे. हे फक्त तंत्रज्ञानापुरते मर्यादित राहिले नाही, तर आयआयटी म्हणजे इंडियाज इन्स्ट्रुमेन्ट ऑफ ट्रान्सफॉर्मेशन झाले आहे. आपले लक्ष्य नेहमी उच्च असू द्या. केवळ महत्त्वाकांक्षाच नाही तर आपले लक्ष्य, उद्दिष्ट हे सुद्धा महत्त्वाचे असते. इथपर्यंत पोहोचण्यासाठी आपण खूप परिश्रम केले आहेत. आज प्रदान झालेली पदवी ही आपल्या समर्पण आणि बांधिलकीचे प्रतीक आहे. हा केवळ एक टप्पा असला तरी खरे आव्हान अजून आपल्याला पेलायचे आहे. आज आपण जे काही मिळवले आहे आणि जे मिळवायचे आहे, त्यामागे तुमच्या, परिवाराच्या आणि सव्वाशे कोटी देशवासियांच्या आशा-अपेक्षा जोडल्या गेल्या असल्याचेही मोदी म्हणाले.

स्टार्टअप क्रांतीचा स्त्रोत आयआयटी
स्टार्टअपची क्रांती ज्या वेगाने देशात झाली त्याचा स्त्रोत आपल्या आयआयटी आहेत. आज जग आयआयटींना युनिकॉर्न स्टार्ट अप्सची नर्सरी म्हणून ओळखत आहे. तंत्रज्ञानाचा आरसा असलेल्या या संस्थांमधून जगाचे भविष्य आपल्याला दिसत आहे. नावीन्यता आणि उद्योगांच्या माध्यमातून भारताची विकसित अर्थव्यवस्थेची पायाभरणी होत आहे. या पायाभरणीतून शाश्वत आणि दीर्घकाळ तंत्रज्ञानावर आधारित आर्थिकवृद्धी होणार आहे, असे मोदी म्हणाले.

380 विद्यार्थी पीएचडी
आयआयटी मुंबईच्या झालेल्या 56 व्या वार्षिक दीक्षांत समारंभात आज 2621 विद्यार्थ्यांना विविध विषयांतील पदवी, तर 380 विद्यार्थ्यांना पीएचडी पदवीने सन्मानित करण्यात आले. आयआयटी मुंबई आणि मोनाश विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने राबविलेल्या पीएचडी अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांना मोनाश विद्यापीठाचे कुलगुरु तथा अध्यक्ष प्रा. मार्गारेट गार्डनर यांच्या हस्ते 29 विद्यार्थ्यांना पीएचडी पदवी प्रदान करण्यात आली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)