आम्ही मेल्यावर मदत मिळणार का?

संतप्त संवाल : भिंतही खचलेलीच, चूलही विझलेलीच


कालवाग्रस्त नागरिक महिनाभरानंतरही मदतीच्या प्रतिक्षेतच

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पुणे – खडकवासला कालवा फुटून दांडेकर पूल वसाहतीत पाणी शिरल्याच्या घटनेला शनिवारी महिना पूर्ण होत असला, तरी शासकीय नियम आणि लालफितीच्या संथ कारभारामुळे गेल्या महिनाभरात 900 बाधितांपैकी अवघ्या 40 ते 50 जणांना शासकीय मदत मिळाली आहे. तर, ज्या 98 कुटूंबाची घरे पूर्णपणे वाहून गेली, त्यांना अजूनही हक्काचा निवारा मिळालेला नसून नातेवाईक, शेजारी आणि पडक्‍या भिंतीचा आसरा घेऊनच हे संसार उभे आहेत. परिणामी, आता आमची कुटूंब उघड्यावर होऊन महिना झाला, तरी काहीच होत नसल्याने “आम्हांला मदत काय मेल्यावर मिळणार का,’ असा संतप्त सवाल हे नागरिक उपस्थित करत करत आहेत.

खडकवासला कालवा 27 सप्टेंबर रोजी फुटल्याच्या दुर्घटनेत दांडेकर पूल वसाहतीमधील सुमारे 98 घरे वाहून गेली. 800पेक्षा अधिक घरांत पाणी घुसले. या कुटुंबाना शासनाने 3 कोटी रुपयांची मदत जाहीर केली. घटनेनंतर जिल्हा प्रशासनाने तातडीने पंचनामे करून बाधितांची टक्केवारीही निश्‍चित केली. मात्र, त्यातील शासकीय नियमांचा अडसर आणि लालफितीच्या कारभारामुळे अवघ्या 40 जणांना मदत मिळाली आहे. पंचनाम्यात मोठ्या चुका झाल्याने अनेकांची नावे गायब असून काही जणांची नावे दुबार, तर पंचनाम्यात मालक आणि भाडेकरूंची नावे आल्याने दोघांत नेमकी कोणाला मदत द्यायची, यावरूनही वाद सुरू आहेत.

यात सर्वाधिक मदत घरे वाहून गेलेल्या नागरिकांना मिळणार आहे. मात्र, ज्यांच्या घरात पाणी घुसल्याने घरे खचली, पत्रे खाली आहेत, भिंतीला तडे गेले आहेत तसेच घराचे नुकसान झाले आहे, त्या कुटुंबांची ही कामे तातडीने करून देण्यासाठी ही मदत देण्यात येणार असल्याचे महापौरांनी म्हटले आहे. त्याबाबतचे पत्र आजच दिले जाणार आहे.

40 लाख गेले गाळ काढण्यात
महापौरांनी आपल्या निधीतून 40 लाख रुपये देत या भागात तातडीची कामे करण्यासाठी आयुक्तांची बैठक घेतली. यात नागरिकांना तातडीने नळजोड देणे, ड्रेनेज लाइन स्वच्छता, औषध फवारणी, पालिकेच्या सुविधा देण्याचे आदेश दिले होते. मात्र, या निधीतून या भागातील केवळ ड्रेनेजची झाकणे काढून गाळ काढण्यात आला आहे. उर्वरित कोणतीही स्वच्छता करण्यात आली नाही. तसेच ज्या घरांना तडे गेले, तेथील दुरुस्ती, त्यांना नवीन नळजोड यातील कोणतेही काम झाले नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड रोष आहे.

मदत हवी, तर बॅंक खाते क्रमांक द्या
प्रकल्पग्रस्तांना मदत द्यायची असेल, तर त्याचे बॅंक खाते राष्ट्रीयकृत बॅंकेत असणे आवश्‍यक आहे. मात्र, या दुर्घटनेतील बहुतांश नगरिकांची बॅंक खाती जनता सहकारी बॅंक, कॉसमॉस बॅंक मध्ये आहेत. त्यामुळे त्यांना जिल्हा प्रशासनाने राष्ट्रीयकृत बॅंकेचे खाते मागितले आहे. आता हे खाते नव्याने काढायचे झाल्यास त्यांना आधारकार्ड, रेशनकार्ड, मतदार ओळखपत्राची आवश्‍यकता आहे.मात्र, ही कागदपत्रे वाहून गेली आहेत. त्यामुळे त्यांना बॅंक खातेच उघडता येत नाही. तर ज्याची राष्ट्रीयकृत बॅंकेत खाती आहेत, त्यांची पासबुक वाहून गेली आहेत, त्यांनाही नवीन पासबुकसाठी पुरावे मागितले जात आहेत. त्यामुळे बॅंक खाती काढण्यासाठी या नागरिकांची तारांबळ उडाली आहे.

पंचनाम्याचा गोंधळ
जिल्हा प्रशासनाने या नागरिकांचे पंचनामे दुबार केले आहेत. तर अनेक पंचनामे मालक आणि भाडेकरूंचेही आहेत. त्यामुळे नेमकी मदत कोणाला द्यायची, याबाबत संभ्रम आहे. तर ज्यांची घरे पूर्ण वाहून गेली, त्यातील काही जणांची नावे यादीतून गायब आहेत. त्यामुळे त्यांना जिल्हाधिकारी कार्यालयात हेलपाटे मारावे लागत आहेत. आता ज्यांची नावे दुबार झाली, अथवा मालक की भाडेकरू हा वाद निर्माण झाला आहे, त्यांना पुरावे सादर करण्यास सांगण्यात आले आहेत. त्यामुळे ज्यांची कागदपत्रे वाहून गेली आहेत, ते कागदपत्रे कोठून आणायाची? म्हणून हतबल आहेत.

30 जणांनाच मिळणार घर?
या दुर्घटनेत सुमारे 98 घरे पूर्ण वाहून गेली. येथे महापालिकेने “एसआरए’ योजना प्रस्तावित केलेली होती. त्यानुसार सर्वेक्षणही झालेले होते. त्याची माहिती जिल्हा प्रशासनाने “एसआरए’च्या माध्यमातून तपासणी केली असता 98 मधील अवघे 30 जण घरासाठी पात्र झाले असून त्यातील 25 जणांना घराचे वाटप करण्यात आले आहे. त्यामुळे उर्वरित 68 जणांना घरे मिळणार, की नाही? याबाबत शंका असून त्यावर बैठकांचे सत्र सुरु आहे.

राडारोडा ओढ्यातच
दुर्घटनेनंतर वाहून गेलेल्या अनेक घरांचा राडारोडा अजूनही आंबील ओढ्यातच आहे. तेथे पत्रे आणि भिंती धोकादायक अवस्थेत आहेत. ते नागरिकांना काढणे शक्‍य नाही. त्यासाठी यंत्रसामग्री आवश्‍यक असून ती महापालिकेकडेच आहेत. मात्र, गेल्या महिनाभरात आंबील ओढ्यातील साहित्य अथवा राडारोडा तसाच पडून असून या घटनेची साक्ष देत आहे.

कालवाग्रस्त म्हणतात…

आमची घरं-दारं वाहून गेली. काही दिवस नातेवाईक, शेजारी, नगरसेवकांनी मदत केली. पण, आता कोणीच नाही. घर पुन्हा उभारायचे आहे. परत आहे तिथे राहण्यास यायचे आहे, पण अजूनही मदत मिळतच नाही. कार्यालयात हेलपाटे घालतोय. हे कागद आणा, ते कागद आणा सांगून आम्हला नुसतेच हेलपाटे मारायला लागताहेत.
– अरुणा लोंढे


कालव्याचे पाणी घरात घुसल्याने आमचे सर्व साहित्य वाहून गेले. केवळ खचलेल्या भिंती आणि पत्रा शिल्लक आहे. माझे खाते कॉसमॉस बॅंकेत होते. मात्र त्यावर मदत देण्यास नकार देण्यात आला. मला राष्ट्रीयकृत बॅंकेचे खातेच द्यावे लागेल, नाहीतर मदत देता येणार नाही, असे सांगण्यात आले. योगायोगाने आधारकार्ड वाहून गेले नव्हते. त्यामुळे अडचण आली नाही, पण तीन दिवसांपासून खाते उघडण्यासाठी काम सोडून कागदपत्र जमा करत आहे.
– देविदास कुंभार


या दुघटनेत माझे सगळं घरच वाहून गेले आहे. काहीही राहिलेले नाही. आमचे पंचनामे झाले होते. त्यानंतर काही दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयात यादी पाहण्यासाठी गेलो असता, आमचे नावच यादीत नव्हते. आमच्याकडून पुन्हा नव्याने पंचमामा अर्ज भरून घेतला आहे. घर वाहून गेल्याने नातेवाईक आणि शेजाऱ्याकडेच जागा मिळाली आहे. तसेच लहान मुलांना सोबत घेऊन राहत आहे.
– साधना बोरकर


कालवाग्रस्तांना महापालिकेकडून मदत केली जाणार आहे. त्या अंतर्गत पूर्णतः बधितांना 11 हजार रुपयांचे तर अंशतः बधितांना 6 हजार रुपयांचे साहित्य दिले जाणार आहे. याशिवाय आपण 40 लाखाचा निधी दिला आहे. त्यातून या भागात पायाभूत सुविधा दिल्या जाणार आहेत. जिल्हा प्रशासनकडूनही लवकरच मदत दिली जाईल.
– मुक्ता टिळक, महापौर.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)