आम्ही जिल्ह्याच्या कारभारणी (भाग- 2)

एक काळ असा होता की, राजकारण हे फक्त पुरुषांचेच क्षेत्र गृहीत धरले जात होते. तिथे महिलांना वाव नाही, संधी नाही व ते पेलवणारही नाही, असा समज होता. परंतु, महिला आरक्षणाने संधी तर दिलीच; महिलांनी कर्तृत्व सिद्ध करत राजकारणात स्थानही निश्‍चित केले. ते पुरुषी छायेतून काढून स्वतंत्रही केले. महिलांनी त्यांच्या स्वयंनिर्णय क्षमतेचा आदर्शही निर्माण केला. दिग्गज पुरुष राजकारण्यांच्या तुलनेत महिलांचे दिग्गज असणे, कुठेही कमी नाही याची प्रचिती देशाने उच्चपदस्थ राजकीय महिलांच्या माध्यमातून घेतली आहे. त्यांच्या वाटचालीचा आदर्श नव्याने राजकारणात येणाऱ्यांसाठी पथदर्शी आहे.

कधी त्यांच्या कामकाजात हस्तक्षेप केला नाही. याचाच अर्थ त्यांनी हे क्षेत्र सक्षमपणे पेलवले आहे. महिला राजकारणात काम करू शकत नाहीत हा समज खोटा ठरविणारे त्यांचे कामकाज कोणत्याही पुरुष राजकारण्याच्या तुलनेत कमी नाही. जिल्हा परिषदेच्या सर्वच क्षेत्रांचा पुरेपूर अभ्यास करत कोणत्या फाईलला काय अडचण येते व ती कशी सोडवितात, प्रशासनातील इतर बारकावे काय असतात हे अवगत असल्याचे त्यांनी वेळोवेळी दाखवून दिले. जिल्हा परिषदेला कोणकोणता निधी मिळू शकतो, याचीही पुरेशी माहिती राजकारणी व प्रशासनाला नव्हती. अशा अनेक दुर्लक्षिल्या गेलेल्या बाबीतून निधी मिळवून जिल्हा परिषद सक्षम करण्याचा त्यांचा प्रयत्न यशस्वी झाला. त्यात विक्रमी निधी मिळविण्यातील त्यांचे कौशल्य स्पष्ट झाले.

विखे घराण्यातील महिला म्हणून नव्हे तर राजकारणात यशस्वी होत असलेली महिला असा त्यांचा प्रभाव झाला. महिला सबलीकरणासाठी बचत गटांच्या भव्य मेळाव्याचे यशस्वी आयोजन हा त्यांच्या प्रशासकीय कौशल्याचाच एक भाग आहे. साईज्योती ब्रॅंड तयार करून त्यांनी त्या माध्यमातून जिल्ह्यात ओळख निर्माण केली. आज या ब्रॅंडने महिलांना स्वयंपूर्णतेसाठी हात दिला आहे. आताही या जिल्हा परिषदेच्या माध्यमातून त्यांनी दक्षिणेच्या विकासाकडे लक्ष दिले आहे. अर्थात, पुत्र सुजय लोकसभेच्या रिंगणात उतरणार असल्याने त्याला या पदाच्या माध्यमातून ताकद देण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून होईल.

पुन्हा विधानसभेची तयारी
स्थानिक स्वराज्य संस्थांमधून ते थेट विधानसभेपर्यंतची यशस्वी वाटचाल करणाऱ्या महिला ही बाब महिलांच्या निरंतर राजकीय प्रगतीचेच प्रतीक आहे. तशात मतदारसंघ खुला असेल तर तिथे पुरुषांच्या वर्चस्वाला आव्हान देणे ही बाब सोपी नाही. मुळात खुला मतदारसंघ म्हणजे त्यात महिलांना गृहीत न धरताच पुरुषांनी आपल्यासाठी असलेला मतदारसंघ अशी अघोषित धारणा केली आहे. परंतु, खुल्या मतदारसंघात महिलांनाही नेतृत्त्वाची संधी असते. अर्थात, ती सहजसोपी नसली तरी आ. स्नेहलता कोल्हे यांनी खुल्या मतदारसंघात आपले कर्तृत्व सिद्ध केले आहे. अशा मतदारसंघात प्रत्यक्षात मोठी दगदग वाट्याला येते. परंतु, घरात राजकीय वातावरण असूनही महिलांनी पुढे येणे हा घराच्या परवानगीपासून सुरू होणारा भाग. येथे यासाठी बिपीन कोल्हे यांनी स्वतः थांबण्याचा निर्णय घेतला.

जेथे पुरुषांचे राजकारणातील स्थान निश्‍चित होत नाही किंवा यशस्वी होत नाही तेथे स्त्रिया बाजी मारून नेऊ शकतात याचे हे एक उत्तम उदाहरण आहे. स्नेहलता यांचे यश खुल्या मतदारसंघामुळे अधिक खुलून दिसते. जिथे पुुरुष स्पर्धक असतील तिथे महिलांनी निवडणूक लढवू नये असे सामान्य संकेत मानले जातात. महिलांच्या आरक्षित जागांवरच महिलांची राजकीय लढत व्हावी हे यातील गृहितक. परंतु, मतदारसंघ खुला की महिलांसाठी आरक्षित याचा फरक पडत नाही हे राजकारणातील अशा यशस्वी महिलांनी सिद्ध केले आहे. महिला बचत गटांच्या माध्यमातून तालुक्‍यात स्त्री शक्‍ती उभी करून त्यांनी समाजकारण केले. आताही तालुक्‍यातील प्रश्‍न प्रभावीपणे मांडून त्यांनी अनेक प्रश्‍न मार्गी लावले. बारीकसारीक गोष्टीकडे लक्ष देऊन तालुक्‍यात विकास कामांचा सपाटा लावला. अर्थात, पुन्हा विधानसभा निवडणुकीत देखील त्या उमेदवार राहतील, अशी आशा आहे.

खडतर प्रवासातून राजकीय वाटचाल
आमदार मोनिका राजळे यांचेही नाव महिलांच्या राजकीय यशाच्या पथदर्शिका अशाच अर्थाने घ्यावे लागेल. पती राजीव यांचे अपयश मोनिका यांनी धुवून काढले. परंतु, नियतीच्या मनातील वेगळ्या खेळाने त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. समाजाचे नेतृत्त्व करणारांना वैयक्तिक दुःख विसरून समाजाचे दुःख व दैन्य दूर करण्यासाठी उभे रहावे लागते याचा वस्तुपाठ त्यांनी आता घालून दिला आहे. राजकारणात ताकद असती, ती समाजहितासाठी असते. ते साध्य करताना येणाऱ्या संकटांना किती धैर्याने सामोरे जावे लागते याचे आ. मोनिका राजळे हे उदाहरण जिल्ह्याच्या नव्हे राज्याच्या राजकारणातील दुर्मिळ ठरावे असेच आहे. ही बाब त्या खऱ्या अर्थाने धीरोदात्त असल्याचे सिद्ध करते. मोनिका यांना वडील माजी मंत्री अशोक डोणगावकर यांच्या रूपाने माहेरचा वारसा, तर सासरी माजी आमदार आप्पासाहेब राजळे यांच्या माध्यमातून राजकीय वारसा मिळाला आहे. तो पुढे समर्थपण चालविताना त्यांनी जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षपदाचा कार्यकाळ लक्षवेधीरित्या सांभाळला.

यादरम्यान दक्षिण नगर जिल्हा त्यांनी पिंजून काढला. यातून त्यांचे पती स्व. राजीव यांच्या येथील उमेदवारीसाठीची पार्श्‍वभूमी तयार झाली होती. आता पुन्हा जनतेचे प्रश्‍न घेऊन मोनिका पाठपुरावा करत आहेत. जिल्ह्याच्या राजकारणातील एक महिला म्हणून त्यांचे राजकीय भवितव्य निश्‍चितच लक्षवेधी ठरेल अशी त्यांची वाटचाल आहे. राजकीय वारशामुळे समाजाच्या प्रश्‍नांची जाण व ते कसे सोडविता येतील याचे कौशल्य त्यांना प्राप्त आहे.

श्रीगोंद्याला मिळणार का महिला आमदार..
श्रीगोंद्याचे राजकारणही तसे पुरुष केंद्रीतच. दक्षिणेतील हा तालुका तुलनेत राजकारणात प्रबळ. या तालुक्‍यात पाचपुते, नागवडे व जगताप यांच्या भोवतीच फिरणारे असले तरी लहान-लहान नेतेच खऱ्या अर्थाने या तीन नेत्यांचे राजकीय पारडे जड करीत आले आहे. या तिघांकडून या लहान नेत्यांना तसा न्याय दिला जातो. कुकडी योजनेच्या माध्यमातून सिंचनक्षमता वाढल्याने शेती विकसित झाली. साखर कारखानदारीने रोजगारनिर्मिती झाली. शैक्षणिक संस्थांच्या रूपाने शिक्षणातही अग्रेसर असलेला हा तालुका. मात्र, श्रीगोंद्यात स्त्रियांना फारसा वाव मिळेल अशी अपेक्षा कालपर्यंत नव्हती. परंतु, ती बाब अनुराधा नागवडे यांनी फोल ठरविली. आज त्यांचे नाव आमदारकीच्या दावेदारांच्या रांगेत आहे.

आम्ही जिल्ह्याच्या कारभारणी (भाग- १ )

जुन्या जाणत्या पुरुष राजकारण्यांच्या स्पर्धेत येथे महिलेचे नाव चर्चेत येणे हीच बाब महत्त्वाची आहे. मात्र, ती किमया आपल्या जनसंपर्काने अनुराधा यांनी साधली आहे. थेट लोकमानस ओळखत समाजाशी जवळीक साधण्याचे त्यांचे कौशल्य प्रामुख्याने श्रीगोंद्यातील महिलांना विशेष भावलेले आहे. येथून इतक्‍या प्रभावीरीत्या महिलेचे नाव चर्चेत येणे तसे सहजशक्‍य नव्हते. नेतृत्वगुणाच्या आधारे अनुराधा यांनी ती पोकळी भरून काढली आहे. सध्या तरी जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण समितीच्या माध्यमातून त्यांनी तालुक्‍यात वेगळी ओळख तयार केली असून, फोडाफोडीच्या राजकारणाला फाटा देऊन जोडाजोडीचे राजकारण त्यांनी सुरू केले आहे.

महिला उमेदवार मिळणार
दक्षिणेतील कर्जत हा तालुका आता कुठे प्रगतीची पावले पाहू लागला. या तालुक्‍याला दीर्घकाळ वरिष्ठ राजकारणात किंमत नव्हती. पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांच्या माध्यमातून येथे मंत्री पदे मिळाली. परंतु, कर्जत तालुका राजकारणात महिलांच्या पावलांसाठी काहिसा अनुकूल असलेला. सध्याच्या स्थितीत राजकारणात पद असो अथवा नसो, सामाजिक सक्रियतेतील सातत्य जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा मंजूषा गुंड व जिल्हा बॅंकेच्या विद्यमान संचालिका मीनाक्षी साळुंके यांनी राखले आहे. या पिढीच्या या प्रतिनिधी महिला राजकीय महत्त्वाकांक्षा बाळगून आहेत. तशी जिद्दही त्यांच्यामध्ये आहे. मीनाक्षी साळुंके यांना पंचायत समितीच्या सभापतिपदाचा व अंगणवाडी सेविकांच्या भरती अध्यक्षपदाचाही अनुभव आहे.

जिथे या तालुक्‍याच्या राजकारणात इतरही महिला आल्या आणि पदाचा कालावधी संपल्यानंतर सामाजिक सक्रियतेत अभावानेच दिसल्या, तिथे मंजूषा गुंड व मीनाक्षी साळुंके यांनी सातत्य कायम राखले. पद नसतानाही मंजूषा पक्षकार्यात सहभागी होताना दिसतात. तर, मीनाक्षी यांनी तालुक्‍यात चळवळीतील महिला अशी प्रतिमा निर्माण केली आहे. त्यामुळे त्यांचा स्वतःचा संपर्क व्यापक बनला आहे. येथे मंजूषा गुंड या तालुक्‍याच्या राजकारणात तुलनेत मोठी राजकीय पार्श्वभूमी असलेल्या घराण्यातील आहेत. त्यांचे सासरे बापूसाहेब हे तालुक्‍याच्या राजकारणात आदराने घेतले जाणारे नाव. तर, पती राजेंद्र जिल्हा परिषद सदस्यत्वाचा मोठा अनुभव असलेले. तर, मीनाक्षी साळुंके यांच्या घराची कारकीर्द त्यांच्याच राजकीय यशाने सुरू झाली आहे. त्यांचे पती बाळासाहेब तालुका कॉंग्रेसचे अध्यक्ष होते.

तालुक्‍याच्या राजकारणातील या महिलांमध्ये जिल्हा व राज्याच्या राजकारणात वावरण्याची क्षमता आहे. तशी संधी त्यांना मिळाली तर त्यांचे कर्तृत्व त्या सिद्ध करतील, असा आत्मविश्‍वास त्यांच्या दैनंदिन कामकाजातून दिसून येतो. याच तालुक्‍यातील विमल ढेरे यांनी जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद भूषविले होते. त्यांच्या नंतरही स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये अनेक महिलांनी शिरकाव केला.

शहराचे नाव देशभरात
एकविचाराने व सर्वमान्य विकासाची दृष्टी असलेला एकसूत्री कारभार संगमनेर तालुक्‍यात होत असल्याने शहरासह तालुक्‍यात विकासाचे मॉडेल तयार झाले आहे. शहराच्या विकासात थोरात कुटुंबाचे मोठे योगदान आहे. त्यात त्याच्या भगिनी व नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे यांनी शहर स्वच्छतेच्या घेतलेल्या ध्यासामुळे आज संगमनेर शहर स्वच्छतेमध्ये देशात पहिल्या दहा शहरांच्या यादीत पोहोचले असून, आज ते सहाव्या क्रमांकावर आहे. विकासाची दृष्टी असल्याने संपूर्ण शहर स्वच्छतेसाठी कामाला लावण्याचा प्रयत्न या माध्यमातून झाला.

आमदारकीच्या स्पर्धेतील नाव
आप्पासाहेब राजळेची मुलगी हा सुनीता यांचा माहेरचा, तर यशवंतराव गडाखांच्या सून व शंकररावांची पत्नी हा त्यांचा सासरकडील राजकीय वारसा. आमदारकीच्या स्पर्धेतील नाव अशी त्यांची ओळख मात्र त्यांनी स्वतः केलेल्या कामांतून झाली आहे. नेवाशाच्या विद्यमान पंचायत समिती सभापती सुनीता गडाख यांची आजची ओळख असली तरी शिवसेनेच्या त्या संभाव्य उमेदवारही आहेत. त्यांनी देखील राजकारणात आपली ओळख स्वतंत्रपणे निर्माण केली आहे. त्यासाठी महिला असणे ही बाब त्यांना अडसर वाटली नाही. राजकीय पार्श्वभूमी असली तरी स्वतःची जिद्द व आत्मविश्वासाच्या बळावर त्यांची वाटचाल सुरू आहे.

अकोल्यातील भाजपच्या उमेदवार
महिला कॉंग्रेसच्या अध्यक्षा व जिल्हा परिषद सदस्यत्वाचा अनुभव असलेल्या सुनीता भांगरे सध्या भाजपच्या विधानसभेच्या उमेदवार म्हणून पक्षीय पातळीवर चर्चा होत आहे. भांगरे घराण्याचा राजकीय वारसा पुढे चालविताना त्यांनी स्वतःची सक्षम यंत्रणा उभारली आहे. त्यासाठी बचत गटाच्या माध्यमातून महिलांच्या समन्वयाचे मोठे जाळे त्यांनी विणले आहे. त्याचा उपयोग महिलांच्या वैयक्तिक विकासासाठी व सुनीता यांच्या राजकीय कारकिर्दीला भक्कम आधाराच्या रूपाने होतो. जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अशोक भांगरे यांच्या त्या पत्नी अशी त्यांची ओळख असली तरी राजकारणातील महिला या नात्याने त्यांनी स्वतःची ओळख निश्‍चित केली आहे. आदिवासी भागात त्यांनी उभारलेले काम त्यांच्या राजकारणाला पूरक ठरत आहे. येथे दिग्गज अशा पिचड परिवाराशी राजकीय स्पर्धा असली तरी आपली वाटचाल त्यांनी लक्षवेधी बनविली आहे.

लोकसभा की विधानसभा?
जिल्हा परिषदेच्या विद्यमान उपाध्यक्षा राजश्री घुले या चंद्रशेखर घुले यांच्या पत्नी असल्या तरी त्यांनीदेखील इतर महिलांच्या संघर्षासारखाच संघर्ष केला आहे. आता उपाध्यक्षपदाच्या माध्यमातून राजश्री यांनीही जनसंपर्क वाढविला आहे. याचा फायदा त्यांच्या राजकीय वाटचालीला होणार हे निश्‍चित.

परंतु, लोकसभा अथवा विधानसभा यापैकी कोणत्या निवडणुकीसाठी त्या रिंगणात उतरणार हे आता काळ ठरविणार आहे. सध्या तरी या दोन्ही निवडणुकांसाठी त्यांच्याकडे संभाव्य उमेदवार म्हणून पाहिले जात आहे, तशी त्यांची पायाभरणी सध्याच्या पदातून सुरू आहे. एकूणच स्थानिक स्वराज्य संस्थेतून त्या राजकारणाच्या बारकाव्यांचा अभ्यास करत आहेत. पुढे मिळू शकणाऱ्या राजकीय संधीमध्ये या अनुभवाचा त्यांना उपयोग होईल.

या महिलांनी राजकारणात आपले स्थान निर्माण करून आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीसाठी आपले नाव समोर आणले आहे. त्याबरोबर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आपल्या कामाचा ठसा उमटविण्याचे कामदेखील काही महिला करीत आहे. त्यात राहाता नगराध्यक्षा ममता पिपाडा, श्रीरामपूरच्या नगराध्यक्ष अनुराधा आदिक, माजी नगराध्यक्षा उषाताई तनपुरे, शरयु देशमुख, जिल्हा बॅंकेच्या संचालिका चैताली काळे यांचा समावेश आहे.

 

जयंत कुलकर्णी
वृत्तसंपादक

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)