आम्ही खोदाई करू तरी कुठे?

समान पाणी योजना : ठेकेदार कंपनीचा पालिकेला सवाल

पुणे – महापालिका आयुक्तांनी समान पाणी योजनेसाठी रस्ते खोदाईस मान्यता दिली असली तरी, या खोदाईस स्थानिक पातळीवर विरोध सुरू झाला आहे. आपल्या प्रभागात खोदाई करू नये, म्हणून नगरसेवकांकडून नकार देण्यात येत आहे. त्यामुळे आम्हाला मान्यता मिळाली तरी आम्ही खोदाई करू तरी कुठे? असा सवाल हे खोदाईचे काम देण्यात आलेल्या “एल अॅन्ड टी’ कंपनीकडून थेट महापालिकेस विचारण्यात आला आहे. या योजनेसाठीच्या कामाचा आढावा घेण्यासाठी अतिरिक्त आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी बुधवारी बैठक घेतली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

शहरात चोवीस तास समान पाणीपुरवठा योजनेतील पाण्याच्या टाक्‍यांच्या कामांना दोन वर्षांपूर्वी मंजुरी देण्यात आली आहे. शहरात 82 ठिकाणी टाक्‍या उभारण्यात येणार असून त्यापैकी आठ टाक्‍यांचे काम पूर्णही झाले आहे. याशिवाय, या कामासाठी शहरातील एकूण 2,100 किलो मीटरपैकी जवळपास 1,800 किलो मीटर रस्त्यांची खोदाई केली जाणार आहे. ही सर्व खोदाई जलवाहिनी टाकण्यासाठीची आहे. त्यामुळे टाक्‍यांचे काम सुरू झाल्यानंतर आता या खोदाईचे काम सुरू होणार आहे. त्यासाठी हे काम देण्यात आलेल्या कंपनीने मोठ्या जलवाहिन्यांसाठी सुमारे 108 किलो मीटर, तर सुमारे 250 किलो मीटरच्या जोड जलवाहिन्यांसाठी खोदाईचा आराखडा सादर केला आहे. मात्र, त्यास मान्यता देण्यास महापालिका प्रशासन तयार नव्हते. तसेच पक्षनेत्यांनी अजून खोदाई धोरण मंजूर केलेले नसल्याने प्रशासनाने मान्यता दिल्यास अडचण नको, म्हणून पक्षनेत्यांच्या बैठकीत या विषयावर चर्चा केली. त्यात “खोदाईमुळे नागरिकांना त्रास होणार नाही, तसेच रस्ते बंद करावे लागणार नाहीत अशा पद्धतीने निर्णय घ्या,’ असे सांगत हा खोदाईचा चेंडू पुन्हा प्रशासनाकडे टोलविण्यात आला होता. मात्र, या खोदाईस विलंब झाल्यास या योजनेचे काम रखडण्याची भीती असल्याने अखेर महापालिका आयुक्तांनी निर्णय घेत या 106 किलो मीटरच्या खोदाईस मान्यता दिली. मात्र, आता या खोदाईस स्थानिक पातळीवर विरोध होत असल्याचे चित्र आहे.

“आमच्या इथून नको, तिकडून खोदाई करा’
या बैठकीत महापालिकेच्या अभियंत्यांनी खोदाईस स्थानिक लोकप्रतिनिधींकडून विरोध होत असल्याचे सांगण्यात आले. काही भागांत खोदाईसाठी गेले असता, पालिकेच्या अभियंत्यानी याची कल्पना नगरसेवकांना दिली. त्यावेळी त्यांनी खोदाई कुठून कुठपर्यंत होणार याची विचारणी केली. तसेच, ही माहिती घेऊन खोदाई आमच्या भागातून न करता दुसऱ्या बाजूने सुरू करावी आणि ते काम पूर्ण होत आल्यावरच आपल्या भागात खोदाई करावी, असे सांगत खोदाईस मनाई केली जात असल्याचे अतिरिक्त आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिले. तर, कंपनीच्या प्रतिनिधींनीही वर्क ऑर्डर मिळून वर्ष होत आले मात्र, अद्याप एक इंचही जलवाहीनी टाकली नसल्याचे सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)