आम्ही आणि आमचे नवीन दागिने

दागिन्यांची आवड नाही अशी स्त्री तशी विरळाच. सोने, चांदी, हिरे आणि अगदी खऱ्यासारखे वाटणारे खोटे दागिने घालणे हा स्त्रीचा आवडीचा विषय. आम्हीही त्याला अपवाद नाही. नुकताच सत्तरीकडे निघालेला आमचा हा सहाजणींचा ग्रुप. पण मी आज तुम्हाला आम्ही नव्याने घेतलेल्या काही नवीन दागिन्यांविषयी सांगणार आहे. जे दागिने फार हौसेने नाही पण अपरिहार्यतेने आम्ही घेतले आहेत आणि त्यातही आम्ही खूप आनंदी आहोत.

तर मैत्रिणींनो सरकारी खात्यातून निवृत्त झालेल्या आमचा हा सहाजणींचा कट्टा. अनेक वर्षे आम्ही एकत्र काम केले. नोकरी सुरू करताना आम्हीही तरुण होतो तेव्हापासूनचा आमचा सहवास रोज ऑफीसमध्ये कमीत कमी 8 तास एकत्र राहिल्याने नात्यापेक्षाही घट्ट अशी वीण आमच्यात आहे. त्या काळात रोज एकत्र डबा खाणे, खरेदी करणे, सण समारंभ साजरे करणे, एकमेकींचे वाढदिवस साजरे करणे इ. सर्व गोष्टी करत करत आम्ही जवळजवळच्या फरकाने निवृत्त झालो. निवृत्तीनंतरही एकत्र राहण्याचा आमचा मानस आम्ही आजपर्यंत पाळत आहोत.

सर्वजणींच्या मुला-मुलींची लग्ने झाली. काहीजण परदेशात स्थायिक झाले. या जवळ जवळ 40 वर्षांत बऱ्याच घटना घडल्या. पण आम्ही मात्र एकत्रच राहिलो. सहाजणींचा ग्रुप असल्याने आम्ही आता दर दोन महिन्यांनी भेटतो. वय परत्वे हल्ली गर्दीची ठिकाणे टाळतो. डिसेंबरमधील भेटण्याचे ठिकाण “वैशाली’ ठरले होते. त्यासाठी बऱ्याच दागिन्यांची खरेदी करून झाली होती. बहुतेकींची मोती बिंदूची ऑपरेशन झाली होती. त्यामुळे दोघींनी गॉगल घातला होता. चष्म्याशिवाय तर काहीच दिसत नव्हते. मग मेनूकार्ड कोण पाहणार? सहापैकी चौघींना मधुमेह होता. त्या त्यांच्या गोल्यांसह हजर होत्या. एकीच्या पायावर मधुमेहाचा परिणाम झाला होता. ती काठी वापरीत होती. प्रतिभाच्या दोनही गुडघ्यांचे ऑपरेशन झाले होते. ती वॉकरसह आली होती. मंजिरीमध्ये घरातच पडल्याने तिला मणक्‍याचा त्रास सुरू झाला होता. त्यामुळे ती कंबरपट्टा बांधूनच आली होती. मला मानेचा त्रास होता म्हणून मी कॉलर लावली होती. सुचेताला हल्ली कमी ऐकू येते. त्यामुळे ती कानात श्रवणयंत्र घालून आली होती. सहाजणींपैकी तिघींनी दात काढून कवळी बसविली होती. त्यामुळे कडक पदार्थ वर्ज्य होते. संध्याकाळी जास्त खाण्याने पोटाची तक्रार होईल या भितीने सर्वांनी एक डोसा आणि कॉफी यावर समाधान मानल.े पण खर सांगू का या नवीन दागिन्यांसह आम्ही अगदी आनंदात आहोत. पूर्वी अगदी थोडे थोडे सोने साठवून आम्ही सर्वांनीच पाटल्या, बांगड्या, तोडे असे दागिने केले होते. मंगळसू, नेकलेस, चेन इ. दागिने देखील त्या त्या वेळच्या फॅशनप्रमाणे बदलले होते. पण आता मात्र हे सर्व लॉकरमध्येच ठेवलेले आहेत. गळ्यात काहीतरी साधेच घालून हातात फक्त घड्याळ घालणेच हल्ली आम्ही पसंत करतो. दागिन्यांप्रमाणे आवडीने घेतलेल्या सिल्कच्या साड्या, पैढण्या सुद्धा समारंभानिमित्तानेच नेसतो. सुना किंवा मुलींनी आणलेले सुटसुटीत पंजाबी ड्रेसच हल्ली सोयीचे वाटतात.

तेव्हा हे सर्व जुने दागिने वगैरे आता भूतकाळात गेले आहे. अपरिहार्यतेने आणि शारीरिक व्याधींनुसार वयपरत्वे आलेले, हे सर्व नवीन दागिने म्हणजे चष्मा, वॉकल, श्रवणयंत्र, कवळी, काठी इ.इ. आम्ही आनंदाने स्वीकारले आहेत आमि यासह नातवंडांनी बुक करून दिलेल्या ओला किंवा उबेर गाड्यांतून आजही आम्ही फिरत असतो- आनंदाने उत्साहाने- कारण अपरिहार्य ते स्वीकारले तरच जीवन चालत राहणार आहे. हो ना.

आरती मोने


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)