विरमाडे, दि. 11 (प्रतिनिधी) – मोजकी शेती, उत्पादनालाही म्हणावा तितका दर नाही, त्यातही निसर्गाची साथ मिळेल याची शाश्‍वती नाही अशी एकंदरीत परिस्थिती. त्यातच अचानक महामार्गाच्या रुंदीकरणाला सुरुवात झाली. आणि आहे या जमिनीतील काही जमिन शासनाने संपादित केली. काही जणांवर तर भूमीहीन होण्याची वेळ आली. त्यामुळे उदरनिर्वाहाचे साधनच नाहीसे झाले. परंतु, महामार्गाच्या रुंदीकरणाबरोबरच टोलनाक्‍याची उभारणी झाली आणि संकटाचे संधीत रुपांतर करुन “आम्हीच शोधला आमचा रोजगार’. होय! हे वास्तव आहे, आनेवाडी टोलनाका परिसरातील विरमाडे, आनेवाडी या गावातील.
महामार्गाच्या रुंदीकरणात वाई तालुक्‍यातील विरमाडे आणि जावली तालुक्‍यातील आनेवाडी गावातील शेतकऱ्यांच्या जमिनी शासनाने संपादित केल्या. जमिनी गेल्यामुळे शेतकऱ्यांवर भूमीहिन होण्याची वेळ आली. शेती हे येथील लोकांचे उदरनिर्वाहाचे साधन, पण शेतीच राहिली नाही त्यामुळे उदरनिर्वाहाचे मोठे संकट उभे राहिले. रस्त्याची कामे सुरु होऊन पूर्ण झाली, रस्त्याबरोबरच या ठिकाणी टोलनाकाही उभारण्यात आला. टोलनाक्‍यामुळे याठिकाणी वाहने थांबू लागली. नेमकी हीच बाब हेरुन येथील ग्रामस्थांनी टोलनाक्‍याच्या परिसरात छोटी-मोठी चहा, नाष्ट्याची हॉटेल उभारली. सुरुवातीला एक दोन असणारी हॉटेलची संख्या आता जवळपास पंचवीस ते तीसवर गेली आहे. चहा-नाष्ट्यासाठी वाहने या हॉटेल्सवर थांबू लागली. हॉटेल व्यवसायातून सुरुवातीला घर चालविण्या इतपत पैसेही मिळू लागले.
आजमितीला टोलनाक्‍याच्या आनेवाडी आणि विरमाडे या दोन्ही बाजुंना असलेली हॉटेल्स उत्तमरित्या चालत आहे. त्यातून या व्यावसायिकांना चांगले पैसेही मिळत असल्याने हे व्यावसायिक आता जीवन जगण्यास सक्षम झाले आहेत. सुरुवातीला गरज म्हणून याठिकाणी हॉटेल व्यवसाय थाटणाऱ्या येथील शेतकऱ्यांना आता त्यांच्या मुलांचाही हातभार मिळत आहे. शिक्षण असूनही हवी तशी नोकरी मिळत नसल्याने हतबल झालेले अनेक तरुण समाजात आहेत. मात्र, विरमाडे, आनेवाडीसह परिसरातील गावांमधील सुशिक्षित तरुणांनी निराश न होता टोलनाक्‍यालाच आपला आधार बनवून सुरु केलेले व्यवसाय सध्याच्या तरुण पिढीसाठी नक्कीच प्रेरणादायी आहे. संकटांनी हताश झालेल्या तरुणांनी संकटावर मात करायला शिकले तर काय घडू शकते याचा हा वस्तूपाठ आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)